Tuesday, August 19, 2008

ज्योतिषांची वर्गवारी

ज्योतिषांची वर्गवारी
पारंपारिक, हौशी, व्यावसायिक, आधुनिक अशी ज्योतिषांची वर्गवारी करता येईल. घराण्यात असलेला ज्योतिषाचा पारंपारिक व्यवसाय पुढच्या पिढीने स्वीकारला तो झाला पारंपारिक ज्योतिषी. पंचांग पहाता येते व पुजा सांगता येते एवढ्या मर्यादित भांडवलावर धार्मिक परंपरेचा भाग म्हणून जरी ज्योतिषाचा व्यवसाय एखाद्या पुरोहित कम ज्योतिषाने केला तरी तो पारंपारिक ज्योतिषी म्हणुन मान्यता प्राप्त होतो. खेडेगावात बहुजन समाज हा ज्योतिष विषयक प्रश्न पहायला भिक्षुकीचा व्यवसाय करणा-या काकांचीच निवड करतो.

खेडयातील सोयरीक आणि मुहूर्त
 'काका येक काम हुतं?
'बोला.`
'सोयरीक जुळवायची होती?`
'काय नांव?`
'इसारले का काका मी बाबू डोंगरा.`
'अरे तुझ नाही तुज्या पोराचं.` काका खेकसतात.
'खंडू.`
'अन पोरीचं?`
'इंदी.`
काका हातांच्या बोटांवरील पेरांवर अंगठयाने गणित करत सांगतात.
'नाही जमतं.`
'नाही जमतं? कसं नाही जमंत? अहो मामाचीच प्वार हाये. शिकल्याली बी हाये. आमचा ठोंब्या यव्हाराला लई कच्चा. म्हन्ल प्वार तरी जरा शिकल्याली करावी. श्येतात बी कामाला चांगली आहे. आजकाल येटाळन्यांना बी कुठं मान्स मिळत्यात. आपला घरचा मानुस असल्याला बरा. म्हनून म्हन्लं औन्दा द्यावा उडवून बार. बरं मंग जलमनावावरून नसंन जमत तर मंग चालू नांवावरून पघा. तिला अलका बी म्हन्त्यात. पघा पघा जरा बाडात. काही तरी तोडगा असनंच की.`
काका परत पंचांगात बघतात व जुळत असल्याचे सांगतात. कारण बाबू डोंगऱ्याला तीच पोरगी सून म्हणून करायची आहे हे त्याने ताडलेले असते. राहिला फक्त जुळतय का नाही हे बघण्याचा सोपस्कार. मग कशाला जुळत नाही म्हणून सांगा शेवटी लग्न आपल्यालाच लावून द्यायचं आहे. खेडेगावांत बहुजन समाजात बराचसा वर्ग लग्न जुळवण्यासाठी गावच्या बामनाचा सल्ला घेतात कारण ज्योतिष हे धर्माचं अंग आहे. मग सोयरीक ठरण्याचा कार्यक्रम असा नसतोच. काकांनी मुहूर्त काढून दिला की त्याचा उपयोग पत्रिका छापण्यासाठी काहीतरी दिनांक व वेळ द्यावी लागते म्हणून होतो. प्रत्यक्षात त्या मुहूर्तावर लग्न कधीच लागत नाहीत. प्रत्यक्ष लग्नाची वेळ व मुहूर्त यातील अंतर कितीही तासांचे असू शकते. मुलीच्या मामाने मुलीला घेउन या असे सतरावेळा लाउडस्पीकर वर सांगितल्यावर जमेल तशी ती बोहल्यावर उभी रहाते. मुहूर्त टळून गेल्याचा ना काकांना खेद ना व-हाडी लोकांना. शेवटी व-हाडी मंडळींच्या सोयीनेच लग्न लागते.

हौशी ज्योतिषी
हौशी ज्योतिषी हा हौसेने ज्योतिष शिकतो. पुस्तक, चर्चा, परिसंवाद, कार्यशाळा, संस्थांचे अभ्यासक्रम इत्यादि माध्यमातुन स्वत:चे ज्योतिष ज्ञान विकसित करतो. पैसे न घेता इतरांचे भविष्य सांगतो. चुकला तर त्याला कुणी फाशी देणार नसतं. यातुन त्याला समाजात मान मिळतो. असा मानसन्मान मिळाला कि तो खूष होतो. स्वत:च्या सन्मानाचा व ज्योतिषशास्त्राचा प्रसार तो एकाच वेळी करत असतो. कधी हौस म्हणून तर कधी मानधन घेउन तो वावरताना दिसतो. हौसेला मोल नसते यामुळे आपल्या हौसेसाठी ते वेळ श्रम व पैसा खर्च करतात. ज्योतिष विषयक मासिकातून अधुनमधून लेख लिहीणे हे काम ते अगदी हौसेने करताना दिसतात. ज्योतिष संमेलनात प्रतिनिधी, स्वयंसेवक म्हणून यांचे योगदान ज्योतिषशास्त्राच्या प्रसारास उपयुक्तच ठरते. त्यामुळे व्यावसायिक ज्योतिषांचे मार्केटिंग एक्स्झिक्युटिव म्हणुन त्याचे काम असते.

व्यावसायिक ज्योतिषी
ज्योतिष हे ज्याचे अर्थार्जनाचे प्रमुख साधन आहे त्याला व्यावसायिक ज्योतिषी म्हणावे. आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी जी कौशल्ये, तडजोडी वा प्रसंगवशात लबाडी इतर व्यावसायिकांना करावी लागते तीच यालाही करावी लागते. नावापुढे पदव्यांची भेंडॊळी, फोटॊ, समारंभ पुर्वक कार्यक्रम, मोफत कार्यशाळा,व्याख्याने, लेख जाहिराती, कार्यालयाचे संगणीकरण सुशोभिकरण, मोठ्या व्यक्तिंचे आशिर्वाद किंवा लागेबांधे, इतर सामाजिक सहभाग, सातत्याने लोकांच्या समोर येण्यासाठी अधुन मधुन पत्रकार परिषद निवेदने ,बातम्या, स्मरणिका यांचा यथेच्छ वापर हा त्याला करावाच लागतो. समाजपयोगी कार्य हे लेबल लाउन राजकारणातील चळवळ वा चळवळीतील राजकारण हे लोकांसमोर आणावे लागते. त्याशिवाय 'मान्यवर' हे लेबल प्राप्त होत नाही. हे लेबल मिळाल्या नंतर टिकवणे तेवढेच मह्त्वाचे. आपल्याला मानसन्मान मिळाल्यानंतर तो इतरांना वाटला पाहिजे. इतरांना वाटला कि तो वाढतो. ज्ञान हे इतरांना वाटल्यावर स्वत:कडचे कमी होत नाही पण इतरांकडचे मात्र वाढते. पण सन्मान मात्र इतरांकडे वाटल्यावर स्वत:चा वाढतो. त्यामुळेच पुरस्कार सोहळे हे उदंड झाले. हे पुरस्कार म्हणजे अमुक यांना 'तमुक पुरस्कार' हा पुरस्कार सोहळा दणक्यात करावयाचा कि त्याची परतफेड तमुक यांना 'अमुक पुरस्काराने' होते. यामुळे अमुक व तमुक या दोघांचेही सामाजिक वजन वाढते. विरोधकांना आपलसं करुन घ्यायला व असंतुष्टांची बंडखोरी थोपवायला हे पुरस्कार फारच उपयोगी येतात. पुरस्कार देताना 'नम्रता' व स्वीकारताना 'संकोच' बाळगला कि त्याला अधिकच झळाळी येते. अशा 'दखलपात्र' सामाजिक कार्याची दखल ही समाजाला घ्यावी लागते नाही तर सामाजिक कृतघ्नतेचा शिक्का बसण्याचे भय आपण समाजाला दाखवावे. पुरस्काराची रक्कम जर रोख स्वरुपात असेल तर पुरस्कारार्थी व पुरस्कार कर्ता यांच्यात समारंभपुर्व सामंजस्य लागते. त्यामुळे पुरस्काराची किती रक्कम सामाजिक कृतज्ञता निधी म्हणुन परत करायची हे ठरवता येते. समजा ते शक्य झाले नाही तर समारंभाच्या भाषणातून पुरस्कारार्थी वर असाकाही सात्विक व नैतिक दबाव टाकून कोंडी करावी कि पुरस्करार्थी ला पुरस्कारातील जवळजवळ सर्वच रक्कम परत करावीशी वाटली पाहिजे. यात त्याचेही सामाजिक वजन वाढत असल्याने परस्परहित असते. असो तर सांगायचे तात्पर्य काय कि ज्या ज्योतिषाला ही जनमानसाची नाडी अचुक पकडता येते तो उत्तम व्यावसायिक ज्योतिषी बनतो. आता काही ज्योतिषी हे लॊजवर मुक्काम ठोकुन ज्योतिषाचा व्यवसाय करतात त्यामुळे त्यांनाही व्यावसायिक ज्योतिषी म्हणावे लागते. खाजगीत मात्र त्यांना लुटारु ज्योतिषी म्हणावे कारण ते आपल्या व्यवसायाचे प्रतिस्पर्धी असतात. पण उघडपणे मात्र "यांच्यामुळे ज्योतिषशास्त्र बदनाम होते" असे म्हणावे. या प्रकारच्या बाजारु ज्योतिषांना ज्ञान व मान या पेक्षा पैसा महत्वाचा असतो. तुम्ही खुशीने द्या किंवा नाईलाजाने द्या पण अमुक एक रक्कम किमान द्याच. यांच्या जाहिरातीतच १०१ टक्के ग्यारंटी असते. साई, दुर्गा, लक्ष्मी, ओम, श्रद्धा, शिव, चामुंडा कालिका, सिद्धी, वैभव अशा नामाभिधानांचा वापर करुन यांची ज्योतिष कार्यालये चालु होतात. 'इकडे तिकडे भटकु नका थेट येउन भेटा' असे आवाहन असते. २४ किंवा ११ तासात निकाल. लग्नयोग, लव्ह प्रॊब्लेम्स,पुनर्विवाह, घटस्फोट, सौतन दु:ख, संतानपीडा, लक्ष्मी प्राप्ती, कोर्टकेसेस, कर्ज मुक्ती, व्यसनमुक्ती,विद्याप्राप्ती, विदेश योग, यावर प्रभावी मार्गदर्शन ,उपाय व तोडगे असतात. तांब्याच्या पत्र्यावरची यंत्रे, एक मुखी रुद्राक्ष, रत्ने, विधी या परिहारक साहित्याचे भांडार असते. भविष्य चुकले तर पैसे परत असाही दावा असतो. पुजासाहित्य हे अहस्तांतरणीय असल्याने त्याचे पैसे मात्र परत मिळु शकत नाहीत. त्यामुळे या साहित्याची किंमत हजार रुपये किंवा अधिक व ज्योतिष सल्ल्याची फी मात्र पन्नास रुपये. उद्या पैसे परत कुणी मागितलेच तर पन्नास रुपये हातावर टेकवता येतात. काही बालंट आले कि चंबुगबाळ न आवरताही पळ काढण्याची सोय या व्यावसायिक ज्योतिष प्रकारात असते. स्थानिक ज्योतिषांना मात्र लोकांना तोंड द्यायचे असते त्यामुळे काहीच्या काही सांगुन चालत नाही.

संगणक शास्त्री
आधुनिक युगात आता संगणक शास्त्री निर्माण झालेत. ते संगणकावर तुमची पत्रिका पटकन काढून देतात. तसेच कालबद्ध भाकितांचे, षोडश वर्ग, महादशा अंतर्दशा यांचे प्रिंटआउटस काढून देतात. जेवढी सुक्ष्मता जास्त तेवढी पाने जास्त. जेवढी पाने जास्त तेवढी फी जास्त. जास्त पाने दिली कि लोकांना बरे वाटते. एक हजाराची एक नोट देण्यापेक्षा १० रुपयाच्या शंभर नोटा दिल्या कि देणा-यालही जास्त दिल्यासारखे वाटते व घेणा-यालाही जास्त घेतल्यासारखे वाटते.संगणकाचे प्राथमिक ज्ञान व ज्योतिषाचे किंचित ज्ञान या भांडवलावर हा व्यवसाय करता येतो. तालुका, जिल्हा या ठिकाणी यांची चलती असते. जत्रा किंवा फन फेअर अशा ठिकाणी यांचा स्टॊल चांगला चालतो.

आधुनिक ज्योतिषी
तुमचे इंग्रजी व आधुनिक ज्ञान चांगले असेल तर तुम्हाला "मॊडर्न स्कुल ऒफ थॊटस" च्या पंक्तीत बसवता येते. अध्यात्म वि विज्ञान यांना एकाच पंक्तीत बसवायला तुम्हाला जमलं कि झालं. लोकांना हे रसायन जाम आवडत असत. एखाद्या तारांकित हॊटेल किंवा कॊन्फरन्स हॊलमध्ये लॆपटॊपवर ज्योतिषाचे पॊवरपॊईंट प्रेझेंटेशन दिले कि तुम्हाला All India किंवा International हे लेबल लावता येते. International astrological convension किंवा all india astrogical science congress अशा होर्डींग मध्ये सुटाबुटातल्या हौशा गवश्या नवश्यां सोबत फोटो काढून घ्यावेत. स्थानिक वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध करुन आणावी. यासाठी थोडा खर्च झाला तरी घाबरु नये. तो सुटा बुटातल्याच इतर जातकांकडून दामदुप्पटीने वसुल करता येतो. वेदिक या शब्दाला भरपुर ग्लॆमर असल्याने त्याचा इंग्रजाळलेल्या उच्चाराने सचैल वापर करावा. गंडे दोरे ताईत याच्या भानगडीत पडू नये. ते मागासलेल्या लोकांचे काम आहे. आपण पिरॆमिड, क्रिस्टल, फेंगशुई साहित्य यांचा वापर करावा. प्रसंगी न्युमरॊलॊजीचा वापर करावा.टॆरो पण लोकांना आवडाला लागलयं. जर्मन, चिनी ज्योतिष या विषयात लुडबुड करावी. रोटरी, लायन, डेक्कन, स्पोर्टस, फिल्म सोशल आर्ट अशा नावांच्या क्लब / सर्कल तसेच कॊस्मोपोलिटियन सोसायट्या हा आपला प्रांत मानावा. ज्योतिषशास्त्राच्या आवरणातुन मानसशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र यावर भाषण ठोकावे.

आकडेशास्त्री
सगळे जग आकड्याभोवती फिरते हा सिद्धांत जनमानसात ठसवावा. मटकेबहाद्दरांना वेगळे सांगण्याची गरज नसते पण पांढरपेशा वर्गाला आकड्यांबद्दल अनास्था असते. त्यांना पगाराचा आकडा व महिन्याची तारीख यांची चपखल उदाहरणे देउन त्याचा ताळेबंद तुम्ही आकड्यांद्वारे सोडवता ना? असे म्हणुन गोंजारावे. शेअर मार्केटच्या आकड्यांची उधळण करुन स्वप्न वा भीती दाखवावी. भाग्यांक काढून आयुष्यातील महत्वाच्य़ा घटना या आकड्यांशी संबंधीत कशा आहेत हे दाखवावे. अक्षरांचेही अंकात रुपांतर करण्याची किमया या शास्त्रात असल्याने शब्दांची उधळण करुन त्याला पुरेसे 'अंकित' करुन घ्यावे. एकटा जीव सदाशीव, द्वैत, तीन तिघाडा काम बिघाडा, चातुर्वण्य, पाचा मुखी परमेश्वर, षड्रिपु, सप्तरंग अष्टांग, नवरस, दशानन याचा आकडे शास्त्राशी संबंध लाउन बिगबॆंग थिअरीच्या शुन्यातून अनादि अनंत च्या प्रवासाकडे अर्थात इन्फिनिटी कडे न्यावे.या प्रचंड विश्वात आपण किती क्षुल्लक आहोत असे ठासुन सांगावे. आकड्यांवर ग्रहांचे देखील अंमल असल्याचे सांगुन त्याचे पुर्वग्रह तपासून घ्यावेत. जन्मतारखे वरुन भाग्यांक काढु शकतो तर दुर्भाग्यांकावरुन मृत्युची तारीख का काढता येउ नये? असा उलटा प्रश्न त्यालाच विचारावा. तो भयचकित झाला कि त्याला अज्ञानातील आनंदाचे अभय देउन आपण निर्धास्त रहावे. एखाद्या प्रलंबित राहिलेल्या प्रश्नाची उत्सुकता त्याच्या चेहर-यावर उमटली कि रमलच्या पत्त्यांचा कॆट काढावा व त्याला पत्ता काढायला सांगावा.(रतन खत्री स्टाईल) त्यातुन रमलचा चार्ट पाहुन त्याचा अर्थ पहावा. तो अनुकुल असेल तर जशाच्या तसा सांगावा. व्यवहार्य असलेला प्रतिकूल अन्वयार्थ आपल्या मनातच ठेवावा. समजा प्रतिकुल अर्थ निघाला तर त्याचा अनुकूल अन्वयार्थ काढून त्याला सांगावा. प्रतिकूल अर्थ अडगळीत टाकावा. पुढे मागे प्रतिकूल घटना घडलीच तर अडगळीत टाकलेला तो अर्थ काढून त्याच्या तोंडावर फेकावा व शास्त्र चुकत नसल्याचा निर्वाळा द्यावा. रमी. ब्रिज वगैरे खेळणार्या लोकांना यापद्धतीने आपलेसे करावे.तेच आपले प्रचारक असतात.
आकडा हाच आपला तुकडा! जय आकडेश्वर!

No comments: