Wednesday, January 26, 2011

शाहू मोडकांशी वार्तालाप - एक जुनी आठवण

शाहू मोडकांशी वार्तालाप- एक जुनी आठवण

पुण्यात सुभाषनगर मधून चाललॊ होतो तेवढ्यात एक जुन्या पिढीतले वयस्कर गृहस्थ भेटले. अशीच ज्योतिषाच्या सर्व्हेनिमित्त ओळख.
"तुम्ही परवा शाहू मोडकांच्या व्याख्यानाला आला होतात का?"
मी नाही म्हणालो. मुंबईत होतो मी.
 " फार सुंदर झाले व्याखान.काय गाढा व्यासंग! त्यांनी बोलाव आणि महाभारतातल्या श्रीकृष्णाने ऐकावं. ज्योतिषशास्त्राचं फार चांगलं विवेचन केल. अध्यात्माची जोड हवीच तरच ते ज्योतिषशास्त्र. तुम्ही भेटा की मुंबईत. शिवाजी पार्कला रहातात."
मी नाही म्हणलं तरी भारावून गेलो.
" हं आणि फोनवर अपॊइंटमेंट घ्या. त्यांना वेळ नसतो." मी बरं म्हणालो."
"आणी डायरेक्ट क्रॊस करु नका. त्यांनाच बोलू द्या.नाही तर तुम्ही सुरुवातीलाच तुमचे मुद्दे मांडाल." मी ठीक आहे म्हणालो आणि त्यांचा निरोप घेतला.

 मुंबईत आल्यावर बसल्या बसल्या फोन मारला.या म्हणाले उद्या अकरा / बारा वाजता.महापौर निवासाजवळ राहतो मी. गेलो दुस-या दिवशी. घुसलो आत.
"या! तुम्हीच का? प्रकाश घाटपांडे?" मी हो म्हणालो. "बसा! आलोच मी."

असं म्हणुन आत गेले. मला वाटलं चहा वगैरे काही सांगताहेत कि काय? पण तस काही घडल नाही.हात पुसतं बाहेर आले. मला ही तसा उन्हाचं चहा नकोच होता म्हणा!
सुरवात कशी करावी समजेना. मी म्हणालो " परवा तुमचे पुण्यात व्याख्यान झालं. जमलं नाही मला यायला. म्हणल तुम्हालाच भेटावं.तुमच्या कडं ज्योतिष शास्त्र आहे अशा दृष्टीने काही प्लस पॊईंटस आहेत का? असं बघावं. बहुचर्चित विषय आहे ना?"
ते जरा गुढपणे खाकरले." अहो हे काय विचारणं झालं? ते शास्त्रच आहे. तुम्ही  विज्ञानयुगात वावरता.मंगळावरचं यान तुम्ही पृथ्वीवरुन कंट्रोल करता. करता कि नाही?’ मी मान डोलावली. " पृथ्वी, ग्रह सगळे सूर्याभोवती फिरतात.अणुच पण तसंच आहे.केंद्रा भोवती इलेक्ट्रॊन फिरतात. एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॊर डिस्ट्रॊईड. रिलेटिव्हीटी फार थोड्या लोकांना कळाली आहे.ही सर्व आदिशक्ती आहे.आणि भाग्य भाग्य म्हणजे तरी काय हो?"
 'तुमचे नशीब' मी म्हणालो.
 " अहो नशीब काय नशीब?" मी एव्हाना काही म्हणण्यासाठी आलेलो नाही याची मला जाणीव झाली.
" तुमची पुर्वकर्मानुसार असलेली नियतीची साथ.मी एवढे प्रयत्न करतो पण मला प्रयत्नाप्रमाणे यश येत नाही. तो साला माझ्यापेक्षा कमी प्रयत्न करुन माझ्या पुढं जातो. जातो कि नाही?मी प्रयत्न केले नाहीत का?"
 "पण परिस्थीतीवर अवलंबुन असतं ना?" मी म्हणालो.
"परिस्थिती म्हणजे तरी काय?" मी आता गप राहायचे ठरवले होते. कारण परिस्थितीनुसार मला तेवढाच पर्याय होता.
"तो आन मी समजा एकाच धंद्यात आहोत. परिस्थिती एकच आहे. धंद्यात डिमांड एकच आहे. मी त्याच्या पेक्षा वेगळे काही करत नाही. पण तो पुढ जातो. शेवटी तुमच्या प्रयत्नांना काहीतरी लिमिटेशन्स असतातच ना! नाही तर सगळेच किंग झाले असते. हेच तुमचे नशीब. कर्मगती..."
" मघाशी तुम्ही ज्योतिषशास्त्राच्या शास्त्रत्वाच्या पुराव्या बाबत काहीतरी सांगणार होतात." मी आपलं मध्येच बोलण्याचा दुबळा प्रयत्न केला.
" पुरावा? बरोबर! तुम्ही वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे.डोळस वाद स्वीकारला पाहिजे. तुम्हाला उदाहरण देतो बसा." मी बसलेलोच होतो. ते आत गेले.आतुन ’धर्मयुग’ चा जुना अंक आणला. झेरॊक्स कॊपी पण आणली.ती माझ्या हातात दिली. "वाचा इथुन".ते आत गेले. मी वाचत बसलो. त्यात अनेक ज्योतिषांनी इंदिरा गांधींच भविष्या बाबत लिहिल होतं. काहींनी लिहिले होते कि अनिष्ट काळ. आता इंदिरा गांधींच राजकीय आयुष्य संपलं. एस के केळकरांनी लिहिले होते कि निवडून आल्या तरी परत सत्तेवर येणे अशक्य.शाहु मोडकांनी लिहिले होते त्या परत सत्तेवर येणार हा काही काळ अनिष्ट आहे एवढेच.मी वाचून बसलो होतो. थोड्या वेळाने ते आले. मी मख्ख पणे बसलो होतो.
 वाचलतं? मी हो म्हणालो.
"वाचलत! " माझ्यावर नाही म्हणल तरी उखडलेच होते.मी आपल काय वाचलं ते सांगितलं.
" हॆ ! तुम्ही वाचलच नाही. तुमच्या चेह-या  वरुन  लगेच कळाल असतं. (खरं तर त्यांना थोबाडावरुन असं म्हणायच असावं पण आपल्या शिष्टाचाराच्या मर्यादा!) तुम्ही वाचल असतं तर ताडकन उठून कॊन्ग्रॆच्युलेशन दिली असती. ग्रेट म्हणाला असतात. नववी दहावीला असाल ना त्यावेळी?" मी हो म्हणालो.
"म्हणजे समजत होतं." " हे एक उदाहरण झालं पण.." मी काही तरी बोलण्याचा प्रयत्न केला.
"उदाहरणं" परत उखडले. याच महत्व तुम्हाला कळालच नाही. अहो हा प्रुफ आहे प्रुफ. ज्या काळात बाईला कुणी ही फाशी द्यावं अशी परिस्थिती होती त्याकाळात मी असं भविष्य वर्तवलं हे काय उदाहरण झालं? धिस इज ग्रेटेस्ट मिरॆकल इन धिस सेंच्युरी. काय परिस्थिती होती त्याकाळात हे भविष्य बरोबर येण्याची?"
"बरोबर आहे तुमचं म्हणण. पण समजा एखाद्या सामान्य माणासाने कुंडली दिली आन विचारल कि.."

"समजा अन एखाद्याच कशाला तुमचं बोला?"
"बर ठीक आहे मी माझी कुंडली देतो त्यावरुन तुम्ही ढोबळ मानाने वर्तमान काळ सांगा" मी म्हणालो.
" तुम्ही कोण? अहो एवढ्या मोठ्या बाई ! देशाच्या पंतप्रधान. त्यांच भविष्य हा एवढा मोठा प्रुफ असताना तुम्ही कोण? माझ भविष्य बरोबर आलं इतरांच चुकलं. का चुकलं? माझ का बरोबर आलं? काहीतरी विलक्षण पद्धत असली पाहिजे ना? तुम्ही असं विचारायला पाहिजे होतं कि तुम्ही कुठली पद्धत वापरली?"
" बरं तस विचारतो. एस के केळकर किंवा इतर मोठे ज्योतिषी सायन पद्धती वापरतात. काही निरयन वापरतात.तुमची.."
" परत तेच! अहो कसलं सायन निरयन घेउन बसलात?माझी पद्धतच वेगळी. ग्रह नक्षत्रांची ओळख असायला पाहिजे. तुम्ही खूप तयारी करायला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे."
" तुम्ही सांगातर खरं तेवढी ज्योतिषाची पार्श्वभुमी मला आहे".मी म्हणालो.
" कुंडलीनी! नाही समजायचं! फार मोठा आन वेगळा विषय आहे." मग त्यानंतर थोडी स्तब्धता! मग मी ज्योतिषाच्या आव्हानाबाबतचा विषय काढला.
 "कुंडली वरुन  स्त्री का पुरुष? जिवंत का मृत? या आव्हानाबद्दल तुमचे मत काय?"
 "परत तेच! अहो काय स्त्री आन पुरुष घेउन बसलात? मी तुम्हाला एवढा मोठा प्रूफ दिला. खरतरं तुमचे प्रश्न तिथेच संपायला हवेत." त्यांच्या मते मी यावर किंकर्तव्यमूढ, कमीत कमी दिग्मूढ तरी व्हायला पाहिजे होतं . पण मी नुसताच मूढ ठरलो.
" अहो मी तुम्हाला सोन देतोय आन तुम्ही पितळ मागताय? एवढा मोठा प्रुफ तुम्हाला कोणी देईल का?"
"तुम्ही लोकसत्तात यावर लिहिलं होतं ना?"इति मी.
" लिहिलं म्हणजे उत्तर दिलं होतं त्या नरेंद्र दाभोलकराला. पन्नास कुंडल्या विश्लेषण करत बसायला मला काय उद्योग नाहीत का?"
"पन्नास नाही हो फक्त दहाच, हे काय माझ्याकडे त्या लेखाचे मुद्दे आहेत ना?" मी पोतडीतून लेख काढायचा प्रयत्न करु लागलो.
" राहू द्या तुमच्याच कडे! त्यांना म्हणाव तुमचे नसलेले पॊईंट पण सांगतो व त्याची उत्तरे पण देतो. काही तरी चाईल्डीश लिहायचं आपलं झालं"
 "बरं ते तुमचे इंदिरा गांधींच भाकित केलंत ती पद्धत तर काही सांगाल कि नाही?" इति मी.
" सिक्रेट ! ते सिक्रेट आहे म्हणुन तर माझी पद्धत वेगळी!"
" मग ते सिक्रेट तुमच्याच बरोबर ठेवण्याचा विचार आहे का? इतरांना त्याचा लाभ नको का?" इति मी.
" तसं नाही ! मी त्यावर लिहिणार आहे सवड मिळाली की पुस्तक काढणार आहे. माणसाला काहीना काही चिंता असतात. इच्छा असतात. त्याप्रमाणे घडतेच असं नाही. तेव्हा भाग्याची साथ कितपत आहे अस बघायला लोक ज्योतिषाचा सल्ला विचारायला येतात. हात म्हणजे interpretation of your cerebellum. हे तुम्हाला कुठल्या धर्म ग्रंथात किंवा पुस्तकात सापडणार नाही.you are lucky. म्हणुन तुम्हाला हे माझ्याकडून ऐकायला मिळतय. बरं तुमचा हात बघु"
मी माझा हात त्यांच्या ताब्यात देउन टाकला. त्यांनी थोडावेळ तो बघितला आणि माझा हात मला परत देउन टाकला.
" आलं लक्षात सारं!"
 "काय आलं लक्षात" मी आपलं भांबाउन विचारलं.
"हेच एकंदरीत तुमच्या बद्दल." काही तरी सांगाल कि नाही तुमची आठवण म्हणुन. "
"अहो मी प्रोफेशनल आहे. सांगतो त्या वेळेचे पैसे आकारतो. तुमचा काही प्रॊब्लेम असेल तर भेटा मला
" छे! छे! काही प्रॊब्लेम वगैरे नाही मला.मी म्हणालो.
"काहीच नाही? एखाद्या मुलीवर प्रेम वगैरे.."
" छे छे तसलं काही नाही "मी ओशाळून म्हणालो.
"पुरुष ना तुम्ही?" मी चमकून बघितले.
" तुमचा हक्कच आहे प्रेम करण्याचा! आन वय काय तुमचं? एकही मुलगी आवडली नाही तुम्हाला?"
"तशा खुप आवडतात हो पण आवडून काय उपयोग सगळा आपला एकतर्फी मामला" मी जरा धिटावलो.
" हं हेच ते. एखाद्या तरी मुलीशी फ्रेंडशिप असावी. ती का बोलत नाही हे तरी जाणून घ्यावं"
"चालायचंच, बरं मी निघतो आता फार वेळ घेतला तुमचा. आपल्या चर्चेबद्दल अत्यंत आभारी आहे"
 " ठिक आहे या पुढच्या वेळेला कधी तरी"
"ओके"

1 comment:

Anonymous said...

आई ग्ग!!!
कसला खुसखुशीत किस्सा आहे (लोळून हसत) प्रचंड हसले (स्माईल)