Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Monday, September 20, 2021

फलज्योतिष ” शास्त्र? “

 

पूर्वी २००१ मध्ये ‘यूजीसी’ने ज्योतिष हा विषय विद्यापीठस्तरावर विज्ञानशाखेत घेण्याचा घाट घातला होता. त्यावेळी सर्व वैज्ञानिकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. प्रा.यशपाल, खगोलभौतिकतज्ज्ञ व माजी चेअरमन यूजीसी, यांनी असे मत व्यक्त केले होते की ज्या काळात फलज्योतिषाचा उगम व विकास झाला त्या काळातील समाजशास्त्र व मानव्यविद्या यांचा अभ्यास करण्यास काहीच हरकत नाही. पण त्याला विज्ञानशाखेत टाकणे ही घोडचूक ठरेल. म्हणजे ज्योतिष विषयावर आक्षेप हा विज्ञान या शाखेअंतर्गत घेण्याला होता. यूजीसीने त्यावेळी पलटी मारली व तो कलाशाखेत घेत असल्याचे सांगितले. जी गोष्ट विज्ञान नाही तिला विज्ञानशाखेत घेणे ही घोडचूकच. जीवाजी विद्यापीठ (ग्वाल्हेर), लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (दिल्ली), कवि कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक), संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय (वाराणसी) अशा ठिकाणी तो मानव्यविद्या, प्राच्यविद्या, संस्कृत अशा विषयांतर्गत या ना त्या स्वरूपात अगोदरपासूनच आहे.

Thursday, October 18, 2018

बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै मा.श्री. रिसबूड

सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो. त्यानुसार त्यांनी हे प्रकरण पुस्तकाच्या शेवटी समाविष्ट केले.
बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये
-मा.श्री रिसबूड
भूत-भावी घटना प्रत्यक्ष जाणणे या संदर्भात मी मांडलेले विचार व दुसरेही काही विचार कदाचित काही बुद्धिवादी मंडळींना पटणार नाहीत.माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते.मग तो दुसया तहेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपते करू शकत नाही. निदान बुद्धिवादी मंडळींचा तरी असा कर्मठ पंथ बनू नये असे मला वाटते.मी है। का म्हणतो ते सांगण्यासाठी पुढील उदाहरणे देतो :

Friday, March 20, 2009

विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार

विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार
अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत`
( ढोलकी: खुद्द प्राचार्य गळतगे )



विंग-कमांडर शशिकांत ओक यांनी लिहिलेले "बोध अंधश्रद्धेचा" या नावाचे पुस्तक आमच्या एका सनातनी मित्राने आमच्या हाती दिले व 'आता बोला!' अशा आविर्भावाने तो आमच्याकडे बघू लागला. पुस्तक वरवर चाळून पहाताच मित्राचा हेतू आमच्या ध्यानात आला. पुस्तक वाचतांना आम्हाला असे वाटले की 'बोध अंधश्रद्धेचा' या नावाऐवजी लाभ अंधश्रद्धेचा, किंवा लोभ अंधश्रद्धेचा हे नाव या पुस्तकाला जास्त शोभून दिसले असते!
नि:स्वार्थपणे जनहितार्थ झटणारे ते दैवीगुणाचे, आपल्याबरोबर इतरांचेही हित जपणारे ते मनुष्यगुणाचे, आपल्या स्वार्थाकरिता दुस याचे नुकसान करणारे ते राक्षसगुणाचे, पण निष्कारण दुस यांचे नुकसान करणा यांना काय म्हणावे हे भर्तृहरीला समजेना! 'ते के न जानीमहे |' एवढे म्हणून तो स्वस्थ बसला. त्याच्या वर्गवारीप्रमाणे समाजात भोळसट आणि वेडगळ समजुती फैलावण्यातच ज्यांचा स्वार्थ गुंतलेला असतो त्यांना आपण राक्षस-श्रेणीत घालू शकू पण केवळ सनसनाटीच्या आनंदासाठी घातक किंवा वेडगळ समजुती जे फैलावतात त्यांना कोणत्या श्रेणीत घालायचे ? (देवालाही वेठीला धरणारे हे लोक!) त्यात त्यांचा काही स्वार्थ असतो म्हणावे तर तसेही नसते. तर, अशा या दोन श्रेणीच्या लोकांना अं. नि. स. हा त्यांच्या मार्गातला एक मोठा अडसर आहे असे वाटते म्हणून ते तिच्यावर सतत आग ओकत असतात. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाचा हेतू तोच आहे एवढे सांगितले म्हणजे पुस्तकाच्या स्वरूपाची कल्पना वाचकांना येईल.

Monday, February 09, 2009

महात्मा फुल्यांचे फलज्योतिष विषयक विचार

फलज्योतिषाकडे पहाण्याच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनामध्ये उत्सुकता युक्त आदर असतो. कुतुहल असते. काहींच्या मते फलज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा जोपासणे. पण तरीही बहुतेकांच्या मते ते शास्त्र आहे.श्रद्धेपोटी काहीजण फलज्योतिषाच्या माध्यमाद्वारे आपला भविष्यकाळ ज्ञात करुन घेण्यासाठी यथाशक्ती,यथाबुद्धी प्रयत्न करतात.अशिक्षित अडाणी समाजामध्ये सुद्धा फलज्योतिषाचा उपयोग सोयरिक जुळवण्यासाठी केला जातो. यासाठी जन्मनावाचा उपयोग केला जातो.

Thursday, September 18, 2008

कै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

सप्टेंबर २००८ चा अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र चा ज्योतिष विशेषांक पाहिला अन माधव रिसबुडांची आठवण तीव्रतेने झाली. माधव रिसबुड २००३ साली निवर्तले.खालील लेख खरं तर मी अंनिस वार्तापत्राच्या एका दिवाळी अंकासाठी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबुडांनी ज्योतिष चिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठीकाणी वकीली केली होती. अंनिस चे हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख वार्तापत्राच्या संपादक मंडळाने नाकारला. कारण म्हणे त्यात व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होते. मनोगतच्या संपादकांना तसे विरोपाद्वारे मी कळविले होते. अंनिस वार्तापत्राने हा नाकारलेला लेख मनोगत च्या दिवाळी २००७ च्या अंकात जालावर प्रसिद्ध झाला आणि ख-या अर्थाने रिसबुडांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे वाटले. इथेही तो पहाता येईल.

कै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक
माझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की," अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे 'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'.

Tuesday, August 19, 2008

ज्योतिषांची वर्गवारी

ज्योतिषांची वर्गवारी
पारंपारिक, हौशी, व्यावसायिक, आधुनिक अशी ज्योतिषांची वर्गवारी करता येईल. घराण्यात असलेला ज्योतिषाचा पारंपारिक व्यवसाय पुढच्या पिढीने स्वीकारला तो झाला पारंपारिक ज्योतिषी. पंचांग पहाता येते व पुजा सांगता येते एवढ्या मर्यादित भांडवलावर धार्मिक परंपरेचा भाग म्हणून जरी ज्योतिषाचा व्यवसाय एखाद्या पुरोहित कम ज्योतिषाने केला तरी तो पारंपारिक ज्योतिषी म्हणुन मान्यता प्राप्त होतो. खेडेगावात बहुजन समाज हा ज्योतिष विषयक प्रश्न पहायला भिक्षुकीचा व्यवसाय करणा-या काकांचीच निवड करतो.

Sunday, August 10, 2008

ज्योतिषी कुणाला म्हणायचे?

ज्योतिषी कुणाला म्हणायचे?
ज्योतिषी कुणाला म्हणायचे यात ज्योतिषांमध्येच मतभेद आहेत. अनेक मान्यवर ज्योतिषांच्या स्वत:च्या ज्योतिष संस्था आहेत. त्यात ज्योतिषपंडीत ज्योतिषशास्त्री, होराभुषण, होरामार्तंड अशा उपाधी वा पदव्या देणारे अभ्यासक्रम असतात. त्याची फी असते. ती भरुन जो अभ्यासक्रम पुर्ण करतो असे त्या ज्योतिषसंस्थाचालकाला वाटते त्याला तसे संस्थेकडुन त्या उपाधिचे प्रमाण पत्र मिळते. प्रत्येक संस्थेचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. त्यात प्रमाणीकरण नाही. ज्या हौशी लोकांना ज्योतिषी म्हणवुन हौस असते त्यांना ती येथे पुर्ण करता येते. यात डॊक्टर्स इंजिनियर व्यापारी, नोकरदार सर्व प्रकारचे लोक असतात. डॊक्टर ने हा अभ्यासक्रम पुर्ण केला म्हणजे त्याला वैद्यकशास्त्राची मान्यता मिळाली असा होत नाही.डॊक्टर, इंजिनियर, वकिल, चार्टर्ड अकाउंटंट आर्किटेक्ट हे व्यवसाय करण्यासाठी शासनमान्य विद्यापीठाची शैक्षणीक पदवी लागते व व्यवसाय करण्याची शासनाची सनद लागते. तसे ज्योतिषात नाही.

Thursday, August 16, 2007

पंचांग एक अवलोकन


"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे". अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत असतो,पहात असतो. पण हा 'कालनिर्णय' नसून कालनिर्देशनाचा प्रकार आहे.निर्णय घेणारे तुम्ही कोण लागून गेले? तुम्हाला जर तुमची जन्मतारीख विचारली आणि तुम्ही जर त्याला ' माझा जन्म भारतीय सौर दिनांक अमुक अमुक रोजी झाला' किंवा भाद्रपद कृष्ण चतुर्थी शके १८८४ रोजी झाला 'असे सांगितले तर तो नक्कीच भारतीय असून सुद्धा विक्षिप्त नजरेने तुमच्या कडे बघेल.

पंचांगाचा उदय
मानव जसा उत्क्रांत होत गेला तशी त्याला दैनंदिन व्यवहारासाठी कालमापनाची व कालनिर्देशनाची गरज निर्माण झाली. शिकार ते शेती या प्रवासात शेती हा मुख्य मानवी जीवनाचे अंग झाल्याने निसर्गाच मानवी जीवनाशी नातं सांगणारे दिवस रात्र, उन, पाउस, थंडी, वारा,सागरातील भरती ओहोटी याचा अवकाशातील विशिष्ट ग्रह ता-यांच्या स्थितीशी संबंध हळूहळू लक्षात येउ लागला. समाजजीवनातील सर्व कृत्ये ही अप्रत्यक्षरित्या शेतीशीच निगडीत होउ लागली. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुराशी लोकजीवन अवलंबून होते. त्यामुळे या संबंधांचे निरिक्षण करुन त्यावरुन काही आडाखे बांधता येउ लागले.यातूनच ज्योतिषशास्त्राचा म्हणजे आताच्या खगोलशास्त्रीय भागाचा उगम झाला. फार पूर्वी फलज्योतिष हा शब्द प्रचारात नव्हता.ज्योतिष किंवा ज्योतिःशास्त्र हा शब्द वापरात होता. ज्योति म्हणजे आकाशातील दिप्तिमान गोल.चंद्र, सूर्य, ग्रह. तारे इत्यादि.
ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे.

Wednesday, May 09, 2007

पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा...जयंत नारळीकर

सप्टेंबर-ऑक्‍टोबर १९७५ मधली गोष्ट. "द ह्यूमनिस्ट' नावाच्या अमेरिकेतील नियतकालिकात १८६ विख्यात शास्त्रज्ञांच्या सहीचे एक पत्रक प्रसिद्ध झाले. मानव जीवनावर ग्रहताऱ्यांच्या प्रभाव पडतो, ही कल्पना त्या पत्रकात स्पष्ट शब्दांत खोडून काढली होती. त्यातील काही मोजके उतारे पहा- ........"मानवाच्या जन्माच्या वेळी ग्रह-ताऱ्यांची स्थिती त्याच्या भवितव्यास आकार देते, ही कल्पना निव्वळ चुकीची आहे. दूरच्या ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे ठराविक उपक्रमांसाठी अमुक वेळ शुभ वा अशुभ असते किंवा एका राशीच्या लोकांचे विशिष्ट राशींच्या लोकांशी जुळणे वा न जुळणे हे सत्य नाही... आजकालच्या अनिश्‍चित वातावरणात पुष्कळांना महत्त्वाचे निर्णय घेताना मार्गदर्शनाची गरज भासते. म्हणून त्यांना वाटते, की त्यांचे भवितव्य त्यांच्या नियंत्रणापलीकडे तारकांच्या प्रभावाखाली ठरते; पण आपण सर्वांनी जगातल्या वास्तवाला तोंड देणे आवश्‍यक आहे; आपल्याला याची जाणीव बाळगायला पाहिजे, की आपली भविष्ये आपल्या हातात आहेत, तारकांच्या नाही.'
पत्रकावर सही करणारे विविध विषयांतले शास्त्रज्ञ होते. त्यांत नोबेल पारितोषिकविजेतेही होते. ही मंडळी सहसा एका व्यासपीठावर दिसत नाही; पण वरील पत्रकासाठी एकत्र येणे त्यांना आवश्‍यक वाटले, ही गोष्ट महत्त्वाची.
आपण जर एखादे पाश्‍चात्त्य वृत्तपत्र पाहिले, तर त्यात तारका-भविष्याला वाहिलेला कॉलम असतो; परंतु युरोप आणि अमेरिकेत दीर्घ काल वास्तव्य केल्यानंतर मी असे म्हणू शकतो, की अशा प्रकारच्या फलज्योतिषी रकान्यांत रस घेणारे वाचक असले तरी त्यावर विश्‍वास ठेवणारे थोडे-थोडकेच असतील. कुंडल्या जुळवून लग्न ठरवणे, चांगला मुहूर्त पाहून नव्या घरात प्रवेश करणे किंवा प्रस्थान ठेवून प्रवासाला निघणे, आदी वैयक्तिक जीवनातल्या क्रिया जशा भारतात मोठ्या प्रमाणात दिसतात, तशा या देशांत दिसत नाहीत. सार्वजनिक जीवनातदेखील मुहूर्त पाहून नव्या मंत्रिमंडळाला शपथ देणे, नवीन राज्याची सुरवात करणे, पंतप्रधान झाल्यावर शासकीय निवासात गृहप्रवेश करणे, अशा गोष्टींचा सुळसुळाट मी फक्त भारतात पाहिला. मला वाटते, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात फलज्योतिषाच्या नादी लागलेला भारत हा एकमेव मोठा देश असावा.
मला या नादाचा फायदा कसा झाला, ते सांगतो! काही वर्षांपूर्वी माझ्या कॉलेजला जाणाऱ्या कन्येला स्कूटी घ्यायची होती. तिला घेऊन तिची आई स्कूटीच्या दुकानात गेली, तेव्हा कळले, की "वेटिंग लिस्ट' असल्याने दोन-तीन आठवडे थांबावे लागेल; पण तिथे बऱ्याच स्कूटी रांगेत उभ्या केलेल्या दिसल्या. ""इतक्‍या स्कूटी इथे असताना वेटिंग लिस्ट कशी?'' माझ्या पत्नीने विचारले. ""त्या "बुक' झाल्यात; पण कालपासून पितृपक्ष चालू झाल्यामुळे तो संपेपर्यंत त्या उचलल्या जाणार नाहीत.'' दुकानदार म्हणाला. ""मग आम्ही आज यातली एक विकत नेली तर तुम्ही तिच्याऐवजी एक पुढच्या १०-१२ दिवसांत आणून ठेवू शकता!'' माझी कन्या म्हणाली. ""आमची तयारी आहे,'' दुकानदार म्हणाला. ""पण पितृपंधरवड्यात अशी खरेदी करायला तुमची तयारी आहे?'' दुकानदाराने मुलीऐवजी आईला विचारले. तिने अनुमोदन दिले आणि स्कूटीचे पैसे भरून ती विकत आणली. अर्थात या "धाडसी' कारवाईमुळे आम्हाला आकाशातल्या कोणाचा कोप सहन करावा लागला नाही.
"फलज्योतिष हे विज्ञान आहे का?' हा प्रश्‍न मला पुष्कळदा विचारला जातो. त्यापाठोपाठ अशी टीकाही ऐकायला मिळते, की फलज्योतिषाचा अभ्यास व तपासणी न करता शास्त्रज्ञ त्याला "अवैज्ञानिक' ठरवून मोकळे होतात. वस्तुस्थिती वेगळी आहे. विज्ञानाचा किताब मिळवायला त्या विषयाला काही पथ्ये पाळावी लागतात. त्या विषयाची मूळ गृहीतके स्पष्ट मांडावी लागतात. त्यांच्यावर आधारलेला डोलारा कसा उभा केला जातो, ती कार्यपद्धती निःसंदिग्धपणे मांडायला हवी व शेवटी प्रत्यक्ष निरीक्षणातून खरे, खोटे तपासता येईल, असे भाकीत करावे लागते. भाकीत खरे ठरले का खोटे, हे तपासण्याचे संख्याशास्त्राचे नियम आहेत. उदाहरणार्थ, नाणेफेकीत "हेड' वर, का "टेल' वर, हे बरोबर भाकीत करता येते, हा दावा तपासून पाहायला एका नाणेफेकीने ठरवणे योग्य होणार नाही... शंभर वेळा नाणे फेकून आलेल्या निष्कर्षांना संख्याशास्त्राचे निकष लावून ठरवावे. कुंडल्या जुळवून केलेले विवाह कुंडल्या न जुळणाऱ्या असताना केलेल्या विवाहांपेक्षा अधिक यशस्वी, सुखी असतात का, हे तपासायला शेकडो जोडप्यांचे सॅम्पल तपासायला पाहिजे. अमेरिकेत अशा तऱ्हेने केलेल्या चाचणीत कुंडली जुळणे-न जुळणे याचा, विवाह सुखी होईल- न होईल याच्याशी काहीही संबंध नाही, असे आढळून आले.
फलज्योतिषाची कार्यपद्धती, मूळ गृहीतके आणि भाकिते यांबद्दल त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांत एकवाक्‍यता नसल्याचे दिसून येते. एकदा मी काही प्रख्यात फलज्योतिषांनी तत्कालीन राजकारण्यांबद्दल केलेल्या चुकीच्या भाकितांचा गोषवारा एका चर्चेत मांडला असता, येथील फलज्योतिषी म्हणाले, की भाकीत चुकले, कारण ते चांगले फलज्योतिषी नसावेत. अशा वेळी मला भारतीय क्रिकेट टीमच्या पराजयानंतर टीकाकारांच्या सल्ल्यांची आठवण होते. त्यांच्या मते, ज्यांना खेळवले गेले नाही, त्यांना घेतले असते तर निकाल वेगळा झाला असता.
पुष्कळदा फलज्योतिषाचे उदात्तीकरण करायला त्याचा संबंध वेदांशी जोडण्यात येतो; पण जन्मकुंडली मांडणे, जन्मवेळेच्या ग्रहांची स्थिती मानवाचे भवितव्य ठरवते, ही कल्पना हे सर्व वेदातले नसून, ग्रीक-बॅबिलोनियन प्रभावाखाली भारतात आले, असा इतिहास आहे. सूर्यसिद्धान्तातला एक श्‍लोक त्या बाबतीत बोलका आहे. त्यात सूर्यदेव मयासुराला सांगतो ः "तुला या विषयाची (फलज्योतिष) सविस्तर माहिती हवी असेल तर रोमला (म्हणजे ग्रीक-रोमन प्रदेशात) जा. तेथे मी यवनाच्या रूपात ही माहिती देईन.' "यवन' शब्दाचा वापर परदेशी, बहुधा ग्रीक, अशा अर्थी होतो. म्हणजे आपली ही अंधश्रद्धा मूळ भारतीय नसून "इंपोर्टेड' आहे!
खुद्द ग्रीकांमध्ये ही अंधश्रद्धा कशी आली? आकाशातल्या तारकांचे अनेक वर्षे निरीक्षण केल्यावर त्यांना आढळून आले, की आकाशातल्या तारामंडळाच्या पार्श्‍वभूमीवर काही तारका अनियमितपणे मागे-पुढे जात आहेत. त्यांच्या या स्वैरगतीमुळे ग्रीकांनी त्या तारकांना "प्लॅनेट' म्हणजे "भटके' हे नाव दिले. त्यांच्यापैकी वैज्ञानिक वृत्तीच्या लोकांनी या स्वैरगतीमागे काहीतरी नियम असेल, तो शोधायचा प्रयत्न केला; पण बहुसंख्य लोकांनी या स्वैर फिरण्याचा अर्थ "या भटक्‍यांमध्ये काही तरी खास शक्ती आहे ज्यामुळे ते मनमाने फिरतात,' असा लावला. त्यातून पुढे जाऊन असाही समज करून घेतला, की हे ग्रह आपल्या शक्तीचा वापर मानवाचे भवितव्य ठरवण्यात करतात.
पण कालांतराने ग्रह असे का फिरतात, याचे उत्तर विज्ञानाने दिले. ऍरिस्टार्कस, आर्यभट, कोपर्निकस, गॅलिलिओ, केप्लर, न्यूटन अशा मालिकेतून अखेर गुरुत्वाकर्षण हे मूलभूत बळ ग्रहांना सूर्याभोवती फिरवत ठेवते, हे सिद्ध झाले. म्हणजे ग्रह स्वेच्छाचारी नसून, सूर्याभोवती फिरायला बांधले गेलेत. अशा तऱ्हेने विज्ञानाने फलज्योतिषाच्या मुळाशी असलेला भ्रमाचा भोपळाच फोडला. आज अंतराळ युगाला प्रारंभ होऊन अर्धशतक उलटले. मानवाने चंद्रावर पदार्पण केले. मंगळावर याने उतरवली. इतर ग्रहांजवळ अंतराळयाने पाठवून त्यांचे जवळून दर्शन घेतले. दर वेळी गणिताबरहुकूम यान प्रवास करते. नियोजित ग्रहाजवळ नियोजित वेळी जाते. यानातली दूरसंचार यंत्रणा ठरल्याप्रमाणे चालते. यावरून मानवाची कर्तबगारी तर दिसतेच; पण त्याचबरोबर ग्रहांच्या गतीमागे कसलेही रहस्य राहिले नाही, याचीदेखील कल्पना येते. ही कर्तबगारी दाखवणारा मानव पराधीन खचित नाही.
ही विज्ञानाची प्रगती विचारात घेतल्यावर आजही जेव्हा मला एखादा शिकलेला माणूस विचारतो, की ग्रहांचे मानवजीवनावर परिणाम होतात का, तेव्हा मला आश्‍चर्य आणि खेद, दोन्ही अनुभवायला मिळतात. आश्‍चर्य यासाठी, की एकविसाव्या शतकातला मानव हा प्रश्‍न विचारतोय. खेद यासाठी, की विचारणारा भारतीय आहे.
- जयंत नारळीकर (लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)