Saturday, May 31, 2008

फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार आहे काय?"

"फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार आहे काय?"
या विषयावर "वाचकांचे व्यासपीठ" या सदरात अठरा पत्रे प्रसिद्ध झाली आहेत.(दै.सकाळ शनिवार३१ मे २००८).त्यांत श्री. प्रकाश घाटपांडे यांचे पत्र केंद्रस्थानी ठळक टंकात छापले आहे ते येणे प्रमाणे:

....
वैज्ञानिक चिकित्सेकडे ज्योतिषांची नेहमीच पाठ
प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषाची संख्याशास्त्रीय चाचणी घेण्याचे आवाहन समस्त ज्योतिर्विदांना केले आहे.या निमित्ताने या विषयावरील चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.समस्त ज्योतिर्विदांनी यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रसिद्ध अर्थतञ्ज्ञ (कै) वि.म.दांडेकरांनी यापूर्वी फलज्योतिषाच्या चाचणीचे प्रयत्‍न केले होते.’सप्ताहिक सकाळ दि. ८ जुलै१९८९ च्या भविष्य विशेषांकात ते म्हणतात: "शंभर मतिमंद मुलांच्या कुंडल्या व शंभर सर्वसामान्य मुलांच्या कुंडल्या घेतल्या, तर त्यात फलज्योतिषाच्या काही योगांचा तरी फ़रक दिसावयास हवा.तसेच शंभर घटस्फोटितांच्या पत्रिकांमधे काही योग प्रामुख्याने दिसावयास हवेत. पण माझ्या जवळ ज्या कुंडल्या गोळा झाल्या आहेत त्यांवरून तरी हा फ़रक दिसून येत नाही."
भारत इतिहास संशोधन मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमातील भाषणात त्यानी म्हटले होते की जर शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम असतील तर तो नियम कसला?" आव्हान या प्रकाराशिवाय फलज्योतिषाची सत्यासत्यता पडताळणीसाठी काही प्रयत्न पूर्वीही झाले. सन १९३५ मध्ये रा.ज. गोखले या पुण्यातील भूगोल शिक्षकाने "फलज्योतिष चिकित्सा" नावाचे एक पुस्तक लिहून त्याची सर्व चिकित्सा केली होती.फलज्योतिषाची सत्यासत्यता तपासण्यासाठी त्यांनी एका निर्णायक समितीची स्थापना केली.ज्योतिर्विदांना एक विनंती केली की आपले वर्तविलेली भविष्यें त्यांनी निर्णायक समितीकडे पाठवावी.त्यासाठी यथोचित पारितोषिकही देण्याची तयारी ठेवली होती.पण त्यासाठी त्यांनी फलांसंदर्भात अटी घातल्या.याचा फ़ारसा परिणाम ज्योतिषांवर झाला नाही व त्यांनी प्रतिसादही दिला नाही.
..........................................................प्रकाश घाटपांडे, पुणे

Tuesday, May 20, 2008

पुण्यातील १९३५ साली फलज्योतिष चाचणीचे आवाहन

रा ज गोखले या भुगोलाचे शिक्षक असलेल्या गृहस्थांनी १९३५ साली लिहिलेल्या "फल्ज्योतिष चिकित्सा" या पुस्तकातील उतारा पहा. त्याकाळी देखील चाचणीचे प्रयत्न झाले होते.

FaljyotishaChikitsa 020
FaljyotishaChikitsa 021a
FaljyotishaChikitsa 021b
FaljyotishaChikitsa 022 a
FaljyotishaChikitsa 022 b

प्रकाश घाटपांडे

Monday, May 19, 2008

फलज्योतिष चाचणी च्या निमित्ताने

सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांनी फलज्योतिषाच्या संख्याशास्त्रीय चाचणीकरता समस्त ज्योतिषांना केलेल्या जाहीर आवाहनानंतर ज्योतिष वर्तुळात एकच खळबळ माजली. जणुकाहि हे एक ज्योतिषांवर मोठे संकट कोसळले असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्याचा एक भाग म्हणुन ज्योतिष परिषद पुणे चे अध्यक्ष श्री व.दा. भट यांनी एक १८ मे २००८ रोजी पुण्यात एक परिषद आयोजित केली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे श्री श्री भट होते. परिषदेत समस्त ज्योतिर्विदांना चाचणीवर आपले विचार व्यक्त करण्याचे आवाहन केले.

Sunday, May 11, 2008

Press Conference - Astrological Test

पत्रकार परिषदेचा विषय
फलज्योतिषामधील शास्त्रीय तथ्य़ांशाबाबत परदेशात अनेकविध चाचण्या झाल्या आहेत.या संदर्भातील भारतातील पहिली वैज्ञानिक चाचणी तयार करण्यात आली आहे.याची माहिती डॊ जयंत नारळीकर देतील. या प्रक्रियेमध्ये आयुका, पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांचा सहभाग आहे. त्यांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेत उपस्थित असतील.

स्थळ:- पत्रकार भवन; सोमवार दि. १२ मे २००८, सकाळी ११ वाजता.
प्रकाश घाटपांडे - समन्वयक
http://faljyotishachikitsa.blogspot.com
भ्रमणध्वनी- ९९२३१७०६२५

फलज्योतिष -चाचणी चे आवाहन
फलज्योतिषाला विज्ञानाचा पाया आहे का? हा सर्व जगभर बहुचर्चित विषय आहे. परदेशात याबाबत अनेक संशोधनेही झाली आहेत. पण भारतात आता अधिकृतपणे अशी पहिली संशोधन चाचणी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॊ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.त्यामध्ये आयुका ही खगोलशास्त्राची भारतीय पातळीवरील संस्था, पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्रीय विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिति यांचा सहभाग रहाणार आहे.चाचणीचे स्वरुप सरळ व सोपे आहे.मतिमंद शाळेत शिक्षण घेणा-या १०० जन्मवेळा त्यांच्या पालकांच्या सहीने जमा करण्यात आल्या आहेत. शाळेत सातत्याने ७० टक्के व यापेक्षा अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांच्या जन्मवेळा याच प्रमाणे जमा केल्या आहेत. मतिमंद असणे वा बुद्धिमान असणे हे व्यक्तिच्या बाबत अत्यंत वेगळी व स्पष्टपणे भिन्न अवस्था आहे. त्याचे प्रतिबिंब आयुष्यातील महत्वाच्या घटनांवर भाष्य करणा-या पत्रिकेत उमटावयास हवे. असे चाचणी संयोजकांचे मत आहे. नामवंत ज्योतिषी, फलज्योतिष संस्था वा हा व्यवसाय करणारी कोणीही व्यक्ती यांना चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन जाहीरपणे करण्यात आले आहे. ज्यांच्या कडून अनुकूल प्रतिसाद लाभेल त्यांना सर्वसाधारणपणे चाळीस जन्मपत्रिका व जन्मवेळेचा तपशील या दोन्ही बाबी पाठवल्या जातील. या तपशीला मुळे आवश्यक वाटल्यास चाचणी देणारी संबंधीत व्यक्ती स्वत:देखील कुंडली बनवू शकेल.त्या कुंडलीद्वारे संबंधीत कुंडली ही मतिमंद मुलाची आहे कि बुद्धिमान मुलाची आहे एवढेच सांगावे अशी अपेक्षा आहे.चाचणी साठी दिलेल्या पत्रिकांतील काही पत्रिका या मतिमंद मुलांच्या तर काही पत्रिका या हुषार मुलांच्या असतील. ज्योतिषांनी कोणती पत्रिका कोणाची हे ९०% अचूक ओळखल्यास फलज्योतिष या विषयाकडे शास्त्र म्हणुन पहाण्यास मर्यादित अनुकुलता प्राप्त होईल.७०% पेक्षा कमी प्रमाणात उत्तरे बरोबर आली तर फलज्योतिष हे शास्त्र नाही हे आपोआपच सिद्ध होईल. ७०% ते ९०% प्रमाणात ज्योतिषाची भाकिते अचूक ठरल्यास आणखी मोठ्या सॆंपल सह चाचणी घेण्यात येईल. कुंडलीच्या आधारे आपले निष्कर्ष पाठवण्यास संबंधितांना पुर्ण एक महिना देण्यात येईल. ही चाचणी पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग हा 'डबल ब्लाईंड टेस्ट' या पद्धतीने घेईल. ज्योतिषांनी डॊ. सुधाकर कुंटे ,संख्याशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ पुणे ४११००७ या पत्त्यावरुन कुंडल्या मागवायच्या आहेत. ही चाचणी पुर्णत: विनामुल्य आहे. मात्र कुंडल्यांचे झेरॊक्स व पोस्टेज यासाठी सहभागी होउ इच्छिणा-यांनी ११'' * ९'' आकाराचे, रुपये ३५ ची तिकिटे लावलेला लिफाफा पाठवणे गरजेचे आहे. याच स्वरुपाच्या आणखी काही चाचण्या पुढील काळात घेण्याचा मनोदय आहे. त्यामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक पाया आहे का? यावर अधिक प्रकाश पडू शकेल. ही चाचणी ही प्राथमिक आहे अंतिम नाही.