Saturday, January 03, 2009

परिसंवाद -लग्नासाठी पत्रिकेचा आधार घ्यावा काय?

पुणे- "सामान्य माणसांना लग्न जुळविण्यासाठी पत्रिकेचा आधार घ्यावासा वाटला तर त्यात काही गैर नाही" असे प्रतिपादन फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे प्रकाश घाटपांडे यांनी केले. विवाह ही अनिश्चित भविष्याशी संबंधित घटना असल्याने त्यात पडताना मानसिक आधाराची गरज ही प्रत्येकाला लागतेच, असे सांगुन ते म्हणाले,"परंतु आपण जेव्हा पत्रिकेचा आधार घेतो तेव्हा पत्रिका म्हणजे काय, तिच्यातील ढोबळ गणिते कशी मांडतात, मंगळ असतो म्हणजे काय, एकनाडीचा दोष मानावा कि मानू नये यासारख्या गोष्टी आपण स्वत: समजून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर त्यात तथ्य आहे असे वाटल्यास त्याचा जरुर आधार घ्यावा."
फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे आयोजित " लग्नासाठी पत्रिकेचा आधार घ्यावा काय?" या परिसंवादात स्वत:चे विचार मांडताना सुप्रसिद्ध वैद्यकिय विवाह समुपदेशक डॊ शांता साठे म्हणाल्या,"
माझे स्वत:चे लग्न पत्रिका न पाहता झाले आहे व आजपर्यंत म्हणजे वयाची पासष्टी उलटूनही आमचे सहजीवन उत्त्तम चालू आहे. आमच्या पत्रिका जुळतात कि नाही हे आजवर आम्ही पाहिलेले नाही. तरीही याबाबतीत मी असे म्हणेन कि ज्यांचा जसा विश्वास असेल त्याप्रमाणे त्यांनी करावे. परंतु विवाहापुर्वी मुलामुलींची वैद्यकीय तपासणी मात्र जरुर करावी. एड्स, सांसर्गिक रोग अनुवंशिक आजार यासंबंधी तपासण्या अवश्य करुन घ्याव्यात. वैद्यकीय माहिती एकमेकांपासून मुळीच दडवुन ठेवू नये.तसेच अशा प्रकारची तपासणी समोरील पक्षाने मागणी केल्यास तो स्वत:चा अपमानही मानू नये. त्यामुळे विवाहोत्तर आयुष्यातील अनेक अडचणी टाळता येतात." एकनाड व रक्तगट यांचा काहीही संबंध नाही व आजकाल आधुनिक वैद्यकाने विवाहसंबंधातील रक्तगट समस्येवरही औषध शोधुन काढलेली आहेत असेही त्यांनी सांगितले.
प्रख्यात विवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी म्हणाल्या," लग्न ठरवताना बारीक सारिक व्यावहारिक गोष्टीही खूप महत्वाच्या मानल्या गेल्या पाहिजेत. उदा. एकत्र कुटुंबात रहायचे कि नाही. स्वयंपाक कसा करायचा, स्वच्छतेच्या पद्धती सवयी कशा आहेत इत्यादि. या सर्व गोष्टींवर चर्चा करुन नंतर विवाह निश्चित केल्यास विवाहोत्तर ताण-तणावांना मोठ्या प्रमाणावर दूर ठेवता येते. त्यासाठी वधु- वरांनी दोघांनीही स्व-अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे." जात-पात, वय, उंची रंग पगार या सामान्यत: लक्षात घेतल्या जाणा-या गोष्टींबरोबरच किंबहुना त्याहून महत्वाच्या अशा दैनंदिन जीवनातील पद्धती समजून घेतल्या तर विवाह संबंध सुकर होतात हे त्यांनी समुपदेशनाच्या स्वत:च्या अनुभवांच्या आधारे प्रतिपादन केले. लग्न म्हणजे तडजोड असतेच हे प्रत्येकाला मान्य असावे व ह्या तडजोडी कोणत्या करायच्या व कोणत्या मुळीच नाही याची स्पष्ट कल्पना प्रत्येकाने मांडलेली असेल तर सहजीवन नक्कीच परस्पर पुरक घडते हा कळीचा मुद्दा त्यांनी विषद करुन सांगितला.
पुणे मिरर या इंग्रजी दैनिकाचे पत्रकार व इंटरनेटवरील ब्लॊगर श्री देविदास देशपांडे यांनी वर्तमानपत्रांना सिनेतारकांच्या विवाहा विषयक चटपटीत बातम्या लागतात पण प्रबोधनाच्या बाजूने त्यांचा फारसा कल नसतो. भविष्यविषयक कॊलम कधी कधी पत्रकारालाच चालवावा लागतो.असे सांगुन काही वेळा अंधश्रद्धा पसरवणा-या घटनांना बातम्यात स्थान देण्याचे टाळत असल्याचे विशद केले.
फलज्योतिष चिकित्सा मंडळ ही लग्न करु इच्छिणा-यांच्या ज्योतिष विषयक अडचणी समजून घेणारे, त्यावर व्यावहारिक तोडगे सांगणारी, संभ्रमावस्थेतील लोकांना तंत्रशुद्ध मार्ग दर्शन करणारी संस्था असल्याचे श्री प्रकाश घाटपांडे म्हणाले. विवाह समस्येने गतानुगतिक बनलेल्या समाजाच्या घटकांचे कोणत्याही पद्धतीने शोषण न होउ देता मार्गदर्शन करणे हेच या संस्थेचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

2 comments:

vikaspisal said...

kaka, tumacha email ld kaay aahe??

-Gatane

savali said...

नमस्कार ,
मला मुंबई स्थायीक विवाह समुपदेशक कॉन्टेक्ट डिटेल्स मिलू शकतील का ?
जर तुमच्या काहीही माहिती असल्यस मला इ-मेल करावे
इ-मेल
savalimhatre@yahoo.co.in
आपली आभरी