Tuesday, June 26, 2007

भारतीय ज्योतिषशास्त्र


ग्रंथप्रदर्शनातून बाहेर पडता पडता दुर्लक्षित ठिकाणी उपेक्षितासारखे पडलेले एक पुस्तक सहज दृष्टोत्पत्तीस पडल आणि मी ते डोळे झाकून खरेदी केलं. ते पुस्तक म्हणजे."भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास" ले. शं.बा.दिक्षित'. डॊ.थीबोसारख्या पाश्चात्य विद्वानाला हे पुस्तक मूळातून वाचण्यासाठी मराठी भाषा शिकावी लागली
त्या मराठी भाषेत गेल्या शंभर वर्षात फक्त तीन आवृत्त्या निघाल्या.प्रकाशनाला अव्वल व्यवसायाचे स्वरुप हे आत्ताच आले आहे आणी पुर्वी नव्हते असे नाही. ग्रंथलेखक आपल्या प्रस्तावनेत म्हणतात,"प्रस्तुत ग्रंथ शास्त्रीय पडल्यामुळे ह्याचा खप अर्थातच कमी होणार. त्यामुळे छापण्याचे मोठ्या खर्चाचे आणि जोखमीचे काम माझ्यासारख्याने झाले नसते." आर्यभूषण प्रेसने हा ग्रंथ छापला. इथे ज्योतिषशास्त्र हा शब्द खगोलशास्त्र या मूळ अर्थाने वापरला आहे, भविष्यशास्त्र या अर्थाने नव्हे. हा ग्रंथ दोन भागांमध्ये मांडला आहे.पहिल्या भागात वैदिक काल आणि वेदांगकाल यातील ज्योतिषशास्त्राचा इतिहास आहे. तर दुस-या भागात ज्योतिष सिद्धांत कालाच्या ज्योतिषशास्त्राचा इतिहास आहे. पहिल्या भागात शतपथ ब्राह्मणातील 'कृत्तिका पुर्वेपासून चळत नाही' अशा आशयाच्या वाक्यावरुन वेदकाळ काढला आहे.मेष,वृषभ या संज्ञा केव्हा निर्माण झाल्या? वार कधी प्रचारात आले? त्याकाळी वर्षारंभ कसा मानत? महाभारताचा काळ ठरवण्यासाठी दिक्षितांनी महाभारत सर्व दृष्टिने वाचले.पण त्यात वार व मेषादि संज्ञा सापडल्या नाहीत असा उल्लेख ते आवर्जून करतात. महाभारताच्या प्रक्षिप्त भागातून मूळ ग्रंथ शोधणे हे किती अवघड असते? गणिताद्वारे त्यांनी वैदिक काळ हा शकापुर्वी ६००० ते १५०० वर्षे व त्यानंतर वेदांग काळ हा शकापुर्वी ५०० वर्षे पर्यंत असा ठरवला, या मर्यादा स्थूल मानाने ठरवल्या आहेत.शकापुर्वी ५०० वर्षे च्या सुमारास मेषादि संज्ञा आपल्याकडे प्रचारात आल्या आणि त्यापूर्वी ५०० वर्षे अगोदर वार आले. ते खाल्डियन इजिप्शियन किंवा ग्रीक संस्कृतीतून आले असावेत असा निष्कर्ष दिक्षित साधार नोंदवतात. त्यांच्या मते महाभारताचा काळ शकापूर्वी ३००० ते १५०० वर्षे असा आहे.( पुस्तकातील उल्लेख शकाचे आहेत. वाचकांनी त्यात ७८ वर्षे मिळ्वल्यास इ.स. मिळतात) दुस-या भागात ज्योतिषशास्त्राच्या तीन स्कंदाविषयी सविस्तर विवेचन केले आहे.पहिला सिद्धांत वा गणित स्कंध दुसरा संहिता स्कंध व तिसरा जातक अथवा होरा स्कंध म्हणजेच फलज्योतिष विषयक काही माहिति दिली आहे. प्राचीन काळतील वेधयंत्रे,वेधपद्धती, अपौरुषेय ग्रंथ व इतर ज्योतिष ग्रंथकार यांची सविस्तर माहिती,अनेक प्रकारच्या पंचांगांची माहिती, निरनिराळ्या प्रांतांमधील पंचांगे, पंचांगातील त्रुटी व पंचांग संशोधन विचार यासाठी दिक्षितांनी ५० हून अधिक पाने खर्च केली आहेत. शेवटी उपसंहारात युरोपियनांच्या अभिप्रायांचे खंडन केले आहे. भारतीय ज्योतिषशास्त्राला वेधपरंपरा नाही या आक्षेपांचे जोरदार खंडन ग्रीकांपासून आम्ही काय घेतले? यामध्ये दिक्षित करतात. ग्रंथनिर्मितीसाठी उत्तेजना पुण्याच्या 'दक्षिणा प्राइझ कमिटी कडून त्यावेळी मिळाली.त्यासाठी त्यांनी ४५० रुपयांचे बक्षिसही ठेवले होते. ते १८९१ मध्ये दिक्षितांना मिळाले.परंतु हा ग्रंथ मुद्रित स्वरुपात १८९६ मध्ये आला आणि दोन वर्षांनी दिक्षितांचा मृत्यू झाला. आपल्या ४५ वर्षांच्या आयुष्यामध्ये ब-याच परिश्रमांनी निर्माण झालेल्या ग्रंथात अजूनही कमतरता आहे असं दिक्षितांना शेवटपर्यंत वाटत आलं. दिक्षित हे हुषार ज्योतिषी होते म्हणून एकदा एका संस्थानिकाने त्यांना वर्षफल वर्तवण्यास सांगितले पण दिक्षितांचा फलज्योतिषावर पूर्ण विश्वास नसल्याने त्यांनी ते नाकारले. तरी देखील "फलज्योतिषात तथ्य असावे असे मला अलीकडे वाटू लागले आहे. तथापि माझा पक्का विश्वास नाही.मी तत्संबंधाने शोध घेत आहे. या फलज्योतिषाच्या संबंधाने खरे थोडे व ढोंग फार असा प्रकार झाला आहे.तेव्हा यात खरे आहे तरी किती हे मला पहायचे आहे.म्हणूनच अलिकडे कुंडल्या टिपणे फलज्योतिषासंबंधी ग्रंथ वगैरे पहात असतो" असे दिक्षित एके ठिकाणी म्हणतात. दुर्दैवाने त्यांना पुढील संशोधनास अवसरच मिळाला नाही.असा हा ग्रंथ दुर्मीळ झाल्याने त्याची द्वितीयावृत्ती १९३१ साली आर्यभूषणनेच काढली. यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चि,वि,वैद्य, गो.स.आपटे यांनी मुक्तकंठाने प्रशंसन केले आहे. व ग्रंथाचे ऋण मान्य केले आहे. प्रा.र.वि.वैद्यांनी याचे इंग्रजी भाषांतर केले. हिंदीत तो अनुवादित झाला. भारत सरकार प्रकाशन व प्रकाशन ब्युरो सूचना विभाग उ.प्र. यानी तो प्रकाशित केला.पण मराठीत मात्र दुर्मिळ राहिला.महाराष्ट्र शासन प्रकाशनाने त्याची दखल घेतली नाही. शेवटी वरदा बुक्स यांनी त्या ग्रंथाचे महत्व लक्षात घेता तृतीय आवृत्ती १९८९ मध्ये काढली. जिज्ञासू व चिकित्सक अभ्यासकांना हा ग्रंथ म्हणजे पाटीभर फुलांच्या गुंजभर अत्तरासारखे आहे. ज्यातली माहिती डोळे झाकून प्रमाण मानावी एवढी विश्वासार्हता या ग्रंथामध्ये आहे. एखाद्या मुद्द्यावर इतरांची काय मते आहेत ही माहिती द्यायला ग्रंथलेखक विसरला नाही.
प्रकाशक - वरदा बुक्स, सेनापती बापट रोड पुणे ४११०१६ पृष्ठे:- ५६६ किंमत- चारशे रुपये फक्त

Reblog this post [with Zemanta]

No comments: