Wednesday, November 26, 2014

स्मृती इराणी व ज्योतिष

मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी परवा आपल्या कुटुंबासोबत राजस्थानच्या भीलवडा परिसरातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित नथ्थूलाल व्यास  यांच्या कडे ज्योतिष पहायला गेल्या व वाहिन्यांना सनसनाटी न्यूज मिळाली. तीन मराठी चॅनेलवर एकाच वेळी परिसंवाद चालू झाले.जणु काही त्या ज्योतिषाकडे गेल्यामुळे फलज्योतिषाला विज्ञानजगात मान्यताच मिळणार होती. पण
आपल्याकडे नेते, लोकप्रतिनिधी यांनी व्यक्तिगत जीवनात व सार्वजनिक जीवनात आदर्श,तत्वनिष्ठ,तर्कनिष्ठ,वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे,त्याचा प्रचार व प्रसार करणारे, विवेकवादी,आधुनिक,विद्वान,कर्तव्यनिष्ठ इ. सगळं हे सतत व एकाच वेळी असल पाहिजे ही जनतेच किंवा मिडियाची अपेक्षा असते.काहींच असही मत दिसल की सार्वजनिक जीवनात एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तिला खाजगी जीवन असत नाही व असुही नये. लोक त्यांच्याकडे आदर्श म्हणुन पहात असल्याने त्यांचे अनुकरण केले जाते. हे खरे आहे कि सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या दिग्गज,अधिकारी व्यक्तिच्या आयुष्यात सार्वजनिक व खासगी जीवन याची सीमारेषा अतिशय पुसट असते.पण एखाद्याच्या जीवनात अनपेक्षितपणे यश अथवा अपयश आले तो गांगरुन जातो. स्मृती इराणींचे तसेच झाले. प्रथम त्या माणुस आहेत व मंत्री त्यानंतर. त्यामुळे मानवी मेंदुच्या असणार्‍या भावभावना या त्यांनाही आहेत. आमदार गिरिष बापट म्हणाले की माणसाला भविष्याविषयी असणारी उत्कंठा उत्सुकता ही स्वाभाविक बाब आहे. कुटुंबासोबत त्या खाजगी आयुष्यात ज्योतिषाकडे गेल्या तर कुठे बिघडल? मला मंगळयान मोहिमेची आठवण आली भारताच्या मंगळमोहिमेला आशीर्वाद मिळविण्यासाठी इस्रोचे प्रमुख शास्त्रज्ञ के. राधाकृष्णन यांनी पत्नीसोबत तिरुपती बालाजीची पूजा केली.  इस्रोच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी यानाची प्रतीकृती घेऊन राधकृष्णन हे तिरुपती मंदिरात पूजेसाठी येत असतात. इथेही तोच प्रश्न उपस्थित झाला कि एवढ्या मोठ्या पदावरील वैज्ञानिकाला खाजगी जीवन आहे की नाही? त्या ज्योतिषी नथ्थूलाल ने म्हणे स्मृतीबाईंना पाच वर्षांनी राष्ट्रपती व्हाल असे सांगितले आहे.ते ही हस्तरेषांवरुन.  असो! जो पर्यंत अनिश्चितता आहे तो पर्यंत ज्योतिषाला मरण नाही हे आमचे भाकीत वारंवर प्रत्ययाला येते.

No comments: