Monday, October 21, 2013

फलज्योतिष चिकित्सा

फलज्योतिष चिकित्सा : लेखक रा.ज.गोखले.
पुण्यातील रा.ज.गोखले या भुगोल शिक्षकाने हे पुस्तक १९३५ साली प्रकाशित केले आहे.पुस्तक अर्थातच त्यावेळच्या सामाजिक परिस्थिती च्या पार्श्वभूमिवर आहे. लेखकाने फलज्योतिष या विषयावर संशोधन व्हावे व त्यासाठी फलज्योतिषाभिमानी जहागीरदार व संस्थानिक यांनी पुढाकार घ्यावा असे सुचित केले आहे. संशोधनापासून होणारा फायदा अधोरेखित करताना लेखक म्हणतो," या शास्त्रापासून निश्चित ज्ञान बहुतेके बाबीत मिळत नसेल व त्याचा तादृश उपयोग नसेल तर तसे जाहीर झाल्याने गरीब लोकांचा या शास्त्राचा सल्ला घेण्यात होणारा द्रव्याचा व कालाचा अपव्यय वाचेल व जनतेची दिशाभूल होणे टळेल.भविष्य ज्ञेय पण अटळ असेल,तर त्याचा खासगी व्यवहारात काही उपयोग नाही; पण ऐतिहासिक माहिती मिळवण्याच्या कामी उपयोग झाल्यास ऐतिहासिक ज्ञानवृद्धी च्या कामी या शास्त्राचा उपयोग करुन घेता येईल." फलज्योतिषाच्या मूलतत्वास निश्चित आधार मिळतो काय? शास्त्रात मानल्या गेलेल्या कारणांचा अपुरेपणा, भिन्न व परस्परविरोधी असलेले ज्योतिषातील पंथ, ग्रहयोग सूचक आहेत की कारक याबद्दलचा विचार,होय किंवा नाही हे उत्तर ग्रहहोगावरुन निश्चितपणे मिळणे शक्य आहे काय? शास्त्रातील मतभेद व संदिग्धता यामुळे वारंवार होणार्‍या घोटाळ्यांची उदाहरणे अशा अनेक पातळ्यांवर छोटी मोठी प्रकरणे पुस्तकात घेतली आहेत.बर्‍याच वेळा लोकमान्य टिळकांच्या कुंडली वर केलेली भाष्य उदाहरणात घेतली आहेत.फलज्योतिषाची आजची स्थिती ( म्हणजे १९३५ सालातील) मांडताना पुरस्कर्ते व विरोधी यांचे भिन्न पक्ष लेखकाने मांडले आहेत.
१)ग्रंथाचे ज्ञान ज्यास पुरे झाले आहे त्यास या शास्त्राने सर्व भूत भावी गोष्टी बरोबर सांगता येतात असे मानणारे
२)प्रचलित पुस्तकातील सर्व नियम खरे नाहीत परंतु बरेच नियम बहुतेक खरे आहेत असे मानणारे
३)प्रचलित नियम खरे असोत वा खोटे असोत, पण शास्त्र अर्थात ग्रंथात सापणारे वा न सापणारे काही नियम तरी खरे आहेत असे मानणारे
४)फलज्योतिषातील खर भाग थोडा आहे व जो आहे त्यातही निश्चितपणा थोडा आहे असे मानणारे ५)हे शास्त्र सर्वस्वी निराधार आहे व अर्थात सर्वस्वी खोटे आहे असे मानणारे. सध्याच्या २१ व्या शतकात या वर्गवारी मधे काही बदल झाला आहे असे वाटत नाही.

फलज्योतिषाची सत्यासत्यता तपासण्यासाठी त्यांनी एक निर्णायक समितीची स्थापना केली.त्यात त्यावेळचे नामवंत विद्वान  प्रिन्सिपल ध.रा.गाडगीळ, इतिहास संशोधक द.वि.आपटे, बॅ.मुकुंदराव जयकर यांना घेतले. भविष्यज्ञान प्राप्त करुन घेण्याच्या पद्धतीच्या पुरस्कर्त्यांस व तज्ज्ञास एक विनंती केली, आपली वर्तवलेली भविष्ये त्यांनी निर्णायक समितीकडे पाठवावी. त्यासाठी यथोचित पारितोषकही देण्याची तयारी ठेवली होती. पण त्यासाठी त्यांनी फलासंदर्भात अटी घातल्या.
१) ज्या गोष्टी करणे व्यक्तिच्या हातात आहे ( उदा. प्रवासास जाणे ) त्या संबंधी भविष्ये समिती विचारात घेत नाही.
२) भविष्य स्पष्ट म्हणजे निश्चितार्थक असले पाहिजे. अर्थात त्याचे स्वरुप व त्याचा काल नियमित पाहिजे.
३) भविष्य एका वर्षाचे आत व फार तर दोन वर्षाचे आत घडणारे असावे
४) कोणताही सिद्धांत अनेक उदाहरणांवरुनच सिद्ध होणे जरुरी आहे. यास्तव फले पुरेशी न मिळता बरीच मिळाल्यास, मिळालेल्या उदाहरणांवरुन होणारा निर्णय 'तात्पुरता खरा` असेच मानण्यात येईल.
५) भविष्य व्यक्तिस अनिष्ट ( उदा. आजार, मृत्यू, इ. स्वरुपाचे ) असल्यास ते गुप्त ठेवले पाहिजे.
६) भविष्य साधार म्हणजे नियमासह द्यावे.
भैविष्य खरे ठरण्याच्या कारणाविषयी ते म्हणतात कि  भविष्य खरे ठरण्यास ज्योतिषशास्त्राचाच आधार लागतो असे नाही तर अन्य कारणे ही असतात. परिस्थितीवरुन अजमास करण्यात मदत होते.संभवशास्त्रात अज्ञानी माणसाच्या उत्तरातही यथार्थ उत्तराचा संभव असतो
ज्योतिषाच्या समर्थनार्थ दिला जाणारा भरती ओहोटी व चंद्राचा वेडावर होणारा परिणाम हा मुद्दा तेव्हाच्या काळातही उगाळला जात होता. लेखक म्हणतात कि पुण्याच्या मेंटल रुग्णालयात याविषयी मुख्याधिकार्‍याकडे याविषयी चौकशी केली असता त्यांनी पुढील माहिती दिली-" चांदण्या रात्री उजेडामुळे रोग्याच्या झोपेला व्यत्यय येतो, त्यामुळे रोग्याच्या मनावर थोडा परिणाम होतो,परंतु मेंदुचा विकार चंद्राच्या कलांबरोबर वाढत जातो अथवा पौर्णिमेला वेडाला भरती येते असा अनुभव नाही".

पाश्चात्य देशातील फलज्योतिषच्या स्थिती बाबत ते म्हणतात 'अमेरिकेत Lewellyn येथे फलज्योतिषाचे कॉलेज आहे.` वगैरे विधानावरुन हे कॉलेज किंवा अशा दुसऱ्या संस्था ऑक्सफर्ड, केंब्रिज येथील कॉलेजसारख्या असतील असे कोणाला वाटेल; पण वस्तुस्थिती तशी नाही. ह्या विषयाचे शिक्षण देण्याकरीता काही संस्था काही लोकांनी काढल्या आहेत व पाश्चात्य देशात मतस्वातंत्र्याचे तत्व मान्य असल्याने काही मर्यादेपर्यंत कोणासही मान्य असणारी गोष्ट करू देतात. या तत्वास अनुसरून अशा संस्थेस सरकारने मनाई केली नाही एवढेच. पण अशा संस्थांना तिकडे शास्त्रज्ञात मान्यता नाही.
पाश्चिमात्य देशात काही तोतया युनिव्हर्सिटयाही असतात हे ध्यानात ठेवावे. इकडील काही लोकांना डॉक्टरेटची पदवी देणारी अमेरिकेतील 'ओरिएंटल युनिव्हर्सिटी` अशापैकीच होय. काही अडचणीमुळे ती सरकारास बंद करता आलेली नाही; पण तिचा पत्रव्यवहार पोस्ट ऑफिसने घेउ नये असा नियम तेथील सरकारने केला असल्याचे ऐकिवात आहे. सांगण्याचा अर्थ हा की पाश्चात्य देशातील 'कॉलेज` 'अकॅडमी` अथवा 'युनिव्हर्सिटी` एवढया नावावरून ती संस्था विद्वन्मान्य आहे असे मुळीच होत नाही.'
एकंदरीत पुस्तक हे नावाप्रमाणे फलज्योतिषाच्या चिकित्सेतील स्वातंत्र्यपूर्व काळातील एक दस्त ऐवज आहे.

लेखक रा.ज गोखले
पृष्ठे- ५७ +५
प्रकाशन काल- १९३५
किंमत- आठ आणे.

ता.क. पुस्तक दुर्मिळ आहे. ब्लॉगच्या ग्रंथालयात जा. तिथे वाचायला मिळेल.

No comments: