Monday, May 19, 2008

फलज्योतिष चाचणी च्या निमित्ताने

सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांनी फलज्योतिषाच्या संख्याशास्त्रीय चाचणीकरता समस्त ज्योतिषांना केलेल्या जाहीर आवाहनानंतर ज्योतिष वर्तुळात एकच खळबळ माजली. जणुकाहि हे एक ज्योतिषांवर मोठे संकट कोसळले असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्याचा एक भाग म्हणुन ज्योतिष परिषद पुणे चे अध्यक्ष श्री व.दा. भट यांनी एक १८ मे २००८ रोजी पुण्यात एक परिषद आयोजित केली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे श्री श्री भट होते. परिषदेत समस्त ज्योतिर्विदांना चाचणीवर आपले विचार व्यक्त करण्याचे आवाहन केले.


डॊ न.स फडके ज्योतिषी
यांना पुणे विद्यापीठाकडून planatery influences या विषयावर पी एचडी मिळाली असे सांगितले गेले. ते आपल्या भाषणात म्हणाले कि ज्योतिषाला उपासना व अध्यात्म याची जोड असावी लागते.तो चारित्र्यसंपन्न असावा लागतो. त्याशिवाय भाकिते खरी येत नाहीत. नुसत्याच कुंडल्यांवरुन अशा मतिमंद कि हुषार अशा प्रकारची वक्तव्ये करता येणार नाहीत. ज्योतिषांनि आपल्या व विषयाच्या मर्यादा लक्षात घेता या चाचणीच्या फंदात पडू नये. हे अंनिस चे कारस्थान आहे.

श्री शरदचंद्र गोखले - ज्योतिषी
या आवाहनानंतर अनेकांनी संख्याशास्त्र विभागाला भेट दिली आहे. आम्हि ही दिली. संख्याशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक जे संख्याशास्त्रिय चाचणी करणार आहे त्यांना या ज्योतिषातील कुठलेही ज्ञान नाही. डॊ. कुंटे यांना अनेक प्रश्नांची उत्तरे समाधानकारक देता आली नाहीत. ते फक्त संख्याशास्त्राचे मॊडेल्स वापरुन चाचणीचा अहवाल देणार आहेत. आयुकाचा यात नेमका रोल काय? असे विचारले असता त्यांनी ते झेरोक्सची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. त्यामूळे प्रसिद्धिमाध्यमांकडून हा जो गवगवा केला जातो अशा प्रकारचे चाचणीचे हे स्वरुप नाही. केवळ मोठ्या संस्थांची नावे गोवून प्रसिद्धीचा हा स्टंट आहे. पुणे विद्यापीठाची ही अधिकृत चाचणी नाही. एखाद्या पायलट प्रोजेक्ट ची संख्याशास्त्रीय चाचणी घेण्याचे अधिकार या डिपार्टमेंटला आहेत. त्यासाठी विद्यापीठाची परवानगी लागत नाही. तुम्ही आम्ही एखादा प्रोजेक्ट घेउन गेलो तर त्याचीही चाचणी हा विभाग करुन देउ शकतो.

श्री नंदकिशोर जकातदार - वराहमिहिर ज्योतिष विद्यापीठ
कर नाहि त्याला डर कशाला? आम्ही या चाचणीला तयार आहोत. फक्त त्यांनी एक उभयमान्य पंच समिति नेमावी त्यात आमचाही प्रतिनिधी असेल. चाचणीचे वेळी आम्हाला विचारात घेतले नाही. आता घ्यावे. ते जर आपले पुर्व ग्रह बाजुला ठेउन तटस्थपणे चाचणीचे आवाहन करीत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. ते जर चार पावले मागे जात असतील तर आपणही दोन पावले पुढे होउन सहकार्याचा हात पुढे केला पाहिजे या मताचा मी आहे. ज्योतिषशास्त्रातील नियम लावायचे झाले तर मुळ गाभा असलेले ५-६ नियमांच्या आधारे आपण हे विश्लेषण करु शकतो. त्यामुळे या चाचणीचे मी स्वागत करतो.

विंग कमांडर ओक - नाडी ज्योतिष समर्थक
मी ज्योतिषी वा ज्योतिषाचा अभ्यासक नसलो तरी पण ज्योतिषप्रेमी आहे. आयुका नारळीकर व संख्याशास्त्र विभाग यांना भरीस घालून हा डाव दाभोलकर धुर्तपणे खेळत आहेत. या बाबतीत खालील बाबींचा विचार ज्योतिष परिषदेने करावा.
१) ही परिक्षा का? - सध्या दोन्ही (महाराष्ट्र व अखिल भारतीय) अंनिसंकडे प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणताही हातखंडा प्रयोग नाही. डॉ. जयंत नारळीकरांना हाताशी धरून लाखो रुपयांची बक्षिसाची बोली न करता फुकटात ज्योतिषशास्त्राला बदनाम करण्याची संधी मिळवण्याकरिता, पुणे विद्यापीठाला व आयुकासारख्या संस्थांना त्यात गोवून लेखी बदनाम करण्याची ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
२) परराष्ट्रातील ज्योतिषांना तेथील विज्ञानवाद्यांनी जर चीतपट करून त्यांचे ज्योतिषशास्त्र शास्त्र नाही असे म्हणावयाला भाग पाडले असेल तर भारतीय ज्योतिषांना त्यांच्या (वैदिक) ज्योतिष शास्त्राला मुद्दाम वेगळे चीत करण्याची गरज काय? मात्र अंनिसचे प्रथमपासून तसे धोरण असल्यांने त्यांची चाल आपण समजू शकतो. पण या तऱ्हेचा ‘छळ’ डॉ. नारळीकरांना करण्याचे काही विशेष कारण असावे. अंधश्रद्धा निर्मूलन उर्फ जादूटोणा अघोरी विद्या प्रथा निर्मूलन कायदा सध्या मेलेलाही नाही पण जीवंतही नाही असा कोमात गेलेल्या अवस्थेत असल्याने त्याला प्राणवायू देण्यासाठी ही मोहीम हाती घेणे अंनिसच्या जीवन-मरणा इतके हातघाईवर आलेले प्रकरण आहे.

३) ही परिक्षा घेण्याचा यांना अधिकारच काय?
ही परीक्षा ज्या संस्थेतर्फे, ज्या प्रख्यात व्यक्तींच्या देखरेखीखाली केले जाणार आहे, त्यांनी ‘ज्योतिष’ हे शास्त्र तर नव्हेच मात्र ‘थोतांड’ आहे असे सिद्ध केल्याचे दावा मांडणारी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. अशांनी ही ज्योतिषांची परिक्षा पुर्वग्रह न ठेवता करणार असल्याचे सांगणे म्हणजे मनी मावशीने उंदराला मी सध्या ‘उपवास’ करत हे म्हणून तुला मुळीच खाणार नाही असे आश्वासन देण्यासारखे आहे.
४) ज्या पुणे विद्यापीठाने ज्योतिषशास्त्राला शैक्षणिक दर्जा देण्यास ठाम नकार दिला आहे, त्या विद्यापीठातील संख्याशास्त्र विभाग या परिक्षेचा निकाल ठरवणार (की लावणार?) असल्याने ही परिक्षा खरोखरच निःपक्षपाती असणार कि नाही याची सर्वसामान्यांना कल्पना आहे. मात्र ही चाल उलट पडून ज्या सामान्य लोकांचे मत परिवर्तन करण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे, ते सामान्य लोक ज्योतिष शास्त्राच्या आणखी जवळ करण्याची शक्यता आहे. भले ज्योतिष शास्त्र असो वा नसो ज्या ज्योतिषांच्यामुळे आम्हाला मानसिक व भावनिक आधार मिळतो त्यांना नष्ट करणाऱ्या संस्था व प्रसिद्ध व्यक्तीं बाबतचा
आदर कमी होऊन त्यांच्या अन्य क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल आमच्या मनात एक प्रकारची अढी बसवण्याची कामगिरी या परीक्षेमुळे नक्की होणार आहे.
५) पुर्वी गावागावातून वादविवाद करून विजयपत्रे मिळवून हत्तीवरून फिरून दरारा व प्रसिद्धी मिळवली जायची त्याचीच ही आधुनिक आवृत्ती आहे.

ज्योतिषांना विनंती –
१) ही परिक्षा हा एक सापळा आहे. जे ज्योतिषी वैयक्तिकरित्या खोट्या व तात्कालिक लोकप्रियतेच्या आमिषाला बळी पडतील त्यांच्यामुळे ज्योतिष शास्त्राचे हसे होईलच पण भविष्यकाळात अन्य भारतीय (हिंदू) विद्या उदा. आयुर्वेद, योगासने, अध्यात्म व अन्य शास्त्रे, यांच्यावर हल्ला करण्यासाठी विरोधकाना धारदार शस्त्र मिळाल्यासारखे होईल.
२) हे आव्हान ज्योतिषशास्त्राला आहे. त्यामुळे त्याला संस्थांतर्गत उपाय योजना करून तोड काढली पाहिजे. त्यासाठी सर्व ज्योतिषशास्त्र संचलन करणाऱ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातील संस्थांनी एकत्र येण्याची ऐतिहासिक गरज निर्माण झाली आहे. वैयक्तित मतभेद वा मतांतरांना आत्ता स्थान नाही. या निमित्ताने एक संयुक्त समिती स्थापन करून ह्या आव्हानाला एकत्रित व कायमचे बंद करायला हवे आहे.
३) महाराष्ट्राबाहेरील चौबे-पांडे, त्रिवेदी, श्रीमाली टाईप उत्तर भारतीय ज्योतिषी अशा आव्हानांना तात्काळ बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्यांना समोरील पक्ष किती बनेल व धूर्त आहे याची नीट कल्पना नाही. मात्र मराठी लोकांना विरोधकांचे छक्केपंजे चांगलेच ज्ञात आहेत.
४) हुशारी हा निकष लावण्यातील त्यांची ‘हुशारी’ लक्षात घेण्यासारखी आहे. ८० टक्केवाला ढ, ९० टक्केवाला बरा व फक्त गणितात १०० गुण मिळवणारा खरा हुशार असे म्हणून ‘मार्कशीट’ वरून हुशारीची प्रतवारी करून / पाडून ज्योतिषीय अंदाज खोटे पाडण्यासाठी खेळी म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.
५) या ऐवजी असे निकष असावेत की जे तात्काळ व प्रत्यक्ष पडताळता येतील शिवाय ज्योतिषशास्त्रातही त्याची पडताळणी करण्यासाठी विशिष्ट असे आडाखे उपलब्ध असतील. (सहज सुचले म्हणून - आंधळा, पाय वा अन्य अवयव तुटका, पोलिओ, पांढरे कोडवाला व्यक्ती)
६) जो जिंकेल त्याला काय मिळणार?
अंनिस आणि पार्टी ही परिक्षा जिंकणार हे ठरवून ठेवलेले उत्तर असल्याने ‘ज्योतिषाचा धंदा कायदेशीररित्या बंद करावा’ ही अट स्वाभाविकपणे मान्य करायला लावणे ही त्यातली मेख आहे. ९० टक्यांखाली उत्तरे बरोबर आली तर ती लढाई ‘अनिर्णित’ झाली असून जोवर अंनिसकडून तिचा ‘निकाल’ लागत नाही तोवर ती खेळली पाहिजे, असा धर्मराजाला शेवटपर्यंत द्यूत खेळायला भाग पाडणारा व त्याला पुरते नागवले जाण्याला प्रवृत्त करणारा हा आधुनिक शकुनीमामांचा घाट आहे.
७) पण याही परिस्थितीत ज्योतिषांनी ही परिक्षा जिंकली तर?
अशी अट घालता येईल - अंनिस व त्यांच्या विचारांच्या जगातील सर्व संस्थांतर्फे ‘पराजयपत्र’ दिले जावे. शिवाय यापुढे अन्य कुठल्याही प्रांतात, नव्हे जगात कुठेही जर कोणी अशी परिक्षा करण्याची शक्कल काढेल तर त्याला डॉ. नारळीकर व डॉ. दाभोलकर त्यांच्या अखत्यारीतील सर्व ज्योतिषशास्त्र विरोधी संस्था जातीने ज्योतिषशास्त्राच्या बाजूने लढतील व ज्योतिष ‘शास्त्र’ कसे आहे याचे प्रात्यक्षिक करून त्यावेळच्या विरोधकांची तोंडे बंद करतील. असा लेखी ‘कबूलनामा’ त्यांनी द्यायला हवा. तसे काही न करता जर ही परिक्षा केली जाणार असेल तर ती क्रिकेटच्या कसोटी सामन्याप्रमाणे एक न संपणारी कसोटी
ची मालिकाच ठरेल.
८) भविष्य काळात जर सर्व अटी मंजूर झाल्या तर अशा परिक्षेसाठी प्राचार्य अद्वयानंद गळतगे. मु. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. पिन – ५९१२६३. (फोन ०८३३८-२९३३९९ व मो. ०९८८६६७८१८३) यांना अन्य पंचांसमावेत नियुक्त केले जावे. ते पंच बनण्यासाठी अत्यंत लायक असण्याची दोन कारणे आहेत.
१. पूर्वी सांगलीत गिरिश शहांच्यातर्फे अशा तऱ्हेच्या ज्योतिष शास्त्राच्या कसोटीसाठी प्रा. अद्वयानंद गळतग्यांनी पंच म्हणून काम करण्याचे उत्स्फूर्तपणे मान्य केले होते. ‘त्यावेळी डॉ दाभोलकरांनी शहांना आव्हान देऊन पलायन केले’ असे वर्णन त्यांनी त्यांच्या ‘विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन’ या अंनिसच्या फसलेल्या मोहिमांवर आधारित पुस्तकात केले आहे.
२. प्राचार्य अद्वयानंद गळतग्यांनी १२-१३ वर्षापूर्वी डॉ. नारळीकरांना शास्त्रीय कसोटी करण्याला आवाहन करण्यासाठी लागोपाठ पाच सविस्तर पत्रे पाठवून मनधरणी केली होती. (ती पाचही पत्रे ‘बोध अंधश्रद्धेचा’ पुस्तकात समाविष्ट आहेत) त्यावेळी त्यांनी दाद दिली नव्हती. कदाचित त्यामुळे त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली असेल. कारण आता ते म्हणतात की बऱ्याच काळापासून त्यांच्या मनात असे करण्याचे घाटत होते!


धुंडीराज पाठक - वास्तु ज्योतिषतज्ञ
मी अंनिसला पुरता ओळखून आहे. जादुटोणा विरोधी कायदा अर्थात अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदा पास करुन घेण्यासाठी ही खेळि दाभोळकर खेळत आहेत. याच कायद्या आधारे ज्योतिषांना आत टाकण्याचा त्यांचा मानस आहे. मुळात फलज्योतिष हे शास्त्र आहे, हे अंनिससमोर सिद्ध करण्याची गरजच काय ? ही मंडळी खोटारडी असून त्यांच्याकडून डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा वापर करून घेतला जात आहे. `फलज्योतिष हे शास्त्र नाही', हे अंनिसवाल्यांनी अगोदरच ठरवून टाकले आहे. या चाचणीचे खोटेनाटे निष्कर्ष जमा करून ते विधिमंडळात न्यायचे व वादग्रस्त अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे कथित महत्त्व पटवून देऊन तो मंजूर करून घ्यायचा, हाच या चाचणीमागील मुख्य हेतू आहे. या कायद्यामुळे `ज्योतिष' या विषयावरच बंदी येणार असल्याने असल्या चाचण्यांना विरोध करण्यापेक्षा थेट या कायद्यालाच विरोध करणे ज्योतिषांच्या हिताचे ठरेल तुम्ही अंनिस च्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. त्यात जागोजागी खोटारडे पणा आहे. दाभोळकर हा अत्यंत खोटारडा माणुस आहे. आज आपल्याला अंनिसला टाळता येणार नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षही करता येणार नाही. आपली वेद पुराणे धर्म संस्कृती यावर हे लोक तुटून पडत असतात. आपणही हिंदु एकता, सनातन प्रभात, बजरंग दल, पतितपावन अशा संघटनांची मदत घेतली पाहिजे. हा दाभोळकर तरी एकवेळ बरा पण तो शाम मानव एकदम बेकार माणुस आहे.
श्रीकृष्ण जोशी नावाचे एक गृहस्थ म्हणाले कि हे लोक नारळीकरांना जर हाताशी धरत असतील तर आपण भटकरांना हाताशी घेतले पाहिजे. आमची त्या दृष्टीने भटकरांशी बोलणी चालू आहेत लवकरच आम्ही पत्रकार परिषद घेउन आमची वैज्ञानिक चाचणी जाहीर करु.


व दा भट - ज्येष्ठ ज्योतिषी
आपणच ज्योतिषांनी प्रथम एकत्र येउन वर्षभरात अशी चाचणी डिझाईन केली पाहिजे. नारळीकर म्हणतात तशी पुर्वग्रह विरहीत चाचणीमागे काय दडलय हे आम्ही जाणतो. नंदकिशोर जकातदारांना यात लपलेला कावेबाजपणा दिसत नाही. त्यांना ही साधी सोपी गोष्ट वाटते.माझी त्यांना विनंती आहे कि त्यांनी याचा फेरविचार करावा.
या लोकांनी मतिमंद मुलांच्या शाळेत जाउन डेटा गोळा केला आहे. आम्हीही असा डेटा शाळेतून गोळा करु. त्याआधारे मतिमंद मुलांच्या पत्रिका कुठल्या हे आम्हाला सहज कळेल. पंधरा दिवस सुद्धा खुप झाले यासाठी. पण आम्ही असा खोटारडेपणा करणार नाही. चाचणी डिझाईन करताना त्यांनी ज्योतिष संस्थांना विचारात घेतले नाही. यांनी परस्पर एकतर्फी चाचणी ठरवली. मतिमंद मुलांच्या पत्रिकांचे पमाण खुपच कमी असते. लाखात एखादे. किति लोकांनी अशा पत्रिकांचा अभ्यास केला आहे? आपल्या वाट्याला अशा पत्रिका कमीच येतात. तेवढ्यात एका बाईंनी हात वर करुन आपण अशा पत्रिका जमविल्या असुन त्याचा अभ्यास चालू आहे. त्यावर भटांनी तुम्ही शंभरात एखादे उदाहरण असल्याचे सांगुन चाचणी घेणायांची विश्वासार्हता कशी तपासणार? दाभोळकर नारळीकरांची मते सर्वांना माहित आहेतच. मग यांना तटस्थ पुर्वग्रह विरहित कसे म्हणता येईल. आता या चाचणीत कोणीही सहभागी होउ शकतो. ज्योतिषी कुणाला म्हणायचे? यांचेच कार्यकर्त्यांनी ज्योतिषी म्हणून चाचणीत येउन मतिमंद / हुशार अशी रॆंडम टिकमार्क करुन जातील. आम्ही वि.म. दांडेकरांबरोबर हा मतिमंद व हुशार मुलांचा प्रोजेक्ट केला होता. दुर्दैवाने तो अपुरा राहीला.
हौशी ज्योतिषी प्रसिद्धिच्या मोहापायी या कटात बळी पडण्याची शक्यता आहे.तसेच अनेक छोट्या छोट्या संस्था विखुरलेल्या आहेत.त्याही बळी पडू शकतात.

सभ्रेचा ठराव
सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ ज्योतिर्विद श्री श्री भट यांनी शेवटी एक ठराव पारित केला. ठराव पुढीलप्रमाणे होता -
डॉ. जयंत नारळीकर व अंनिस यांनी दिलेले आव्हान आम्हा सर्व ज्योतिषांना अमान्य आहे. ज्योतिषशास्त्राकडे पूर्वग्रहदूषितपणे पहाणार्‍या अंनिसने व तिच्याबरोबर असणार्‍या डॉ. नारळीकर यांनी जनतेची विश्‍वासार्हता गमावली आहे. ही चाचणी संशयास्पद असून तिला कोणीही प्रतिसाद देऊ नये.

3 comments:

साधक said...

धुंडिराज पाठकांचे नाव ऐकल्या सारखे वाटते. ते कुठल्या शहरी असतात?

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ said...

आज नुकतेच वरील धाग्यावरील माझे विचार परत वाचायला मिळाले. आपण कष्टपुर्वक ते नमूद केल्याने निदान त्यांची नोंद झाली आहे याचे समाधान मिळाले. विशेषतः हात मोडून येईल असे टायपिंग करत बसायला कष्ट ही पडले असतील व वेळ ही दिला असेल.
भविष्य काळात अशी काही खेळी केली गेली तर त्यासाठी वरील मुद्दे लक्षात राहायला मदत मिळाली धन्यवाद...

Kshiteej Anokar said...

खरे तर अनिस काय किंवा इतर कोणतीही संगठना काय , तिच्या आवाहनाला उत्तर देण्यात काहीही गैर नाही, आणि मूळ विषयाला हात न लावता मांडणी खोडून काढण्याच्या दृष्टीने जोतीर्विद मंडळी का विचार करत नाही, हे मला कळत नाही.