Thursday, October 02, 2008

फलज्योतिष चाचणी समन्वय

फलज्योतिष चाचणी समन्वय

चाचणीची पार्श्वभूमी
"फलज्योतिष चिकित्सा मंडळ" या अनौपचारिक संवादी भुमिकेतुन कै. माधव रिसबुड व मी १९८८ पासुन फलज्योतिषाची चिकित्सा करत असु. त्यातुनच ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचा २००१ मध्ये जन्म झाला. पुस्तक प्रकाशन माधव रिसबुडांच्या हस्ते झाले. प्रकाशनाच्या निमित्ताने ज्योतिषी नंदकिशोर जकातदार व डॊ दाभोलकर

यांचा वाद संवाद एकाच व्यासपीठावर प्रथमच घडवुन आणला. पुस्तकाच्या निमित्ताने प्रो. नारळीकरांशी संपर्क आला. चर्चा झाली. पुस्तकाच्या दुस-या आवृत्तिचे १३ एप्रिल २००३ च्या रविवार लोकसत्ता मध्ये त्यांनी सविस्तर परिक्षण लिहिले होते. त्यामुळे लोक पुस्तक विकत घेउन वाचण्यास प्रवृत्तही झाले होते.आपल्याला इथे ते परिक्षण पहाता येईल. फलज्योतिषाची एक वैज्ञानिक चाचणी व्हावी अशी भुमिका त्यांनी मांडली होतीच. अर्थतज्ज्ञ कै. वि. म दांडेकर यांनी मतिमंद मुलांच्या व हुषार मुलांच्या कुंडल्यांवर त्यांना समंजस वाटणा-या ज्योतिषांच्या समन्वयातुन
१९८९ च्या दरम्यान या अगोदर काम केले होते. परंतु त्याचे स्वरुप हे संस्थात्मक व लोका्भिमुख नव्हते.त्या काळात दांडेकर उत्साही होते. ज्योतिषांच्या सोबत दीर्घ काळ घालवल्या नंतर भारत इतिहास संशोधन मंडळातील ज्योतिषांच्या
कार्यक्रमातील भाषणात त्यांनी म्हटले, ''जर शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम असतील तर तो नियम कसला?`` अंनिस व ज्योतिष यांचा संबंध हा नेहमीच "आव्हानात्मक" पातळीवर होता. ज्योतिषांच्या दृष्टीने ही बाब पुर्वदुषित ग्रह हीच होती. काही ज्योतिषी दाभोलकरांना खोटारडा व प्रसिद्धी लोलुप मनुष्य असे मानत होतेच. जादुटोणा विरोधी कायदा हा ज्योतिषाच्या विरुद्ध आहे व त्यामुळे आपल्या पोटावर पाय आणणारा हा गृहस्थ आहे असा समज करुन घेउन त्यांच्यावर राग होताच. दाभोलकर हे त्यांच्या टीकेचे नेहमीच लक्ष्य होते.प्रो नारळीकर हे समाजाभिमुख असलेले खगोलशास्त्रज्ञ म्हणुन जगाला सुपरिचित आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचा आपल्याला फायदा व्हावा म्हणुन अनेक समाजकरणी व राजकारणी देखील धडपडत असतात.फलज्योतिष विषयक त्यांची मते ज्योतिषांना मान्य नसली तरी त्यांचा मृदू स्वभाव व स्मित हास्य यामुळे ते ज्योतिष वर्तुळात ही लोकप्रिय आहेत. प्रो.नारळीकरांची भुमिका ही पुर्वदुषित ग्रह न बाळगता वैज्ञानिक दृष्टीकोनातुन फलज्योतिषाची चाचणी व्हावी अशीच होती.त्यासाठी ज्योतिषांचा सहभाग अपरिहार्य होता. ज्योतिषी स्वत:हून चाचणी तर करणार नव्हते. त्यांना त्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक होते. मग आवाहनात्मक पातळीवर चाचणी ही भुमिका एक समंजस मार्ग होता.

चाचणीत कमीत कमी त्रुटी राहण्यासाठी पारदर्शकता, विश्वासार्हता व परस्पर समन्वय या बाबी मह्त्वाच्या होत्या. मी अंधश्रद्धा निर्मुलन समितीत अल्पसे का होईना काम केले असल्याने मला चाचणी प्रकल्प समन्वयक अर्थात दुवा म्हणुन काम करण्याची जबाबदारी व संधी दोन्ही चालून आल्या. मूलत: ज्योतिष चिकित्सक असल्याने चिकित्सा होताना विषयावर अन्याय होणार नाही ही बाब माझ्या दृष्टीने मुल्यात्मक होती. विषयाच्या मर्यादा, व्याप्ती व व्यावहारिकता या बाबी चाचणीच्या दृष्टीने
महत्वाच्या होत्या. ज्यांनी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद हे पुस्तक वाचले आहे त्यांना याची कल्पना येईल. ते पुस्तक नवागतांना इथे वाचता येईल.

चाचणीची सुरुवात
डॊ. दाभोलकर व प्रो. नारळीकर यांच्या भेटीनंतर मतिमंद मुलांच्या व हुषार मुलांच्या कुंडल्यांची चाचणी ही बाब निश्चित झाली.या चाचणीमध्ये मतिमंदहुषार शब्दांची व्याख्या खालील प्रमाणे आहे.
१) मतिमंद- जो मुलगा मतिमंद मुलांच्या शाळेत जातो तो.
२) हुषार - जो मुलगा सर्वसाधारण मुलांच्या शाळेत जातो व सातत्याने तीन वर्षे ७० ट्क्केंपेक्षा जास्त गुण मिळवतो तो.
संख्या शास्त्र विभागाचे प्रो. अनिल गोरे यांनी प्रत्येकी शंभर कुंडल्यांचा डेटा सध्या संख्याशास्त्रीय चाचणीसाठी पुरेसा आहे असे व्यावहारिक सुचना दिली. चाचणीला मुर्त स्वरुप येईपर्यंत प्रो.गोरे हे निवृत्त झाले व परदेशी गेले.पण तो पर्यंत प्रो.सुधाकर कुंटे हे अत्यंत उत्साही निवृत्त प्राध्यापक हे संख्याशास्त्र विभागाचे भुषण म्हणता येईल असे गृहस्थ आले. तरुणालाही लाजवेल असा यांचा उत्साह. विभाग प्रमुख प्रा उत्तरा निंबाळकर यांनी त्यांच्या कार्याची ओळख करुन दिली. कुंटेसरांनी चाचणीच्या सर्व बाजू समजावुन घेतल्या व एक संख्याशास्त्रीय मॊडेल तयार केले. तो पर्यंत फलज्योतिष चिकित्सा मंडळाच्या आंतरजालीय आवाहनातुन अमेरिकेतील बाल्टिमोर येथील हाफकिन इन्स्टीट्युट मध्ये सहयोगी प्रा. डॊ. धनंजय वैद्य यांनी एक संख्याशास्त्रीय
मॊडेल तयार केले. औषधांची परिणामकारकता या विषयातील संख्या शास्त्रीय चाचणी हा त्यांचा विषय असल्याने त्यांनी अगदी आमच्या आंतरजालीय मैत्रीचा मान राखुन सहज सहकार्य केले. वेळॊवेळीच्या घटनांचे प्रो. नारळीकर अवलोकन करत होतेच. शेवटी १२ मे २००८ ला चाचणी घोषित करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यास प्रो. नारळीकरांनी मान्य केले.
चाचणीबाबत ब्लॊगवर इथे लिहिले आहेच.

चाचणीतील कुंडल्यांची विश्वासार्हता
आमचेकडील सर्व दोनशे पत्रिकांमधील जन्म टिपण हे त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी आपल्या सही निशी विहित नमुन्यात शाळेच्या प्रमुखां मार्फत पाठवले आहे त्यामुळे ही माहिती या चाचणीकरिता प्रमाण मानली. दिलेला डेटा हा अस्तित्वात असलेल्या जिवंत व्यक्तीचाच असल्याने इथे अंनिस चे कुंडली जिवंत व्यक्तीची का मृत व्यक्तीची हा आव्हानाचा भाग नव्हता व
लबाडीचाही नव्हता.आलेल्या माहितीतून मी ज्योतिषीकिय भुमिकेतुन कुंडल्या तयार केल्या. त्यासाठी खालील मुद्दे विचारात घेतले.
१) सुस्पष्ट अक्षरातील माहिती असलेले फॊर्म ग्राह्य धरले
२) पालकांची सही नसलेले फॊर्म्स अग्राह्य धरले.
३) फॊर्म वरील माहितीत अंतर्विसंगती आढळ्ल्यास अग्राह्य धरले
४) शंका आल्यास संबंधित पालकांना फोन करुन जन्मस्थळ जन्मवेळ व जन्मतारीख या माहितीची खात्री केली.
५) कुंडली तयार करण्यासाठी कुंडली २००२ हे व्यावसायिक ज्योतिष सॊफ्टवेअर वापरले.
६) ज्योतिष गणित करुन सदर सॊफ्टवेअर अचुक कुंडली तयार करते याची खात्री केली
७) कुंडली ही निरयन पद्धतीची असुन सरकार मान्य व ज्योतिष मान्य असलेले चित्रा पक्ष अयनांश घेतले आहेत. थोडक्यात दाते पंचांगानुसार कुंडल्या तयार केल्या आहेत.
८) जन्मस्थळे ही छोटी गावे असल्यास जवळील मोठ्या गावांचे अक्षांश रेखांश घेतले आहेत.
९) जन्मराशी बदल वा जन्मनक्षत्र बदल अशा संधि वर असलेल्या पत्रिका विश्लेषणाला अवघड असल्याचे कारण नको म्हणुन अग्राह्य ठरविण्यात आल्या.
१०) स्पष्ट ग्रहांसहित असलेली कुंडली घेतली व जन्मस्थळ, जन्मवेळ व जन्मतारीख ही माहिती सोबत असल्याने ज्योतिषाला स्वत: पत्रिका तयार करायला व केलेल्या पत्रिकेची अचुकता तपासायला मुभा ठेवली.

थोडक्यात अभ्यासु वृत्तीच्या ज्योतिषाला कुंडलीवरुन आडाखे बांधण्यासाठी लागणा-या ज्योतिषिकीय डेटाची विश्वासार्हता कायम बाळगली. जातक जेव्हा ज्योतिषाला कुंडली बनविण्यासाठी माहिती देतो ती त्याच्या आईवडिलांनी त्याला दिलेली असते.ती खरी आहे असे गृहित धरुन कुंडली तयार केली जाते. ती चुकीची असण्याची जेवढी शक्यता आहे तेवढीच शक्यता चाचणी साठी असलेल्या कुंडल्यांबाबत येथे आहे. दिलेल्या कुंडल्याच चुकीच्या होत्या त्यामूळे आमचा निष्कर्ष चुकला हा ठपका चाचणीत मला नको होता. रिसबुडांनी एक ज्योतिषाच्या चाचणी करिता त्यांच्या मुलाची कुंडली धनुर्धारी मासिकाला पाठवली होती. ती ज्योतिषाने बनविली होती. तरी देखील त्यात त्रुटी होती. गणित फारच ढोबळ मानाने केले होते. कृष्णमुर्ती पद्धतीने तपासणा-या ज्योतिषाला ती करेक्ट करुन घ्यावी लागली. आम्ही देखील ज्योतिषाने ती बनविली असल्याने फारसे लक्ष दिले नव्हते. संबंधित ज्योतिषाने जेव्हा लक्षात आणुन दिले त्यावेळी आम्हीही ती तपासुन पाहिली तर त्यात खरोखर त्रुटी होती. इथे तसा प्रकार होउ नये याची दक्षता संगणकाद्वारे घेतली गेली. संगणकाला चुकीचा फीड जाउ नये यासाठी काम अत्यंत सावकाश केले गेले. कुंडलीचा डेटा हा गुप्त ठेवण्यात आला. डॊ. दाभोलकरांच्या विषयी ज्योतिषांच्या मनात अविश्वास असल्याने चाचणीच्या विश्वासार्हतेला तडा जाउ नये म्हणुन डॊ.दाभोलकरांच्या पासूनही हा विदा गुप्त ठेवण्यात आला होता. प्रकाश घाटपांडे,प्रो.नारळीकर व डॊ. कुंटे यांनाच या कुंडल्यांबाबत माहिती होती.जेव्हा प्रत्यक्ष कुंडल्या ज्योतिषांना दिल्या गेल्या त्याअगोदर त्याचे संख्याशास्त्रीय सांकेतिकीकरण झाले व पुढील भाग हा केवळ प्रो. कुंटे यांच्याच अखत्यारीत राहिला. सांकेतिकीकरण व रॆंडम सॆंपलिंग याच पद्धतीने सुमारे ४० पत्रिकांचा संच हा प्रयोगासाठी वापरला गेला. चाचणीचे निकाल आता लवकरच बाहेर पडतील.

No comments: