Thursday, October 09, 2008

फलज्योतिष चाचणीचा अहवाल

फलज्योतिष चाचणी प्रसिद्ध झालेवर १-२ दिवसातच आम्हाला अंदाजे १५० दुरध्वनी आले. विचारणा करणा-या व्यक्ती महाराष्ट्रभर पसरलेल्या होत्या. आम्ही त्यांना पोस्टाची तिकीटे असलेला लिफाफा व विहित नमुन्यातील स्वत:बद्दलची माहिती पाठवण्यास सांगितले.

दरम्यान एक ज्योतिषांचे मंडळ श्री सुधाकर कुंटे यांना भेटले. या मंडळात प्रमुख श्री श्री श्री भट अध्यक्ष महाराष्ट्र ज्योतिष परिषद , श्री व.दा. भट अध्यक्ष पुणे ज्योतिष परिषद व अन्य काही ३-४ ज्योतिषी होते. श्री नरेंद्र दाभोलकर यांचा या चाचणीत सहभाग असल्याने या ज्योतिषी लोकांचा चाचणीच्या विश्वासार्हतेवर आक्षेप होता. प्रा कुंटे यांनी चाचणीबाबतची सर्व माहिती दिली. तसेच डॊ.नारळीकर व डॊ दाभोलकर यांचा या चाचणीतील प्रत्यक्ष सहभाग वा हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले.त्यांनी पुढे असेही सांगितले कि ही चाचणी संख्याशास्त्रज्ञ या नात्याने व जबाबदारीने ते स्वत:च हाताळणार आहेत.ही चाचणी जास्तीत जास्त निरपेक्ष व 'डबल ब्लाईंड' या पद्धतीने हाताळली जाणार आहे.परंतु हे स्पष्टीकरण ज्योतिषी मंडळास पुरेसे समाधान कारक वाटले नाही व दि. १८ मे रोजी झालेल्या पुण्यातील ज्योतिषांच्या सर्वसाधारण सभेत चाचणीवर बहिष्कार घोषित केला. या सभेचे अध्यक्ष श्री श्री भट हे होते.

हा बहिष्कार असताना सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातुन सुमारे ५१ ज्योतिषी मंडळींनी आम्हाला तिकीटे लावलेला लिफाफा पाठवून पत्रिकांचे संच मागवुन घेतले. या सर्व मंडळींनी संच मिळाल्यापासून एक महिन्यात उत्तरे पाठवावीत ही अपेक्षा होती.
दरम्यान १ जून २००८ रोजी भारत इतिहास संशोधक मंडळात श्री नंदकुमार जकातदार यांनी ज्योतिष विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता. परिसंवादाच विषय "ज्योतिषशास्त्राला चाचणीची आवश्यकता आहे काय?" असा होता. या परिसंवादात काही ज्योतिषी मंडळींबरोबरच प्रा.कुंटे व डॊ. नरेंद्र दाभोलकर यांना आमंत्रित केले होते. डॊ. दाभोलकरांनी "फलज्योतिष हे विज्ञान का नाही?" या विषयावर विवेचन केले. प्रा कुंटे यांनी प्रस्तुत चाचणीसंबंधी संख्याशास्त्रीय अंगाने असलेली सर्व माहिती दिली. त्यांनी पुढे असेही सांगितले कि फलज्योतिषाला विज्ञान म्हणुन मान्यता हवी असल्यास अशा प्रकारच्या चाचण्यांना सामोरे जावेच लागेल.याला पर्याय नाही.फक्त हीच चाचणी अंतिम न धरता अशा प्रकारच्या अनेक चाचण्या अनेक लोकांनी अनेक वेळी अनेक मुद्यांसंबंधी घेणे आवश्यक आहे. त्यांनी पुढे असे प्रतिपादन केले कि आताच्या चाचणीत सहभाग घेण्याकरिता वर्तमानपत्राच्या माध्यमातुन ज्योतिषप्रेमींना आवाहन केले होते. त्यामुळे स्वत:ला ज्योतिषी समजणारा कोणीही यात सहभागी होउ शकेल. त्यामुळे या चाचणीचे निष्कर्ष हे ज्योतिष नियमांचे न राहता ज्योतिषी मंडळी ज्या प्रकारे समाजात वावरतात त्या समुहाचीच चाचणी असेल. ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी समारोपाच्या भाषणात असे सांगितले कि ते कोणत्याही विचारलेल्या प्रश्नाबद्दल निष्कर्ष काढण्याकरिता ज्योतिषातील दहा नियमांचा संच देउ शकतात. या संचातील नियम वापरुन कोणत्याही पत्रिकेबाबत निर्णय घेता येईल. त्यांनी अशा प्रकारच्या चाचण्या मध्ये जास्तीत जास्त ज्योतिषी मंडळींनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. फक्त या चाचण्या निष्पक्षपातीपणे व ज्योतिषी मंडळींच्या सल्ला मसलतीने तयार केलेल्या असाव्यात.
लागलीच दुस-या दिवशी प्रा. कुंटे श्री जकातदारांना भेटले व त्यांनी सुचवलेल्या चाचण्यांबद्दल चर्चा केली. या भेटीत एक सुचना समोर आली ती अशी कि संस्थात्मक पातळीवर एक समांतर चाचणी घ्यावी. ज्यात सर्व दोनशे पत्रिका संस्थांना दिल्या जातील. या पत्रिका सांकेतिक क्रमांक दिलेल्या असतील. संस्थांच्या सदस्यांनी संयुक्तपणे त्या पत्रिकांबाबत अनुमान कळवावे. ज्या योगे ज्योतिषशास्त्रीय नियमांची जास्त चांगल्या प्रकारे तपासणी करता येईल असे वाटते. श्री जकातदार यांनी या प्रस्तावास स्वत: मान्यता दिली व इतर ज्योतिष संस्थांचा सहभाग मिळवण्याबद्दल पण आश्वासन दिले. या प्रकारच्या समांतर चाचणी बद्दल एक परिपत्र एक विविध संस्थांकडे पाठवण्यात आले. दुर्दैवाने या उपक्रमास फक्त दोनच ज्योतिषसंस्थांची संमती मिळाली. त्या संस्था म्हणजे श्री मारटकर यांची ज्योतिषप्रसारक मंडळ व श्रीमती सुनंदा राठी यांचे चिरंजीव ऎस्ट्रो रिसर्च इन्स्टीट्युट या होत. श्री नंदकुमार जकातदारांची संस्था कुठलेही स्पष्टीकरण न देता यात सहभागी झाली नाही.फक्त मारटकरांच्या ज्योतिष प्रसारक मंडळानेच सर्व दोनशे पत्रिकांचा संच तपासून वेळेत उत्तरे पाठवली. श्रीमती सुनंदा राठी यांच्या संस्थेने कोणतेही स्पष्टीकरण न देता उत्तरे पाठवली नाहीत.
श्री श्री भटांनी घातलेला बहिष्कार कायम ठेवून देखील ते प्रो. कुंटेंशी संपर्कात राहिले. त्यांनी आपले एक पुस्तक जे त्यांच्या म्हणण्यानुसार काही विद्यापीठात क्रमिक पुस्तक म्हणून वापरले जाते ते प्रो. कुंटे यांना भेट दिले. या पुस्तकातील एका नियमाप्रमाणे पत्रिकेवरुन व्यक्तीचे लिंग ओळखता येते. या नियमाची सत्यता कमीत कमी ६०% तरी आहे. आम्ही हा नियम आमच्या कडील दोनशे पत्रिकांना लाउन पाहिला असता त्यातील ९४ पत्रिकातच फक्त अचुक निदान मिळाले. अचुक नियमाची शक्यता ६०% तरी असल्यास दोनशे पैकी ९४ च अचुक उत्तरे येण्याची शक्यता ५% पेक्षाही कमी असते. एका दुस-या मुलाखतीत श्री भटांनी प्रो. कुंटे यांना तीन नियमांचा एक संच दिला जो पत्रिकेसाठी वापरुन व्यक्ती हुषार आहे का? हे ठरविता येते. हा नियमांचा संच आमच्या दोनशे पत्रिकांवर लावल्यावर त्यातील दीडशे जण हुषार निघाले. या दीडशे पैकी ७५ खरेच हुषार होते. व बाकीचे ७५ हे मतिमंद होते. हे सर्व आकडे स्वत:च बोलके आहेत.
आता आपण प्रस्तुत चाचणीच्या निष्कर्षांबद्दल माहिती घेउ. ५१ ज्योतिषी मंडळींनी जरी पत्रिकांचे संच मागवून घेतले असले तरी शेवटी फक्त २७ मंडळींनीच त्यांची उत्तरे परत पाठवली. बाकी २४ मंडळींनी उत्तरे न पाठवण्याबद्दल काही खुलासाही केलेला नाही. या सत्तावीस ज्योतिषांपैकी २६ जणांनी त्यांची व्यक्तिगत माहिती पुरवली आहे. त्या माहितीचे विश्लेषण खालील प्रमाणे.
१५ ज्योतिषी छंद म्हणून ज्योतिष पहातात तर ८ जण हे व्यावसायिक ज्योतिषी आहेत. अन्य ३ जणांनी ही माहिती पुरवली नाही. ८ व्यावसायिक ज्योतिषांचा सरासरी अनुभव १४.४ वर्षे एवढा आहे.११ ज्योतिषी निरयन पद्धती वापरतात. त्यातील तीन जण कृष्णमुर्ती पद्धतही वापरतात. ७ जण सायन पद्धती व एक जण फक्त कृष्णमुर्तीच पद्धत वापरतो. उर्वरित आठ जणांनी त्यांच्या पद्धतीबाबत माहिती पुरवली नाही
खालील तक्ता ज्योतिषांच्या अनुभवाबद्दल माहिती देतो.
Table
5 or less6-1011-1516-2021-2526-30
369233
या सत्तावीस मंडळींच्या उत्तरात अचुक अनुमानांची संख्या ही कमीत कमी आठ पासुन जास्तीत जास्त चोवीस पर्यंत आहे.एकाच ज्योतिषाची चोवीस उत्तरे बरोबर आहेत. दोन ज्योतिषांची बावीस उत्तरे व बाकी २४ ज्योतिषांची उत्तरे वीसापेक्षा कमी बरोबर आहेत.सर्व २७ ज्योतिषांचा विचार करता सरासरी ४० पैकी १७.२५ उत्तरे बरोबर आहेत. याचाच अर्थ सर्वसामान्यपणे ४५ % उत्तरे बरोबर आहेत. एका ज्योतिषाच्या मतानुसार पाठवलेल्या ४० पत्रिकांपैकी ३७ हुषार व तीन अनिश्चित होती. या ज्योतिषाची अर्थातच १७ उत्तरे बरोबर आली. श्री मारटकर हे एकमेव ज्योतिषी असे होते की ज्यांनी संस्थात्मक पातळीवर सहभाग घेउन उत्तरे वेळेत पाठवली.ही उत्तरे त्यांनी संस्थेच्या सभासदांशी चर्चा विनिमय करुन दिली होती.त्या उत्तरांची सत्यता डॊ. प.वि. वर्तक या अध्यात्मातील जाणकार व्यक्तीसमक्ष पडताळली होती. त्यांच्याकडील दोनशे पत्रिकांपैकी फक्त १०२ पत्रिकांचेच अचुक निदान झाले होते. या १०२ पत्रिकांपैकी ५१ खरेच हुषार व ५१ मतिमंद मुलांच्या पत्रिका होत्या. या प्रकारचा निष्कर्ष जवळपास नाणे उडवून छापा/काटा पद्धतीने केले तरी मिळण्याची शक्यता असते. सारांश असा कि फक्त पत्रिका पाहून व्यक्तिच्या हुषारी वा मतिमंदत्वाबद्दल ज्योतिषकीय नियम वापरुन निष्कर्ष काढता येणे शक्य होत नाही. ज्योतिषी मंडळी पत्रिका वापरुन माणसाच्या व्यक्तिमत्व व वर्तणुकीबद्दल विविध प्रकारचे निष्कर्ष काढत असतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे किंवा नाही हे ठरविण्याकरिता एकच चाचणि निर्णायक ठरु शकत नाही. अशा प्रकारच्या विविध चाचण्या विविध प्रश्नांवर घेण्याची आवश्यकता आहे या चाचणी पुरते बोलायचे झाल्यास असेच म्हणावे लागेल कि ही चाचणी फलज्योतिष हे विज्ञानच आहे या मतास पुष्टी देत नाही. खरं पाहता या चाचणीचा निष्कर्ष हा फलज्योतिषाला विज्ञान म्हणण्याच्या विरोधात जातो. ------------------------------------------------------------------------------------- (प्रो.जयंत नारळीकर)आयुका (प्रो सुधाकर कुंटे) संख्याशास्त्र विभाग पुणे विद्यापीठ (डॊ. नरेंद्र दाभोलकर) महाराष्ट्र अं.नि.स (श्री. प्रकाश घाटपांडे) चाचणी समन्वयक ===================================================================================

7 comments:

Anamika Joshi said...

मराठी ब्लॉगिंग विश्वातही काही ज्योतिषी आहेत, जे हरवलेला मुलगा मध्यरात्री किती वाजता परत येईल, पत्नीच्या मैत्रिणीस मासिक रजस्राव कोणत्या दिवशी सुरू होईल, एकाची मेव्हणी आजारातून कधी मरण पावेल, पासून तर काहीच्या काही अतर्क्य गोष्टीही बरोब्बर ओळखत असल्याचा आव आणतात. त्यांना आपण ह्या चाचणीचे आमंत्रण दिले होते का?
http://dhondopant.blogspot.com

कॄपया आपल्या ह्या चाचण्यांबद्दल एखाद्या दिवाळी-अंकात, किंवा वर्तमानपत्राच्या रविवार पुरवणीत प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून सामान्य जनतेपर्यंत हे निष्कर्ष पोहोचतील.

आपल्या प्रयत्नांबद्दल मनापासून आभार!

Prakash Ghatpande said...

चाचणी सर्वांना खुली होती. परंतु ज्योतिषांनी बहिष्कार टाकला होता. कारणे याच ब्लॊगव्र http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/05/blog-post_27.html इथे पहा

Anonymous said...

घाटपांडे साहेब, आपण ज्या तळमळीने आणि विवेकीपणे या विषयाचा पाठपुरावा करत आहात ते पाहून आपला आदर वाटतो.

सदर चाचणीचा अहवाल देताना मटाने एका ज्योतिषांचे सर्व निकाल बरोबर आल्याचे छापले आहे, त्यात कितपत तथ्य आहे? कारण त्या एका वाक्यामुळे बर्‍याच जणांना जग जिंकल्याचा आनंद झाल्याचे दिसले.

Prakash Ghatpande said...

मटाच्या सदर बातमीत
"त्यापैकी एका ज्योतिषाने सांगितलेले सगळे निष्कर्ष अचूक ठरले तर इतर २६ जणांनी ४० ते ५० टक्के अचूक निष्कर्ष सांगितले, अशी माहिती त्यांनी दिली. " लिहिलेले पुर्णपणे चुक आहे. सदर वाक्य " एका ज्योतिषाच्या मतानुसार पाठवलेल्या ४० पत्रिकांपैकी ३७ हुषार व तीन अनिश्चित होती. या ज्योतिषाची अर्थातच १७ उत्तरे बरोबर आली. " असे आहे. ज्यांनी हा ब्लॊग वाचला असेल त्यांच्या हे नक्कीच लक्षात आले असेल. बातमी लेबल भोवती असते कंटेंट भोवती नाही. फक्त शोध पत्रकार बातमीमुल्य शोधुन काढतात. मला टाईम्स ऒफ इंडियाचे पुणे मिरर हे एकच त्यातल्या त्यात असे मुल्य शोधणारे मिळाले.

Anamika Joshi said...

आपल्या ब्लॉगचे व पुस्तकाचे वाचन केल्यावर आपल्या कार्याबद्दल अतीशय आदर निर्माण झाला आहे; परंतु धोंडोपंतांच्या ब्लॉगवर आपण त्यांना बक्षिस मिळाल्याबद्दल शुभेच्छा देणे आणि त्यावर त्यांच्या कार्याला यश चिंतणे पाहून सखेद आश्चर्य वाटले. :( आपली त्यांच्याशी वैयक्तिक मैत्री असण्यात काहीच गैर नाही, परंतु त्यांच्या व्यवसायाबद्दल आपणास तीव्र आक्षेप आहेत हे सूचित झाले नाही.

Prakash Ghatpande said...

या ठिकाणि आपण पहा. मतभिन्नता राखुनही जालमैत्री असु शकते. सर्वांनाच विवेकवादी होणे जमेल असे नाही. मी ज्योतिष व्यासपीठांवर सुद्धा हा मुद्दा मांडतो. आपण आमचे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी हे पुस्तक जालावर वाचले असेलच. या अनुदिनीत पुस्तकाच्या शिर्षकावर त्याची लिंक आहे.

Unknown said...

Astrology is so irrational that it is worse than religious superstitious faith & homoeopathy!
It is futile: waste of time & efforts to try and analyse Ass-trology by modern scientific methods!