"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे". अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत असतो,पहात असतो. पण हा 'कालनिर्णय' नसून कालनिर्देशनाचा प्रकार आहे.निर्णय घेणारे तुम्ही कोण लागून गेले? तुम्हाला जर तुमची जन्मतारीख विचारली आणि तुम्ही जर त्याला ' माझा जन्म भारतीय सौर दिनांक अमुक अमुक रोजी झाला' किंवा भाद्रपद कृष्ण चतुर्थी शके १८८४ रोजी झाला 'असे सांगितले तर तो नक्कीच भारतीय असून सुद्धा विक्षिप्त नजरेने तुमच्या कडे बघेल.
पंचांगाचा उदय
मानव जसा उत्क्रांत होत गेला तशी त्याला दैनंदिन व्यवहारासाठी कालमापनाची व कालनिर्देशनाची गरज निर्माण झाली. शिकार ते शेती या प्रवासात शेती हा मुख्य मानवी जीवनाचे अंग झाल्याने निसर्गाच मानवी जीवनाशी नातं सांगणारे दिवस रात्र, उन, पाउस, थंडी, वारा,सागरातील भरती ओहोटी याचा अवकाशातील विशिष्ट ग्रह ता-यांच्या स्थितीशी संबंध हळूहळू लक्षात येउ लागला. समाजजीवनातील सर्व कृत्ये ही अप्रत्यक्षरित्या शेतीशीच निगडीत होउ लागली. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुराशी लोकजीवन अवलंबून होते. त्यामुळे या संबंधांचे निरिक्षण करुन त्यावरुन काही आडाखे बांधता येउ लागले.यातूनच ज्योतिषशास्त्राचा म्हणजे आताच्या खगोलशास्त्रीय भागाचा उगम झाला. फार पूर्वी फलज्योतिष हा शब्द प्रचारात नव्हता.ज्योतिष किंवा ज्योतिःशास्त्र हा शब्द वापरात होता. ज्योति म्हणजे आकाशातील दिप्तिमान गोल.चंद्र, सूर्य, ग्रह. तारे इत्यादि.
ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे.
सिद्धांत संहिता आणि होरा हे ते तीन स्कंध होत. सिद्धांत म्हणजे ग्रहगतीचे खगोलगणित, संहिता स्कंधात ऋतूमानानुसार नागरी जीवनातील व्यवहारातील कृत्ये व कर्तव्ये केव्हा करावीत, म्हणजे कुठल्या नक्षत्रावर करावीत,मुहूर्त हा सांगणारा भाग म्हणजे संहिता स्कंध. होरा हा भाग म्हणजे आजचे भविष्यशास्त्र. जो वादग्रस्त विषय आहे. पूर्वी हे सर्व काम करणारी एकच व्यक्ति म्हणजे ज्योतिषी होती. युरोपात जोहनीज केपलर (१५७१ - १६३०) काळात या खगोलशास्त्रज्ञाला देखील वेध शाळेद्वारा ग्रहणादि गोष्टी व फलज्योतिष सांगावे लागे. वेधशाळांना राजाश्रय होता. कालांतराने ज्योतिःशास्त्राला खगोलशास्त्र व ज्योतिष हा शब्द फलज्योतिष या अर्थाने वापरात आले.
पंचांग कालनिर्देशनाची चोपडी
पंचांग हा कालनिर्देशनाचा ज्योतिषशास्त्रीय भाग आणि ज्योतिष हे धर्माच पारंपारिक अंग म्हणून पंचाग प्रचलित झाले ते धार्मिक कृत्याचा दैनंदिन जीवनात आचरण्यासाठी असलेल्या कालनिर्देशनाच्या गरजेपोटीच. पंचांगाची पाच अंगे म्हणजे १) तिथी २) नक्षत्र ३) वार ४) योग ५) करण भारतीय ज्योतिर्गणित हे पृथ्वी केंद्रबिंदू मानून तयार झाले असल्याने सूर्य हा तारा असला तरी त्याला ग्रहाप्रमाणे स्थान देउन तो चल झाला आहे. चंद्र व सूर्य यांच्यात पृथ्वी सापेक्ष बारा अंशाचे अंतर पडण्यास जो कालावधी लागतो त्याला तिथी म्हणतात. चंद्र हा पृथ्वीभोवती २९.५ दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करतो. तरी व्यवहारात तिथी ३० या पुर्णांकात घेतल्या आहेत. तिथी हे पंचांगाचे बरेच जुने अंग आहे. इ.स. पु १४०० वर्षी तिथी व नक्षत्र ही दोनच अंगे प्रचारात होती.पंचांगात एखादी तिथी दोनदा आलेली असते तर एखाद्या तिथीचा क्षय झालेला असतो. याचे कारण चंद्र व पृथ्वी यांची गती कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते.सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते. ती त्या दिवसाची तिथी म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी तिथी सूर्योदयानंतर चालू होते व दुसर्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते.त्यामुळे त्या तिथीचा क्षय होतो. एखादी तिथीबाबत ती दुसर्या दिवशीच्या सूर्योदयानंतर संपते,त्यामुळे त्या तिथीची वृद्धी होते. थोडक्यात लॉज मधल्या चेक आउट टाईमप्रमाणे ही गणना होते. तिथीचा संबंध हा धार्मिक कृत्याशी संबंधित असल्याने तिथी सूर्योदयापासून दुसर्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत मानली जाते. संकष्टी, अंगारिका चतुर्थी हे शब्द आपण नेहमी ऐकतो. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी मंगळवारी आली कि झाली अंगारिका. प्रत्येक तिथीला एक देवता पण बहाल केली आहे. चतुर्थीची देवता गणेश ही आहे. अमावस्येची देवता पितर ही आहे. नक्षत्र म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूहाचे पट्टे. त्यातील ठळक तार्याला त्या नक्षत्राचा योगतारा म्हणतात. पण हे झाले स्थूल मानाने. अवकाश गोल म्हणजे एक कलिंगड आहे असे मानले तर त्याचे समान २७ खाप करायचे.म्हणजे एक फोड झाली १३ अंश २० कलांची. थोडक्यात अवकाशगोलातील १३ अंश २० कलांचा दक्षिणोत्तर पट्टा म्हणजे नक्षत्र. चंद्र २९.५ दिवसात या २७ नक्षत्रांची प्रदक्षिणा पूर्ण करतो. एखादे धार्मिक कृत्य अमुकामुक नक्षत्रावर करावे असे म्हणतात त्यावेळी चंद्र त्या नक्षत्रात असताना करावे असा अर्थ अभिप्रेत असतो. जन्मनक्षत्र याचा अर्थ तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते नक्षत्र.
पंचांगातील वार हे अंग मात्र उशीरा प्रचलीत झाले. हे अंग मूळ भारतीयांचे नव्हे. ते आपल्याकडे इ.स.पू.५०० ते १००० वर्षांपूर्वी आले. ते खाल्डियन,इजिप्शियन वा ग्रीक संस्कृतीकडून आपल्याकडे आले असावेत. महाभारतात वार अस्तित्वात नव्हते असे 'भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास' या ग्रंथाचे कर्ते शं.बा.दिक्षित सांगतात. होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एक अहोरात्रचे २४ समान भाग केले असता.एक भाग म्हणजे होरा. हल्लीच्या तास या अर्थाने. प्रत्येक होर्याला कुठलातरी ग्रह अधिपती असतो. त्याचे नांव वाराला दिले आहे.योग व करण ही पंचांगाची अंगे व्यवहारात अजिबात उपयोगाची नाही. चंद्र व सूर्य यांच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास जेवढा कालावधी लागेल त्याला योग म्हणतात.असे एकूण २७ योग म्हणजे नक्षत्राइतकेच आहेत. करण हा पण असाच कालावधी आहे तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण असे एकूण सात करणे आहेत. शिवाय अजून ४ करणे आहेत. एखाद्या तिथीचा पूर्वार्ध म्हणजे एक करण व उत्तरार्ध म्हणजे एक करण. या योग आणि करण यांची नावे उच्चारायची म्हणजे जड जीभ असणार्या माणसाचे काम नव्हे.
पंचागातील इतर कालमापक संज्ञा म्हणजे संवत्सर, मास, घटी, पळे. बारा चांद्र मासांचे एक संवत्सर. एक चांद्रमास २९.५ दिवसांचा. अशी ६० संवत्सरे आहेत.अशी आवर्तने चालू असतात. एक सौर वर्ष म्हणजे ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिट व ४५ सेकंदचे आहे. चांद्र मासानुसार वर्ष ढोबळपणे ३५४ दिवसांचे होते.तर सौर मानाने येणार्या ११ दिवसांचा फरक भरुन काढण्यासाठी दर तीन वर्षांनी एका महिन्याची भर घालतात.यालाच अधिक मास म्हणतात. दुष्काळात तेरावा महिना अशी जी म्हण आहे त्यातला तेरावा महिना म्हणजेच हा अधिक महिना.
घटी पळे या गूढ वाटणार्या कालमापक संज्ञा हल्ली पंचांगात कलाक मिनिटात देतात. २४ तास म्हणजे ६० घटिका,१ तास म्हणजे २|| घटिका व एक मिनिट म्हणजे २|| पळे, एक सेकंद म्हणजे २|| विपळे. आताचे पंचांगकर्ते हे सर्व गणित नॉटिकल अल्मानॅक वरुन तास मिनिटे सेकंद या परिमाणात करतात. पूर्वी राजे राजवाड्यांच्याकडे एक घंगाळ ( पाण्याचे साठवणूक करणारे एक विशिष्ट प्रकारचे मोठे भांडे) असे. त्यात पाणी विशिष्ट पातळीपर्यंत भरले जाई. त्यात एक विशिष्ट आकाराचे छिद्र असलेले एक छोटे पात्र असे. त्याला घटिका पात्र म्हणत त्यातून पाणी हळू हळू आत शिरत असे. ते पूर्ण भरले की बुडत असे. तेव्हा घटिका भरली असे म्हणत. त्यासाठी स्वतंत्र माणूस नेमला जाई. उज्जैन ला वेधशाळा होती. तेथे वालुकायंत्र, छायायंत्र अशी कालमापनाची विविध यंत्रे असतं. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीच्या काल गणना आहेत. इजिप्तमध्ये पिरॆमिडच्या टोकाची छाया कशी पडते यावरुन दिवस किती गेला व किती राहिला हे ठरवत असत. म्हणजे एक प्रकारचे छायायंत्रच झाले. मध्ययुगिन काळात चीन मध्ये एक दोरी घेउन विशिष्ट अंतरावर गाठी मारत, दोरीचे जळते टोक प्रत्येक गाठीपर्यंत आल्यावर किति काळ झाला हे ठरवत. युरोप मध्ये त्याच काळात मेणबत्ती किती जळाली यावरुन दिवस किती झाला हे ठरवले जात असे. कारण साधे आहे चर्चमध्ये मेणबत्तीचा वापर सहज उपलब्ध होता. आजही खेडेगावात सवसांच्या टायमाला, दिवस कासराभर वर आला आसन तव्हा, माथ्यावर आला होता, कोंबड आरवायच्या टायमाला अशा वर्णनातून दिनमानाचे भाग जुन्या काळातले लोक सांगतात.
पंचांगातील पौराणिक कालगणना
६० वर्षे (संवत्सरे) = १ संवत्सर चक्र
३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे = १ दिव्य वर्ष
१२०० दिव्य वर्षे = १ कलियुग
२४०० दिव्यवर्षे = १ द्वापार युग
३६०० दिव्य वर्षे= १ त्रेता युग
४८०० दिव्य वर्षे= १ कृत युग
४ युगे = १ महायुग
७१ महायुगे = १ मनु
१४ मनु= १ कल्प (ब्रह्मदेवाचा एक दिवस)
३६००० कल्प= ब्रह्मदेवाचे पुर्ण आयुष्य
१००० ब्रह्माची आयुष्ये=१ विष्णुची घटका
१००० विष्णुच्या घटिका म्हणजे १ शिवनिमिष
१००० शिवनिमिष = १ महामाया निमिष
पंचांगवादाचे स्वरुप
पंचांगवाद हा मुळात खगोलशास्त्रीय आहे.आपल्याकडे निरनिराळी पंचांगे प्रचारात आहेत. गुजराथ मध्ये जन्मभूमी पंचांग, वैदर्भिय राजंदेकर पंचांग, सोलापूरचे दाते पंचांग, रुईकर पंचांग, लाटकर पंचांग, ढवळे पंचांग, टिळक पंचाग इत्यादि नावे प्रसिद्ध आहेत, पण पंचांगाचे मुख्य पक्ष दोनच. सायन आणि निरयन. अगदी रिपब्लिकन आणि डेमोक्रॆटिक पक्षासारखे. निरयन पक्षाचे म्हणणे असे कि क्रांतीवृत्तावरिल एक विवक्षित बिंदु. हा स्थिर बिंदु मानून ते राशीचक्राचे आरंभस्थान मानावे. त्यानुसार पंचांगाचे गणित असावे. सायन पक्षाचे म्हणणे हा संपात बिंदुच मुळी स्थिर नसल्याने आरंभस्थान हे चल आहे. त्याचे चलन हे वर्षाला सरासरी ५०.२ विकला असे आहे. निरयन पक्षात पुन्हा उपपक्ष आहेतच. कोणता विवक्षित बिंदु आरंभस्थान मानावे? झीटा किंवा रैवत पक्ष, ग्रहलाघव, चित्रा, मद्रास या प्रत्येक उपपक्षाचा आरम्भस्थान वेगळे आहे. हा वाद गेली शंभर वर्ष चालूच आहे. लोकमान्य टिळक हे झीटा अथवा रैवत पक्षाच्या शुद्धपंचांग प्रवर्तक मंडळाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष होते.हे पंचांग केरुनाना छत्रे व आबासाहेब पटवर्धन इ.स. १८६५ पासून चालू केले. त्यांच्या गणितानुसार रेवती नक्षत्रातील झीटा पिशियम तारा हे आरंभस्थान मानले आहे. सध्या टिळक पंचांग म्हणून ते ओळखले जाते.
चित्रा पक्षाचे म्हणणे आरंभस्थान हे चित्रा नक्षत्राच्या समोरील १८० अंश विरुद्ध असलेला बिंदु हा शके २१२ मध्ये वसंतसंपात बिंदु होता. या पक्षाचे मुख्य समर्थक बेळगावचे भास्कराचार्य ज्योतिषी, पुण्याचे गोपाळ बळवंत जोशी. सध्या सोलापूरचे दाते पंचांग हे चित्रा पक्षाचे आहे. एकच एक पंचांग असावे यासाठी बरेच प्रयत्न झाले. परंतु समन्वय होऊ शकला नाही. ते निर्णय फक्त त्या त्या अधिवेशनापुरतेच राहिले. आरंभ स्थिर मानलेला संपात बिंदु आणी चल असलेला संपात बिंदु यातील अंतर म्हणजेच अयनांश. सरकारमान्य चित्रा पक्षाचे अयनांश हे २००७ मध्ये २३अंश ५७ कला २० विकला असे आहेत.
पंचांग
भारतीय सौर पंचांग
भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर राष्ट्राला सुट्सुटीत सोपे असे दैनंदिन कॆलेंडर असावे अशी गरज निर्माण झाली कारण अशा प्रकारची पंचांगे ही सरकारी अथवा व्यवहारात उपयोगी आणणे अतिशय गैरसोयीचे होते.प्रत्येक पंचांगानुसार धार्मिक सण पण वेगवेगळे येउ लागले. टिळक पंचांगानुसार दिवाळी वेगळ्या दिवशी येते तर दाते पंचांगानुसार वेगळी येते. शिवाय प्रादेशिक पंचांगानुसार निर्माण होणारी प्रादेशिक चालीरिति जपणारी अस्मिता. या सर्वांना सामावून घेणाया एखाद्या कॆलेंडरमध्ये आपली सांस्कृतिक प्रतिमा जपली पाहिजे. राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण झाली पाहिजे. या दृष्टिकोणातून भारत सरकारने १९५२ साली डॊ. मेघनाथ सहा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.प्रा. ए.सी. बॆनर्जी वाईस चॆन्सलर अलहाबाद. डॊ के.एल.द्फ्तरी नागपूर, श्री ज.स. करंदीकर पुणे, डॊ गोरखप्रसाद. प्रा.र.वि. वैद्य उज्जैन, श्री एन.सी लाहिरी कलकत्त्ता हे दिग्गज त्या समितीत होते. त्यांनी भारतातील वेगवेगळ्या ठीकाणी चालणारा०या सुमारे ६० प्रकारच्या पंचांगांचा अभ्यास केला.तिने तीन वर्षात अभ्यास करुन एक अहवाल सादर केला. यात सुचवलेली दिनदर्शिका म्हणजेच भारतीय सौर कॆलेंडर. यात सरकारी कामकाजासाठी दिवस अथवा वार हा मध्यरात्रीपासून चालू होतो. पण धार्मिक कारणासाठी मात्र सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ करावा. वर्षगणना शालिवाहन शकाचीच चालू ठेवावी. महिने देखिल पारंपारिकच ठेवले गेले.हे भारतीय सौर कॆलेंडर आकाशवाणी,दूरदर्शन, सरकारी गॆझेट यात फक्त उल्लेख या स्वरुपात असतात. ते सुद्धा कायद्याने बंधनकारक आहे म्हणून.
१) चैत्र ३०/३१ दिवस २२मार्च/ २१ मार्च (लिप इयर असताना) २) वैशाख ३१ दिवस ३) ज्येष्ट ३१ दिवस ४) आषाढ ३१ दिवस ५) श्रावण ३१ दिवस ६) भाद्रपद ३१ दिवस ७) आश्विन ३० दिवस ८) कार्तिक ३० दिवस ९) मार्गशीर्ष ३० दिवस १०) पौष ३० दिवस ११) माघ ३० दिवस १२) फाल्गुन ३० दिवस
पंचांगात पारशी सन, हिजरी सन तसेच त्यातील महिने दिलेले असतात.पारशी वर्ष पर्शिया (इराण) येथे चालू झाले. ३० दिवसांचा महिना व १२ महिन्याचे वर्ष. सौर वर्षाशी मेळ घालण्याच्या सोयीसाठी पुढ्चे वर्ष हे ५ दिवसानंतर चालू होते. या ५ दिवसांना पारशी लोक गाथा म्हणतात. पारशी वर्षाचे महिने असे १) फरवदिन २) अर्दिबेहस्त ३) खुदार्द ४) तीर ५) अमरदाद ६) शेहेरवार ७) मेहेर ८) आबान ९) आदर १०) दय ११) बेहमन १२) अस्पंदाद. हिजरी सन हा मोगल साम्राज्य आल्यापासून चालू झाला. मूळ अरबस्तानातले. महंमद पैगंबर यांनी मक्केहून ज्या दिवशी मदिनेला पलायन केले त्याची आठवण म्हणून खलिफ उमर याने हा सन सुरु केला आहे. तो दिवस म्हणजे गुरुवार १५ जुलै ६२२. मुस्लिमांचा दिवस धार्मिक दृष्ट्या सूर्यास्ताला चालू होतो व दुसया दिवशीच्या सूर्यास्ताला संपतो. बारा चांद्रमहिन्याचे एक वर्ष असल्याने व सौरवर्षाशी मेळ घालण्याची भानगड नसल्याने. त्यांचा वर्षारंभ हा १० दिवस दर वर्षी मागे जातो. त्यामुळे ताबूत ३३ वर्षातून सर्व ऋतूतून फिरतो. इसवी सनानुसार एखाद्याचे वय ३३ असेल तर हिजरी सनानुसार त्याचे वय ३४ वर्षे असते. हिजरी सनातील महिने असे १) मोहरम २) रा सफर ३) रबिलावल ४) रबिलाखर ५) जमादिलावल ६) जमादिलाखर ७) रज्जब ८) साबान ९) रमजान १०) सव्वाल ११) जिल्काद १२) जिल्हेज
विक्रम संवत हे मालवांचा राजा विक्रमादित्य याच्या नावाने चालू झाला तर शालिवाहन शक हा सातवाहन राज्यांच्या काळात चालू झाला. सर्वसामान्यपणे जेते राजे आपल्या अथवा वंशाच्या नावाने काहीतरी अस्तित्व चालू इतिहासाच्या पानावर असावे अशी इच्छा व्यक्त क्ररित व त्याची अंमलबजावणी ही राजज्योतिषी व भाट यांच्यावर सोपवीत. आज देखिल ही फार काही वेगळे घडते आहे असे नाही. चौकाचे, रस्त्याचे,विद्यापीठाचे, पूलाचे, इमारतीचे विमानतळाचे, टर्मिनस चे नामकरण हे आपापल्या स्फूर्तीस्थानांनी व्हावीत यासाठी रक्तपात होतात.
पंचांग धार्मिक प्रथमोपचाराची पेटी.
कुठलही काम करताना देवाधर्माचा कौल घेतलेला बरा असतो. कधी तो मांत्रिक तांत्रिकाच्या माध्यमातून तर कधी पुजारी,बडवे,गुरव यांच्या माध्यमातून. गर्भादान संस्कार, बारसे, मुंज, विवाह, गुणमेलन,मुहूर्त, सण वार, व्रत वैकल्य,मकर संक्रांत,ग्रह उपासना, नवग्रह स्तोत्र,चंद्र व सूर्य ग्रहणे,ग्रहपीडा, दाने व जप. भूमीपूजन,पायाभरणी,गृहप्रवेश, वास्तुशांती , अशौच निर्णय, हवामान व पर्जन्यविचार, नांगरणी पेरणी पासून ते धान्य भरण्यापर्यंत,संत महंतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या, जत्रा, यात्रा. मासिक भविष्य, राजकीय व सामाजिक भविष्ये, धर्मशास्त्रीय शंका समाधान, ब्राह्मणातील शाखा उपशाखा, त्यांचे गोत्र वंशावळ, ९६ कुळी मराठा समाजातील वंश गोत्र देवक. ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेला ग्रहगती, रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती, गणिताची आकडेमोड वाचवणारी रेडिमेड कोष्टके. दशा, अंतर्दशा, लग्नसाधना, नवमांश, अवकहडा चक्र, राशींचे घात चक्र इ. अशा एक ना अनेक गोष्टींचा माहिती कोष म्हणजे पंचांग.गरजेप्रमाणे त्यात बदल होत गेले.कालबाह्य प्रथा परंपरा यांना धर्मशास्त्राचाच आधार देउन समयोचित पर्याय देण्याचे शहाणपण (व्यावसायिक द्रष्टेपण) देखिल काही पंचांगांनी केलं.उदाहरणार्थ गणपतीची मूर्ती ही धातूची असावी किंवा शाडूची असावी. गणेश विसर्जन प्रदूषित नदीत न करता बाद्ली च्या पाण्यात करुन ते पाणी झाडांना घालावे. निर्माल्य हे नदीत न टाकता त्याचे झाडांसाठीच कांपोस्ट खत तयार होऊ शकते.ते झाडालाच घालावे. तरी देखील पुलावरून एखादी होंडा. मर्सीडीस गाडी जाताना थांबते, एखादा पॊश सफारीतील माणूस उतरतो निर्माल्य असलेली प्लास्टीकची पिशवी नदीत भिरकावतो आणि पुढील मार्गक्रमणा करतो.
पंचांगातील रेडिमेड मूहुर्त
पंचांगात रेडिमेड मुहूर्ताचे कोष्टक असते. पण हे रेडिमेड मूहुर्त सुद्धा लाभतात कि नाही? हे बघावं लागत. जसे रेडिमेड कपडे सर्वांनाच फिट होतील असे नसतात. कधीकधी ते अल्टर करावे लागतात. तसेच मुहूर्ताचे देखिल आहे. एखादी वेळ ही कुणासाठी तरी आनंदाची असते तर कुणासाठी दुःखाची असते. कुणासाठी कसोटीची असते तर कुणासाठी निवांतपणाची असते. कुणासाठी जोडण्याची असते तर कुणासाठी तोडण्याची असते. कुणाची जन्माची असते तर कुणाची मृत्यूची असते.कुणाची कशाचीही असो ती ग्रहांच्या सोयीची असते म्हणून तिला मुहूर्त म्हणायचे. इ.स. २००० मध्ये मे जून या लग्नसराईच्या काळात मुहूर्त नाहीत अशी बातमी पेपरमध्ये आली. कारण त्या काळात गुरु शुक्राचा अस्त होणार होता.
विवाहासारख्या महत्वाच्या संस्कारच्या वेळी गुरु शुक्रा सारख्या नैतिक बळ देणा-या शुभ ग्रहाची उपस्थिती नाही म्हणजे आली का पंचाईत? मंगळ शनी सारख्या दुष्ट ग्रहांचे फावलेच ना! कुणाला वैधव्य दे, कुणाचे सासू सासरे मार, कुणाला अपघात कर कुणाला सासुरवास कर, असा धुडगुस घालतील ना हे लोक(ग्रह). मग अडलय का काही मुहुर्त नसताना लग्न करायला. मुहूर्त म्हणजे खर तर कार्याच्या सोयीची पूर्वनियोजित वेळ. पण तिला शुभशुभत्वाची कल्पना एवढी घट्ट चिकटली आहे त्याचा वेगळा विचार करणे म्हणजे शास्त्राची(?) हानी. पंचांगात दिलेले रेडिमेड मूहुर्त हे खरे फलज्योतिषशास्त्रीय देखील ढोबळ मानाने काढलेले असतात. पण गुरुजींनी सांगितलेला मुहूर्त पंचांगात नाही म्हणून लग्नाची तारीख बदलण्याचा प्रसंग मी पाहिला आहे. तारीख ठरली कार्यालय ठरले. पण मुलाच्या ज्योतिष शिक्षित भावजयीच्या लक्षात आले कि ठरवलेला मुहूर्त पंचांगात
दिलेला नाही. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना हे ही सांगितले कि गुरुजींनी वधू वरांच्या पत्रिका पाहून मुहूर्त काढला आहे. पंचांगात नसेना का? पण नाही. मग काय तारीख बदला.आता आली का पंचाईत. दुस-या तारखेला हॊल बुक करा. नशीबा(?) ने म्हणजे योगायोगाने ती तारीख त्याच हॊल साठी उपलब्ध झाली म्हणून ठीक नाही तर मुलीकडच्यांचे पैसे पाण्यात.
आता पंचांगात मूहुर्त नाहीत म्हणून लग्ने व्हायची थोडीच रहाणार आहेत? कोंबड झाकलं म्हणून तांबड थोडच फुटायच राहतय ? ज्यांना कसेही करुन लग्न करायचे आहे ते कशाला मुहूर्तासाठी अडून बसतील? "मिया बिबी राजी तो क्या करेगा काझी? " त्यांची गोष्ट वेगळी, पण ज्यांना मुहूर्त न पाहता लग्न केल्याची रुखरुख वाटणार त्यांच्या सोयीसाठी 'शास्त्राधार' देउन मुहूर्त दिले जातात.एखादे धर्मसंकट कोसळले की असे शास्त्राधार शोधले जातात व ते मिळतातही. दाते पंचांगात मुहूर्त नव्हते त्यावेळी रुईकर पंचांग पुढे सरसावले आणि मूहुर्त दिले.
राजेराजवाड्यांच्या काळात दरबारात राजज्योतिषी असे. तो वर्षारंभी पंचांगाची पूजा करुन राजास संवत्सरफल कथन करुन सांगे. राज्यावर काही संकट, पूर, अतिवृष्टी. दुष्काळ, आदि नैसर्गिक संकटांची काय चाहूल लागते आहे? याचा सुगावा पंचांगाद्वारे घेउन ते राजास सांगत असे. राजा त्याला योग्य बिदागी देत असे. त्यातून त्याचा उदरनिर्वाह चालत असे.ज्योतिषाचा सत्कार करुन त्याजकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल असे संवत्सरफलातच म्हटले आहे. आता हे संवत्सरफल कोण लिहित असे हे सूज्ञास सांगणे नलगे! आज सुद्धा खेडेगावात भिक्षुकी करणारा ब्राह्मण समाज वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने पंचांगाद्वारे लग्न, मुहुर्त, सत्यनारायण पूजा, अभिषेक, नावरास काढून देणे, धार्मिक कृत्यांचा व्यवहारपयोगी अन्वयार्थ काढून देणे इत्यादि कामे करत असतो. लोक त्याला त्यामोबदल्यात धान्य, भाजीपाला, दूध, पैसे इत्यादि मोबदला देतात. एक प्रकारची बलुतेदारीच म्हणा ना.त्यावर त्याची गुजराण चालते.त्यामुळे पंचांग हे ज्योतिषी कम भिक्षुकाचे पोटापाण्याचे साधन बनले. कर्मसंकट आले कि कायदेशीर कचाट्यातून पळवाटा शोधून मार्ग काढणारा वकील आणी धर्मसंकट आले कि त्यावर धर्मशास्त्रीय तोडगा काढून सुटका करणारे धर्ममार्तंड एकाच प्रकारचे.संकटाचे उपद्रवमूल्य किती? यावर मोबदला ठरतॊ आणि मोबदला किती मिळणार यावर पळवाटा व तोडगे यातील अन्वयार्थ व फेरफार ठरतात. शिवाजी महाराजांची देखील यातून सुटका झाली नाही. राज्याभिषेकाच्या वेळी स्थानिक धर्मपंडिता ऐवजी त्यांनी सरळ काशीहून गागाभट्ट आयात केले आणि स्थानिक धर्मपंडितांची तोंडेच बंद केली.
घरात प्रथमोपचाराची जशी औषधे असतात तसा धार्मिक अंगाचा प्रथमोपचार म्हणून पंचांग बहुतेकवेळा घरात टांगलेले दिसते.
पंचांगाचे सुलभीकरण
पंचांगाचे स्वरुप व प्रकृती त्यामुळे पंचांग ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली. कालानुसार दैनंदिन गरजांची व्याप्ती बदलली. मक्तेदारी वाढल्यामुळे पंचांग ज्या जनसामान्यांसाठी निर्माण झालं तिथंच ते रुजण अवघड झाले. व्यावसायिकदृष्ट्या या गोष्टीचा खपावर परिणाम होउ लागला.म्हणूनच पंचांगाचे सुलभीकरण होणे ग्राहक व उत्पादक दोघांच्या दृष्टीने गरजेचे झाले. घटिका पळे दैनंदिन जीवनाचा भाग नसल्याने कलाक मिनिटे पंचांगात येउ लागली. संस्कृतचं प्राकृतीकरण झाले, ज्योतिर्गणितेच्या सुलभतेसाठी सुर्योदयीन ग्रहाच्या स्थितीऐवजी पहाटे साडेपाचचे स्पष्ट ग्रह देण्यात आले. धर्मशास्त्रार्थ सुलभपणे सांगितला गेला. त्यामुळे विशिष्ट गटाची मक्तेदारी काही प्रमाणात का होईना पण मोडली. पंचांगाचा अर्थ लोकांना समजायला थोड सोप झालं.सध्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे लोकांचे दैनंदिन जीवन गतिमान झाले आहे.धार्मिक कृत्याचे संक्षिप्तिकरण झाले. महत्वाच्या वाटणा-या धार्मिक गोष्टींसाठी पंचांग धुंडाळ्ण्यापेक्षा तीच माहीती दिनदर्शिकेत उपलब्ध होणे गरजेचे वाटू लागले.याचं नेमक निरीक्षण केले ते जयंतराव साळगावकरांनी व त्यातूनच त्यांनी सुमंगल पब्लिकेशन काढून पंचांग,मेनू, दैनंदिन कामातील विविध गरजेच्या माहितीचे टिपण.पाककृती, राशीभविष्य,मान्यवरांचे काही लेख अशा आविष्कारांची दिनदर्शिका तयार केली अन ती अल्पावधित लोकप्रिय झाली. आज अशा प्रकारच्या अनेक दिनदर्शीका बाजारात आहेत. आता पंचांग आणि
भविष्य हे मोबाईलवर सशुल्क सुविधा म्हणून देखील उपलब्ध आहे. संकष्टि चतुर्थीचा उपवास लक्षात न राहिल्यामुळे मोडू नये म्हणून रिमाईंडर पण लावता येतात. म्हणजे कालनिर्णय आता मोबाईलवर पण आले आहे. पोपटवाला ज्योतिषाकडे पण हातात एक जुनेपाने पंचांग असते. पोपटाने भविष्याची चिठ्ठी उचलणे आणि पंचाग याचा अर्थाअर्थी काहीच संबंध नसतो. पण पंचांग हे ज्योतिषाचा ट्रेड मार्क झाला आहे. आता तर ज्याला पंचांग वा ज्योतिष समजत नाही तो सुद्धा बाजारात मिळणा-या रेडिमेड सॊफ्टवेअर्स च्या आधारे कुंड्ली तयार करतो. "येथे कॊम्प्युटराईज्ड कुंडल्या तयार करुन मिळतील" असे बोर्ड आता तालुका पातळीवरसुद्धा दिसतात. जन्मवेळ, जन्मस्थळ व जन्मतारीख या गोष्टी संगणकाला पुरवल्या तर तुम्हाला तुमची कुंडली तुमच्या भाषेत छापून तयार मिळेल. येथे जन्माधिष्ठित जातींची गरजच लागत नाही. असे अनेक संगणकजोशी आता दिसू लागले आहेत.
प्राचीन रोमन कॆलेंडर ते आताचे ग्रेगरियन कॆलेंडर
प्रत्येक संस्कृतीची स्वतःची अशी कालगणना होती. ज्यू लोकांची यहुदि कालगणना, चिनी कालगणना, बॆबीलोनियन कालगणना, ईजिप्शियन कालगणना, ग्रीक कालगणना, रोमन कालगणना अशा अनेक प्राचीन कालगणनांचे उल्लेख इतिहासात आढळतात. इंग्रजी कॆलेंडर वा इसवी सनाची सुरवात जिझस ख्राईस्टच्या जन्मापासून झाली असे म्हणतात पण ते चुकीचे आहे. ख्रिस्ताची जन्म व मृत्यू या बाबत बरीच मतमतांतरे आहेत. प्राचीन रोमन वर्षगणनेत ज्युलियस सीझरने सुधारणा करुन सौर वर्षमान प्रचारात आणले. त्यासाठी काही बदल देखिल करावे लागले होते. इ.स. पूर्व ४५ वे वर्षी वर्षाचे दिवस ४४५ दिवसांचे धरावे लागले होते. तेव्हा सुद्धा २५ डिसेंबरला वर्षारंभ पकडायचा कि १ जानेवारी असा प्रश्न पडलाच होता.ज्युलियस वर्षमान हे ३६५ दिवस ६ तासांचे धरले होते. म्हणजे खया सौरवर्षापेक्षा ११ मिनिटे १४ सेकंद अधिक धरले गेले. त्यामुळे इ.स. १५८२ पर्यंत १० दिवसांचे अंतर पडले. ते अंतर भरुन काढण्यासाठी १३ वा पोप ग्रेगरी याने नियम करुन ४ आक्टोबर १५८२ नंतर येणाया दिवसास १५ आक्टोंबर १५८२ असे संबोधले गेले. दर चौथ्या लीप ईयर चा नियम तसाच ठेवला. सध्याच्या कालगणनेनुसार सौरवर्षापेक्षा २६ सेकंद अधिक असते. त्यामुळे सध्याच्या कालगणनेनुसार ३००० वर्षांनी एक दिवस फरक पडण्यास कारणीभूत होईल. ज्युलियस सीझरने १-३-५-७ हे महिने ३१ दिवसांचे व ४-६-८-१०-१२ हे महिने ३० दिवसांचे ठरविले होते. पुढे ऒगस्टस सीझर याला ही वाटणी मान्य झाली नाही.ज्युलियस च्या जुलै महिन्याला ३१ दिवस आणि आपल्या नावाच्या ऒगस्ट महिन्याला मात्र ३० दिवस ही गोष्ट ऒगस्टसला आवडली नाही. त्याने ऒगस्ट महिन्याला पण ३१ दिवस बहाल केले. त्या ऐवजी फेब्रुवारी महिन्याच्या २९ दिवसातील एक दिवस काढून घेतला.हेच ते सध्याचे इंग्रजी कॆलेन्डर प्रचारात आहे. जिथे जिथे इंग्रजांच्या वसाहती होत्या तिथे ते रुजलं गेलं आणि अंगवळणी पडले. राष्ट्र संघाच्या योजनेत समिति १९२३ साली नेमली व त्यात ग्रेगरियन गणनेत वाटणाया अडचणीचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कॆलेंडर तयार करण्यात आले. त्यात १३ महिन्यांचे वर्ष व २८ दिवसांचा मास सुचवला. पण तो वार तारीख यांचा मेळ राखण्यास व्यावहारिक दृष्ट्या असमर्थ ठरले. त्यामुळे सध्याचे ग्रेगरियन कॆलेंडर सुटसुटीत व अंगवळणी पडल्याने इ.स. ३००० पर्यंत तरी कालनिर्देशनाची चिंता नाही.
आंतरराष्ट्रिय कालगणना
सन १९२५ सालापासून शून्य रेखांशावरील ग्रिनीच या लंडन जवळिल शहराची स्थानिक वेळ ही आंतरराष्ट्रिय प्रमाणित वेळ म्हणून मान्यता पावली. त्या हिशोबाने भारताची प्रमाण वेळ ही ८२.५ पूर्व रेखांशावरील स्थानिक वेळ असल्याने ग्रिनिच पेक्षा साडेपाच तासाने पुढे आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ग्रिनिच ला मध्यान्हीचे बारा वाजले असतील त्या वेळी भारतात दुपारचे साडेपाच वाजले असतील. हे झालं वेळेबद्दल. पण वाराचे काय? त्यासाठी १८० अंश वृत्ताच्या जवळ समांतर अशी पॆसिफिक समुद्रातून जाणारी काल्पनिक रेषा निश्चित केली.ती ओलांडताना पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असाल तर पुढचा वार धरावा. पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असेल तर मागचा वार धरावा. त्याला आंतरराष्ट्रिय वार रेषा म्हणून मान्यता आहे. त्यावरुन विमान किवा जहाजे जाताना आपापली घड्याळे त्या ठिकाणी सुनिश्चित करावी लागतात. आता या गोष्टी उपग्रहामार्फतीने स्थान निश्चिती होत असल्याने स्वयंचलित होतात. २०२० साली महासत्तेचे स्वप्न बघणार्या भारताने सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय कालगणनेचा विचार करण्या ऐवजी भारतातील जनगणनेचा विचार केला तरी खूप झाले.
1 comment:
vaa
Post a Comment