Tuesday, February 23, 2016

मुहूर्त

मुहूर्त म्हटले की भास्कराचार्य-लीलावतीची गोष्ट हमखास सांगितली जाते. लीलावती ही भास्कराचार्यांची लाडकी लेक. तिच्या कुंडलीत वैधव्ययोग होता. पण भास्कराचार्यांनी असा विवाहाचा मुहूर्त शोधून काढला की तिचा वैधव्ययोग टळेल. पण विवाहाचे वेळी अक्षतेचा दाणा का मणी घटिकापात्रात पडलेने तो तळाशी जावून भोकात अडकला व मुहूर्त चुकला व शेवटी व्हायचे तेच झाले. या दंतकथेच्या छटा बदलतात पण आशय तोच. मुहुर्ताची महती. थोडा इकडेतिकडे झाला की काय उलथापालथ? विशिष्ट तारखेला आणि मुहूर्तावर बाळंतपण व्हावे, असा आग्रह डॉक्‍टरांना करण्याचे प्रकार वाढत असल्याबद्दल आणि या प्रकारात पुणे परिसरातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त "सकाळ‘मध्ये मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. पहिल्या मुलाच्या जन्मतारखेलाच दुस‍र्‍या मुलाचा जन्म व्हावा या अर्थाने विशिष्ट मुहूर्त त्या कुटुंबाला साधायचा होता. नशीब तो ज्योतिष शास्त्रातील शुभवेळ अशा अर्थी नव्हता.  एका ज्योतिषाला एकदा मी विचारल, '' काहो, आता डॉक्टरी शास्त्रामुळे प्रसूतीची वेळ पुढे मागे करता येते. म्हणून चांगल्या मुहूर्तावर मूल जन्माला घालणे डॉक्टरांना सहज शक्य आहे. म्हणजे भविष्य ठरवणं त्यांच्या हातात आलं की नाही ? `` त्यावर त्यांनी शांतपणे सांगितलं की, '' अस जन्माला येणे हे निसर्गाला धरून नसल्यानं जन्मकुंडलीचे नियम तिथे लागू होत नाहीत.``  त्यांच्या या युक्तिवादा नुसार प्रत्येक सिझेरियन केस मधे जन्माला आलेले मूल हे ’अनैसर्गिक’ वेळेला जन्माला आल्यामुळे त्याची बनवलली कुंडली ही निरर्थक ठरते.मग अशा निरर्थक कुंडल्यांवरुन सांगितलेले भविष्य कसे काय अर्थपूर्ण असू शकेल या प्रश्न शंकेखोर लोकांच्या मनात येतोच. त्याचे उत्तर म्हणजे फलज्योतिष हा श्रद्धेचा भाग आहे हेच द्यावे लागते.परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही. इथे मला विजय तेंडुलकरांची आठवण येते. त्यांनी माणसे अंधश्रद्ध असतात कारण त्यांची ती गरज असते अशा आशयाचे म्हटले होते. ( संदर्भ तिमिरातून तेजाकडे- डॉ. नरेंद्र दाभोलकर)

1 comment:

prathmesh bhalerao said...

Apla blog vachla.... khupach chan... me pan yababat ch khup kahi lihit asto.. apan maza blog ekda jarur pahava.. psbthink.blogspot.in