Saturday, March 01, 2014

दाते पंचांगातील सन २०१४ चे राजकीय भविष्य

ज्योतिषी विजय केळकर पुणे यांचे लोकसभेच्या निवडणुकांबाबत दाते पंचांगात पान नं ७९ वर खालील राजकीय भविष्य आलेले आहे.भविष्याची भाषा व व्याप्ती पहा.कुठलीही राजकीय घटना या व्याप्तीत सहज बसवता येईल.
========================================================================
पंचांगाचे २०१४-१५ साल भारताच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. कारण ह्याच वर्षात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या कालावधीमध्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण आणि रवी शनी प्रतियोग होणार आहेत. हे सर्व ग्रहयोग भारताच्या मकर लग्नाच्या पत्रिकेत दशम स्थान व चतुर्थ स्थानात होत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या दृष्टीने राजकारण हा एक गूढ विषय झाला तर आश्चर्य नाही.
सत्तेवरील कॉंग्रेस पक्षाची पत्रिका मीन लग्नाची आहे. नोव्हेंबर २०१४ पर्यंत शनीचे भ्रमण ह्या पत्रिकेत अष्टमस्थानातून होईल. फेब्रुवारी १४ मधे मंगळ याच स्थानात हजेरी लावेल आणि तेथुन तो वक्री मार्गी स्थितीमधे जवळ जवळ जुलै मध्यापर्यंत राहील. अर्थातच सत्ताधारी पक्षाला ही निवडणुक जिंकणे अतिशय जड जाईल. कॉंग्रेस पक्षाला आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी पुर्वी कधी नव्हती इतकी तडजोड करावी लागेल. श्रीमती सोनिया गांधी यांची पत्रिका कर्क लग्नाची आहे. त्यांचे पत्रिकेनुसार एप्रिल ते जुन १४ या कालावधीमधे गुरुचे व्ययस्थानात तर शनीचे भ्रमण चतुर्थस्थानात असल्यामुळे पक्षातील सदस्यांनी केलेल्या चुका त्यांना महागात पडतील.अर्थातच इतर पक्षांशी हातमिळवणी करावी लागेल. पण कॉंग्रेस पक्षाची पत्रिका जुन नंतर बलवत्तर होत जाईल. कारण गुरु पक्षातील पत्रिकेत पंचम स्थानात आणि सोनिया गांधींच्या पत्रिकेत लग्नस्थानात प्रवेश करेल. त्यानंतर कदाचित हीच कॉंग्रेस पार्टी नेतृत्व देउ शकेल.मात्र त्यापुर्वी पक्षाला अग्निपरिक्षेतून जावे लागणार हे निश्चित. हे सर्व ग्रहमान पाहता असे वाटते की सार्वत्रिक निवडणुकांमधे हा पक्ष सरळमार्गाने सत्तेवर येउ शकणार नाही. पण ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर या पक्षाचे पारडे जड होईल. दरम्यान च्या काळा मधे मध्यावधी निवडणुका पुन्हा घ्याव्या लागण्याची परिस्थिती निर्माण होईल.

भाजप ची पत्रिका धनु लग्नाची आहे. जून १४ पर्यंत गुरु आणि शनी या दोन्ही ग्रहांची साथ या पक्षाला मिळेल. मात्र एप्रिल महिन्यात अचानक ज्या घडामोडी घडतील त्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पक्षाची पुर्वी ठरलेली ध्येय धोरणे बदलून जातील. त्याचा परिणाम चांगला होणार नाही. एप्रिल महिन्यातच होणार्‍या  रवि- हर्षल युती व शुक्र गुरु त्रिकोणामुळे पक्षांतर्गत नेतृत्वासंबंधी ज्या लाथाळ्या चालू होतील त्यातून पक्षाचे नुकसान होईल जुन मधे गुरु पक्षाच्या पत्रिकेत अष्टमस्थानात प्रवेश करेल.जरी हा पक्ष सत्तेवर आला तरी तो टिकू शकणार नाही. कारण सक्षम नेतृत्व व राष्ट्रिय स्तरावरील ध्येय धोरणे  याबाबतीत भाजप मधे विरोध राहील. तिसर्‍या आघाडीत असणारे पक्ष पुर्वी पेक्षा जास्त मते मिळवतील.ह्या आघाडीशी युती करायला कॉंग्रेस व भाजप उत्सुक असतील.परंतु कॉंग्रेस पक्ष अखेर बाजी मारेल. एप्रिल मे हा ग्रहणयुक्त कालावधी असल्याने जी पार्टी सत्तेवर येईल त्याला काम करण्यात प्रचंड त्रास होईल. विरोधकांकडून महत्वाचे मुद्दे उपस्थित केले जातील याच बरोबर नैसर्गिक आपत्त्या जीवितहानी आणि परराष्ट्र धोरण यामुळेही सतत अशांतता असेल. दशम स्थानातील मंगळ निवडणुकीच्या वेळी वक्रि स्थितीमधे भारताच्या पत्रिकेमधे भाग्यस्थानात येईल. तो अशा अवस्थेत २० मे पर्यंत राहील आणि त्यानंतर त्याची वाटचाल पुन्हा दशम स्थानाच्या दिशेने चालू होईल.२०१४ जुलै ला पुन्हा दशमात येईल.. वक्री-मार्गी स्थितीत राहणारा मंगळ भारतामधे थैमान घालेल. त्याचे परिणाम खालीलप्रमाणे असतील
१) कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळणार नाही. इतर पक्षाशी हातमिळवणी करणे अपरिहार्य होईल.संमिश्र सरकार येण्याची शक्यता आहे
.२)निवडणुकीच्या वेळेला भाजपची पत्रिका कॉंग्रेसपेक्षा जास्त प्रभावी असेल.पण नेहमी प्रमाणे या पक्षाची तत्वनिष्ठ भुमिका आडवी आल्याने त्यांना सत्तेवर येण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागेल.
३) सर्व राजकीय पक्षांमधील तरुण प्रतिनिधींना जास्त वाव मिळेल. सुरवातीला ही गोष्ट चांगली वाटेल पण नंतर त्यांच्या एकतर्फी निर्णय घेण्याच्या पद्धतीमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होउ शकतील
.४) ऑगस्ट महिन्यात होणारी शनी-मंगळ युती भारताच्या दशमस्थानात होणार आहे. सत्तेवरील पक्षाविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणण्याचा विरोधक प्रयत्न करतील. त्यातून सत्तेवरील पक्ष कसाबसा बाहेर पडेल.ऑक्टोबर मधे होणारी ग्रहणे पुन्हा विचित्र परिस्थीती निर्माण करुन ठेवतील. त्यामुळे लोकसभा विसर्जित करावी लागते की काय अशी शंका येईल. थोडक्यात या सर्व राजकीय अस्थिरतेमुळे सत्तेवरील पक्षाला काम करता येणार नाही.प्रत्येक निरणयाला विरोध होईल पुन्हा मार्च-एप्रिल २०१५ मधे जी ग्रहणे होणार आहेत. त्यामुळे सरकार बरखास्त करुन पुन्हा निवडणुका घ्याव्यात असे ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतर जे सरकार सत्तेवर येईल ते भारतामधे राजकीय स्थिरता आणायला सुरवात करेल.

No comments: