Friday, March 20, 2009

विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार

विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार
अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत`
( ढोलकी: खुद्द प्राचार्य गळतगे )



विंग-कमांडर शशिकांत ओक यांनी लिहिलेले "बोध अंधश्रद्धेचा" या नावाचे पुस्तक आमच्या एका सनातनी मित्राने आमच्या हाती दिले व 'आता बोला!' अशा आविर्भावाने तो आमच्याकडे बघू लागला. पुस्तक वरवर चाळून पहाताच मित्राचा हेतू आमच्या ध्यानात आला. पुस्तक वाचतांना आम्हाला असे वाटले की 'बोध अंधश्रद्धेचा' या नावाऐवजी लाभ अंधश्रद्धेचा, किंवा लोभ अंधश्रद्धेचा हे नाव या पुस्तकाला जास्त शोभून दिसले असते!
नि:स्वार्थपणे जनहितार्थ झटणारे ते दैवीगुणाचे, आपल्याबरोबर इतरांचेही हित जपणारे ते मनुष्यगुणाचे, आपल्या स्वार्थाकरिता दुस याचे नुकसान करणारे ते राक्षसगुणाचे, पण निष्कारण दुस यांचे नुकसान करणा यांना काय म्हणावे हे भर्तृहरीला समजेना! 'ते के न जानीमहे |' एवढे म्हणून तो स्वस्थ बसला. त्याच्या वर्गवारीप्रमाणे समाजात भोळसट आणि वेडगळ समजुती फैलावण्यातच ज्यांचा स्वार्थ गुंतलेला असतो त्यांना आपण राक्षस-श्रेणीत घालू शकू पण केवळ सनसनाटीच्या आनंदासाठी घातक किंवा वेडगळ समजुती जे फैलावतात त्यांना कोणत्या श्रेणीत घालायचे ? (देवालाही वेठीला धरणारे हे लोक!) त्यात त्यांचा काही स्वार्थ असतो म्हणावे तर तसेही नसते. तर, अशा या दोन श्रेणीच्या लोकांना अं. नि. स. हा त्यांच्या मार्गातला एक मोठा अडसर आहे असे वाटते म्हणून ते तिच्यावर सतत आग ओकत असतात. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाचा हेतू तोच आहे एवढे सांगितले म्हणजे पुस्तकाच्या स्वरूपाची कल्पना वाचकांना येईल.