Thursday, February 27, 2014

आल्या आल्या लोकसभेच्या निवडणुका!

आता २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.ज्योतिषांच्या भाकितांचे आता प्रमाण वाढू लागेल.उमेदवार आता ज्योतिषांचे सल्ले घ्यायला लागतील. मेदिनीय ज्योतिषाच्या आधारे ही राजकीय/निवडणुकीची भाकिते वर्तवली जातात.मेदिनीय ज्योतिष म्हणजे देश, प्रांत यांचे भवितव्य सांगणारी ज्योतिष शाखा. यात हवामान, राजकीय बदल, सामाजिक स्थित्यंतरे, सृष्टी-चमत्कार, क्रांती, भूकंप, युद्धे, दंगली इ. गोष्टींचा मागोवा घेतात. यात देश, प्रांत, शहर, राजकीय पक्ष यांना सुद्धा राशी बहाल केल्या आहेत. उदा. आधुनिक भारताची रास मकर आहे. आता ही सुद्धा कशी? १ नोव्हे.१८५८ रोजी इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीचे भारतावरील वर्चस्व संपून राणीच्या राजसत्तेचे वर्चस्व चालू झाले. या अर्थाने आधुनिक भारताचा जन्म झाला. मग अगोदर भारत नव्हता का? हा प्रश्न इथे निरर्थक आहे. भारताचे भाकीत वर्तवताना आधुनिक भारताची पत्रिका, १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला म्हणून स्वतंत्र भारताची पत्रिका, २६ जाने १९५० ला भारत प्रजासत्ताक झाला म्हणून ती पत्रिका, सत्तेवर असलेल्या पक्षाची पत्रिका, पंतप्रधानांची पत्रिका वगैरे अनेक पत्रिका विचारात घेवून भाकीत वर्तवले जाते. कॉंग्रेसची पत्रिका कुठली तर २८ डिसेंबर १८८५ म्हणजे पक्षस्थापनेची. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला कॉंग्रेसमध्ये विभाजन होत गेले तरी पत्रिका तीच. पोर्तुगीजांनी ब्रिटीशांना मुंबई बेट आंदण म्हणून दिले ती मुंबईची पत्रिका. असे प्रातांचे जन्म धरून त्यांच्या पत्रिका तयार केल्या आहेत. इंदिरा गांधी १९७७ ची निवडणूक हरल्या कारण त्यांनी अमावस्येला फॉर्म भरला होता असं अजंता जैन या राजकीय भाकीत वर्तवणाऱ्या ज्योतिषाने सांगितले होते. १९९१ च्या निवडणूका व राजीव गांधींची हत्या ही कोणालाही सांगता आली नाही. बहुसंख्य ज्योतिषांनी राजीव गांधींच पंतप्रधान होणार असे सांगितले होते. ( पहा साप्ताहिक सकाळ २७ एप्रिल १९९१. व इलस्ट्रेटेड विकली २५-३१ मे १९९१)

पत्रिके वरून कुठल्या पक्षाला किती सीट मिळतील हे सुद्धा ज्योतिषी सांगतात. पक्षाची पत्रिका, उमेदवाराची पत्रिका, निवडणुकीच्या दिवसाची ग्रहस्थिती.देशाची पत्रिका असे अनेक घटक ते वापरतात. कृष्णमूर्ती नावाच्या पद्धतीत उमेदवाराने विचारलेल्या प्रश्नाची कुंडली मांडून तो निवडून येईल का? हे सांगण्याची सोय आहे.उमेदवाराने ज्योतिषाला विचारलेल्या प्रश्न वेळ ही त्या प्रश्नाचा जन्म मानून त्यावेळची कुडली तयार केली की झाली प्रश्न कुंडली. आता समजा एकाच ज्योतिषाकडे दोन परस्पर विरोधी उभे असलेले उमेदवार जरी एकाच वेळी आले असे गृहीत धरले  तरी या पद्धतीत १ ते २४९ पर्यंतचा अंक उमेदवाराला मनात धरायला सांगतात. दोनही उमेदवार हे एकच अंक मनात धरतील अशी शक्यता फार कमी. त्यामुळे त्या अंकाशी (केपी नंबर) संबंधीत असलेली कुंडली ही वेगळी असते.त्यावरुन उत्तर दिले जाते.तसेही एक्जीट पोल, ओपिनियन पोल वगैरे अंदाज घेण्याचे प्रकार असतात. पण त्याचा आधार हा जनमताची चाचपणी हा  असतो.अशी चाचपणी घेणार्‍या कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गोबेल्स राजनीतीत लोकांमधे आपल्याला अनुकुल अशी हवा निर्माण करायला ज्योतिषांचाही वापर होतो. शेवटी राजकारण भावनेच्या लाटेवर चालत. 
 मग, तुम्ही पण सांगू शकता की भाकीत. अं हं! तुम्ही आम्ही सांगतो तो अंदाज व ज्योतिषी सांगतो ते मात्र भाकीत.

1 comment:

devidas deshpande said...

ज्योतिषी नसते तर मानवजात एका मोठ्या मनोरंजनाला मुकली असती. त्यामुळे मनोरंजन मुल्यासाठी तरी ज्योतिषी आणि भविष्यकथनाला पाठिंबा देणे आवश्यक आहे.