Wednesday, December 16, 2009

वास्तुज्योतिष चर्चेच्या निमित्ताने

हल्ली वास्तुज्योतिष हा प्रकार फारच बोकाळला आहे. हा वास्तूज्योतिष हा काय प्रकार आहे?
वास्तूशास्त्रात घुसलेले ज्योतिष याला वास्तूज्योतिष असे म्हणणे वावगे ठरु नये. विशिष्ट वेळ ही एखाद्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे हे जसे मुहूर्त प्रकारात पाहिले जाते. तसे विशिष्ट वास्तू ही त्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे का? हे वास्तूशास्त्रात बघितले जाते. हे अनुकूलत्व वा प्रतिकूलत्व हे शुभाशुभत्व कल्पनेशी जोडले आहे. ज्योतिषशास्त्रात वास्तूशांत, मुहूर्त, बाधित वास्तू यांचा विचार केला आहे. दिशांचे कारकत्व हे राशींनाही दिले आहेे. दिशांचे ग्रहाधिपती आहेत. मानवी जीवनावर ग्रहांप्रमाणे गृहाचाही प्रभाव पडत असतो असे वास्तूशास्त्रात मानले गेले आहे. अशा रितीने वास्तूशास्त्र व ज्योतिषशास्त्र यांची सांगड घातली आहे. जन्मकालीन ग्रहयोग बदलणे आपल्या हातात नसते परंतु वास्तू निवडणे आपल्या हातात असते. वास्तू शास्त्रानुसार जर वास्तू 'शास्त्रोक्त` असेल तर त्या वास्तूत राहणाऱ्यांचे आरोग्य, संतती, संपत्ती, यावर त्याचा शुभ परिणाम होतो व तसे नसेल तर अशुभ परिणाम होतो. वास्तू शास्त्रानुसार वास्तु कितीही शास्त्रशुद्ध असेल परंतु त्यात राहणाऱ्या व्यक्तिच्या कुंडलीतच जर वास्तुसौख्याचा योग नसेल तर काय उपयोग? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? त्यामुळे काही वास्तुज्योतिषी अशी जाहिरात करतात, आम्ही वास्तू शास्त्रही जाणतो व फलज्योतिषही जाणतो. त्यामुळे तुम्ही आमच्या कडे या. तुमच्या पत्रिकेत वास्तुसौख्याचा योग असेल तर आम्ही तुम्हाला योग्य ते अनुकूल बदल वास्तूत करुन देतो. विनाकारण खर्चात पाडत नाही. फलज्योतिषात ग्रहांची शांती करुन त्यांना अनुकूल करुन घेता येते तसे वास्तूशास्त्रात वास्तुशास्त्रानुसार अनुरुप बदल करुन, वास्तुशांती करुन वास्तू अनुकूल करुन घेता येते. एकूण काय व्यक्तिच्या आयुष्यातील सुखदु:खाच्या घटनांचा संबंध कधी ग्रहयोगांशी जोडला जातो तर कधी वास्तूशी जोडला जातो.
(ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... वरुन उधृत)
सुप्रसिद्ध ज्योतिषी व. दा भट काय म्हणतात ते पहा.

. सकाळ दि. २०.५.२००६ च्या वाचकांच्या पत्रात पुण्यातील सुप्रसिद्व ज्येष्ठ ज्योतिषी व ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री. व.दा.भट यांचे खालील पत्र प्रसिद्ध झाले.
'' बुद्धी गहाण टाकू नका"
नुकतेच पुण्यात एका वास्तुतज्ज्ञाचे 'वास्तुशास्त्राने घटस्फोट टाळता येतो` या विषयावर व्याखान झाले. बेडरुममधील आरसा किंवा टीव्ही वगैरे गोष्टी घटस्फोटाला कारणीभूत होउ शकतात, हे ऐकताना आपण पुण्यात नसून बिहारमधील एखाद्या खेडेगांवात आहोत असे वाटू लागले.ज्योतिषी,वास्तुशास्त्रज्ञ याची वाटचाल एकविसाव्या शतकाकडून मध्ययुगीन काळाकडेे होत आहे असे वाटते. ज्योतिषी अडचणी, संकटे यावर उपाय,तोडगे सांगतात, ते ऐकले तर ज्योतिषांनी बुद्धी गहाण टाकली आहे का, असे वाटते. एक पुण्यकर्म म्हणून पक्ष्यांना धान्य टाकले तर काहीच हरकत नाही, पण संकटातून सुटका होण्यासाठी तो उपाय नाही. वाहत्या पाण्यात निखारे सोडा, लाल फडक्यात अमूक वस्तू गुंडाळून ती खिशात ठेवा असे उपाय सुचविणाऱ्या ज्योतिषांनी आपण पुण्यात आहोत हे विसरु नये. नावांत बदल करुन,स्पेलिंग बदलून किंवा वास्तूत काही बदल करुन प्रारब्ध बदलता येत असेल तर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगण्याचा नसताच खटाटोप केला असे मानावे लागेल.``
हे वास्तु ज्योतिषी व फेंगशुई तज्ज्ञ म्हणजे श्री धुंडीराज पाठक होय. या पत्रानिमित्त ज्योतिष वर्तुळात सुद्धा चर्चा झाली. त्याचा प्रतिवादही काही जणांनी वाचकांच्या पत्रातून केला. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत. त्यामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक प्रतिष्ठा देउ इच्छिणाऱ्या ज्योतिषांची कधी कधी मोठी पंचाईत होउन बसते. प्रसिद्ध ज्योतिषी श्री नंदकुमार जकातदार यांनी ही वास्तुशास्त्र ही वेगळी बाब असुन ती फलज्योतिषाच घुसडलेली आहे कारण सध्या त्याची चलती आहे असे सांगितले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------
हाच लेख उपक्रमावर पहाता येईल

No comments: