Sunday, August 10, 2008

ज्योतिषी कुणाला म्हणायचे?

ज्योतिषी कुणाला म्हणायचे?
ज्योतिषी कुणाला म्हणायचे यात ज्योतिषांमध्येच मतभेद आहेत. अनेक मान्यवर ज्योतिषांच्या स्वत:च्या ज्योतिष संस्था आहेत. त्यात ज्योतिषपंडीत ज्योतिषशास्त्री, होराभुषण, होरामार्तंड अशा उपाधी वा पदव्या देणारे अभ्यासक्रम असतात. त्याची फी असते. ती भरुन जो अभ्यासक्रम पुर्ण करतो असे त्या ज्योतिषसंस्थाचालकाला वाटते त्याला तसे संस्थेकडुन त्या उपाधिचे प्रमाण पत्र मिळते. प्रत्येक संस्थेचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. त्यात प्रमाणीकरण नाही. ज्या हौशी लोकांना ज्योतिषी म्हणवुन हौस असते त्यांना ती येथे पुर्ण करता येते. यात डॊक्टर्स इंजिनियर व्यापारी, नोकरदार सर्व प्रकारचे लोक असतात. डॊक्टर ने हा अभ्यासक्रम पुर्ण केला म्हणजे त्याला वैद्यकशास्त्राची मान्यता मिळाली असा होत नाही.डॊक्टर, इंजिनियर, वकिल, चार्टर्ड अकाउंटंट आर्किटेक्ट हे व्यवसाय करण्यासाठी शासनमान्य विद्यापीठाची शैक्षणीक पदवी लागते व व्यवसाय करण्याची शासनाची सनद लागते. तसे ज्योतिषात नाही.
ज्योतिषाचा व्यवसाय हा ज्याला इतर लोक ज्योतिषी मानतात असा माणुस किंवा स्वयंघोषित ज्योतिषी असा कुणीही करु शकतो. कुठलीही ज्योतिष संस्था ही 'संस्था' म्हणुन धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करु शकते. त्यानंतर त्याला नोंदणीकृत संस्था अशी शासनमान्यता मिळते. याचा अर्थ ज्योतिषाला विज्ञान मान्यता मिळाली असा होत नाही. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री श्री भट यांना आपल्या संस्थेचा अभ्यासक्रम हा सर्वमान्य असावा म्हणजे ज्योतिष अभ्यासक्रमात प्रमाणीकरण होईल असे वाटते. पण इतर ज्योतिष संस्थां तो अभ्यासक्रम प्रमाण मानायला तयार नाहीत. त्यांचा स्वायत्त अभ्यासक्रम असतो. आजही अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट मध्ये केप्लर कॉलेज ऑफ अस्ट्रॉलॉजीकल आर्टस एण्ड सायन्सेस मध्ये फलज्योतिषाचे एम.ए व बी.ए चे पूर्ण अभ्यासक्रम आहेत. त्यात फलज्योतिष- मानसशास्त्र व समुपदेशन कला, फलज्योतिष व आरोग्य, वैदिक परंपरा व फलज्योतिष, खगोलशास्त्र -फलज्योतिष व संगणकविज्ञान, फलज्योतिष व नवविज्ञान, फलज्योतिषाचे तत्वज्ञान व आधुनिक सिद्धांत यासारखे विषय शिकवले जातात.

विद्यापीठात तुम्हाला वेद, उपनिषद, पुराण या विषयांवर अभ्यास करुन डॉक्टरेट सुद्धा मिळवता येते. ज्योतिष हे वेदाचे अंग मानल्याने त्या अंतर्गतही तुम्हाला तो विषय पीएचडी साठी घेता येतो. साहित्य, लोककला, इतिहास, संस्कृती, असे अनेक विषय विद्यापीठात घेतले जातात. त्यात अनेक उपविषय येतात. त्यात ज्योतिष हाही भाग आलाच. पण तो खगोल वा भौतिक विज्ञान या स्वरुपात नव्हे किंवा विद्यापीठाचा या विषयाशी संबंध आला म्हणजे त्याला विद्यापीठाची विज्ञान म्हणून मान्यता मिळाली असाही नव्हे. लंडनमध्ये सुद्धा डिप्लोमा ऑफ फॅकल्टी ऑफ अस्ट्रॉलॉजिकल स्टडीज असा एक डिप्लोमा आहे. शिवाय सध्या अनेक मुक्त विद्यापीठे आहेत. त्यातून काही ज्योतिषांनी डॉक्टरेट सुद्धा मिळवल्या आहेत. हल्ली आपल्याकडे ज्योतिष क्षेत्रात बऱ्याच डॉ लोकांचे पेव फुटले आहे. पंडीत, शास्त्री वगैरे उपाधी असलेली मंडळी अल्पावधीत अचानक डॉ. म्हणून उपाधी लावायला सुरुवात करतात. कारण त्यांना श्रीलंकेतील कोलंबो येथे असलेली दि ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर कॉम्प्लीमेन्टरी मेडिसीन यांची डॉक्टर ऑफ सायन्स वा डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अशी पदवी मिळालेली असते. अमरावतील एलिमन्टोपॅथी प्रतिष्ठान यांचे कडून सुद्धा वाचस्पती उर्फ डॉक्टरेट मिळण्याची सोय आहे. तुमची पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्हाला सुद्धा समारंभपूर्वक डॉक्टरेट मिळू शकते.जेवढे पैसे खर्च करण्याची तयारी तेवढे डॉक्टरेट डिग्री ची तीव्रता जास्त असते.

फलज्योतिषाची पाश्चात्य देशातील स्थिती बाबत १९३५ साली प्रकाशित झालेल्या रा.ज.गोखले यांच्या 'फलज्योतिष चिकित्सा` या पुस्तकात ते म्हणतात:-
'अमेरिकेत Lewellyn येथे फलज्योतिषाचे कॉलेज आहे.` वगैरे विधानावरुन हे कॉलेज किंवा अशा दुसऱ्या संस्था ऑक्सफर्ड, केंब्रिज येथील कॉलेजसारख्या असतील असे कोणाला वाटेल; पण वस्तुस्थिती तशी नाही. ह्या विषयाचे शिक्षण देण्याकरीता काही संस्था काही लोकांनी काढल्या आहेत व पाश्चात्य देशात मतस्वातंत्र्याचे तत्व मान्य असल्याने काही मर्यादेपर्यंत कोणासही मान्य असणारी गोष्ट करू देतात. या तत्वास अनुसरून अशा संस्थेस सरकारने मनाई केली नाही एवढेच. पण अशा संस्थांना तिकडे शास्त्रज्ञात मान्यता नाही.
पाश्चिमात्य देशात काही तोतया युनिव्हर्सिटयाही असतात हे ध्यानात ठेवावे. इकडील काही लोकांना डॉक्टरेटची पदवी देणारी अमेरिकेतील 'ओरिएंटल युनिव्हर्सिटी` अशापैकीच होय. काही अडचणीमुळे ती सरकारास बंद करता आलेली नाही; पण तिचा पत्रव्यवहार पोस्ट ऑफिसने घेउ नये असा नियम तेथील सरकारने केला असल्याचे ऐकिवात आहे. सांगण्याचा अर्थ हा की
पाश्चात्य देशातील 'कॉलेज` 'अकॅडमी` अथवा 'युनिव्हर्सिटी` एवढया नावावरून ती संस्था विद्वन्मान्य आहे असे मुळीच होत नाही.`

No comments: