Tuesday, August 19, 2008

ज्योतिषांची वर्गवारी

ज्योतिषांची वर्गवारी
पारंपारिक, हौशी, व्यावसायिक, आधुनिक अशी ज्योतिषांची वर्गवारी करता येईल. घराण्यात असलेला ज्योतिषाचा पारंपारिक व्यवसाय पुढच्या पिढीने स्वीकारला तो झाला पारंपारिक ज्योतिषी. पंचांग पहाता येते व पुजा सांगता येते एवढ्या मर्यादित भांडवलावर धार्मिक परंपरेचा भाग म्हणून जरी ज्योतिषाचा व्यवसाय एखाद्या पुरोहित कम ज्योतिषाने केला तरी तो पारंपारिक ज्योतिषी म्हणुन मान्यता प्राप्त होतो. खेडेगावात बहुजन समाज हा ज्योतिष विषयक प्रश्न पहायला भिक्षुकीचा व्यवसाय करणा-या काकांचीच निवड करतो.

Sunday, August 10, 2008

ज्योतिषी कुणाला म्हणायचे?

ज्योतिषी कुणाला म्हणायचे?
ज्योतिषी कुणाला म्हणायचे यात ज्योतिषांमध्येच मतभेद आहेत. अनेक मान्यवर ज्योतिषांच्या स्वत:च्या ज्योतिष संस्था आहेत. त्यात ज्योतिषपंडीत ज्योतिषशास्त्री, होराभुषण, होरामार्तंड अशा उपाधी वा पदव्या देणारे अभ्यासक्रम असतात. त्याची फी असते. ती भरुन जो अभ्यासक्रम पुर्ण करतो असे त्या ज्योतिषसंस्थाचालकाला वाटते त्याला तसे संस्थेकडुन त्या उपाधिचे प्रमाण पत्र मिळते. प्रत्येक संस्थेचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. त्यात प्रमाणीकरण नाही. ज्या हौशी लोकांना ज्योतिषी म्हणवुन हौस असते त्यांना ती येथे पुर्ण करता येते. यात डॊक्टर्स इंजिनियर व्यापारी, नोकरदार सर्व प्रकारचे लोक असतात. डॊक्टर ने हा अभ्यासक्रम पुर्ण केला म्हणजे त्याला वैद्यकशास्त्राची मान्यता मिळाली असा होत नाही.डॊक्टर, इंजिनियर, वकिल, चार्टर्ड अकाउंटंट आर्किटेक्ट हे व्यवसाय करण्यासाठी शासनमान्य विद्यापीठाची शैक्षणीक पदवी लागते व व्यवसाय करण्याची शासनाची सनद लागते. तसे ज्योतिषात नाही.

Friday, August 08, 2008

चित्रमय जगत

फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य
फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य' या चित्रमय जगत च्या जानेवारी १९२१ च्या अंकातील लेखात सत्यान्वेषी लिहितात," .........एक कमिटी स्थापन करावी व तिने गणित व तर्कशास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वानास या शास्त्राच्या संशोधनाचे कामी निधितुन द्रव्यसाहाय्य द्यावे. या शास्त्राचा शोध करणारांस तर्कशास्त्राचे ज्ञान असणे का इष्ट आहे हे उघड आहे. कोणत्या नियमास अनुसरुन सिद्धांत केलेला खरा असतो, सिद्धांतात चुक राहु नये यास्तव कोणते दोष टाळायचे असतात हे तर्कशास्त्रज्ञास माहित असते. यास्तव काहीतरी अनुमान काढायचा प्रमाद त्याच्याकडून फारकरुन घडत नाही. ह्या शास्त्राच्या सध्याच्या स्थितीत कोणत्या गोष्टी निश्चयाने सांगता येतात व कोणत्या नाही हे आकडेवार माहितीने ठरवुन ते शोध कमिटीने प्रसिद्ध करावे, आणि व्यक्तिला उपयुक्त अशा गोष्टी ज्योतिषास सांगता येतात अशी खात्री होईल तर फलज्योतिषशास्त्रात परिक्षा घेउन लायक माणसास सर्टिफिकेट द्यावे व ढोंगी ज्योतिषाविरुद्ध सरकार कडुन एखादा कायदा पास करवून घ्यावा."