Friday, January 02, 2015

आत्मानंद यांचे फलज्योतिषाला आव्हान!

फलज्योतिषाला आव्हान म्हटले की लोकांना डोळ्यासमोर अंनिस दिसते. पण अमृततुषार  या आत्मानंद यांनी १९६७ साली लिहिलेल्या पुस्तकात फलज्योतिष हे शास्त्र आहे का? या प्रकरणात त्यांनी फलज्योतिषाला एक आव्हान दिले होते. ते म्हणतात," ह्या लेखातील विधानांस या शास्त्राच्या अभिमान्यांनी सविस्तर उत्तर तर द्यावेच परंतु त्या्च्या अगोदर त्या सर्वांना माझे असे आव्हान आहे की मी एक तंतोतंत अंशात्मक अशी कुंडली
समालोचनार्थ देईन की जिची वेळ व अंशकलात्मक ग्रहस्थिती वादातीत असेल. तिचे त्यांनी प्रत्येक भावाचे सविस्तर वर्णन करावे. त्या वर्णनात काय काय गोष्टी हव्यात, याची भूतकाळातील घटना भाववार नमूद करून व पुढील सहा महिन्यांचे ठोकळ भविष्य द्यावे.ती व्यक्ति जिवंत असेल व कोणासही तिला भेटून शहानिशा करुन घेता येईल. अशा परिस्थितीत वास्तविक हे जर शास्त्र असेल तर मागील व पुढील १०० टक्के बरोबर यावयास पाहिजे. परंतु चुकीला सुद्धा वाव असावा म्हणुन निदान ९० टक्के बरोबर आले तर मी त्या प्रत्येकास रु.५० बक्षीस म्हणुन देईन. त्या कुंडलीचे बाराही भावांचे वर्णन व घटना मी सील करुन एका बॅंकेच्या लॉकर मधे मॅनेजरच्या सहीने ठेवीन व ते सर्वासमक्ष उघडून वाचले जाईल.मात्र ज्यांना ज्यांना हे आव्हान स्वीकारायचे असेल त्या प्रत्येकाला त्याचे चुकले तर दंडादाखल म्हणुन प्रत्येकी रु १०० त्याच बॅंक मॅनेजर कडे एका स्वतंत्र खात्यात जमा म्हणुन ठेवावे लागतील व त्या बॅंक मॅनेजरच्या सहीने निकाल जाहीर करण्यात येईल.जितके ज्योतिषी हे आव्हान स्वीकारुन रु१०० डिपॉझिट करतील त्या प्रत्येकी मी पण ५० रु त्याच  मॅनेजरकडे भरीन. मग ती संख्या केवढी का मोठी असेना. ज्यांना हे आव्हान स्वीकारायचे असेल त्यांनी मला तसे लिहावे म्हणजे त्यांना इतर तपशील- बॅंकेचे नाव व कुंडली पाठविण्यात येईल."