Wednesday, April 01, 2009

नाडीपरिक्षा- काही चिकित्सक प्रश्न

नाडीग्रंथ हा विषय इतका चघळून झाला आहे तरीही विषय चिकित्सेसाठी खुला ठेवला पाहिजे असे आम्हाला वाटते. सन ९५-९६ ते २००२ या काळात आम्ही या विषयात वाहुन गेलो होतो. पुण्यात हा विषय देखील प्रसारमाध्यमांनी उचलून धरला होता. त्याकाळात आम्हाला नाडीवाल्या लोकांना विचारायचे काही प्रश्न पडले होते आज ही आहेत. बघा तुम्हाला कसे वाटतात.


१) या नाडी केन्द्रात नाडी बंडलांची संख्या किती आहे? एका बंडलात किती नाडी पट्टया असतात?

२) आपण महाराष्ट्रात जी नाडी बंडले आणलीत ती महाराष्ट्राचे संबंधाने सॉर्टिंग करुन आणलीत का? हे सॉर्टिंग कसे केले?

३) आजतागायत अगस्त्य नाडी केन्द्रात जे लोक नाडी पटटी पाहून गेले व आज हयात नाहीत ( उदा. १९ व्या शतकाच्या आधी जन्मलेले) अशा लोकांच्या नाडी पट्टया आपण जपून ठेवता की टाकून देता?

४) आपल्या पत्रकात जी नोट दिली आहे त्या नुसार असे दिसते की जनरल कांडम व्यतिरिक्त ११ कांडम विशिष्ट प्रकारचे भविष्य सांगण्या करिता आहेत. तसेच आणखी चार ही स्पेशल कांडे आहेत. या प्रत्येक कांडाकरिता स्वतंत्र पट्टी आहे का?

५) पट्टीत जन्मकुंडली असते की जन्मकुंडलीचा तपशील असतो?

६) भविष्य जन्मकुंडलीचे आधारे लिहिलेले असते की अंतर्ज्ञानाने?

७) अंतर्ज्ञानाने असेल तर कुंडली पट्टीत कशासाठी असते?

८) अंगठयाचा ठसा घेतल्यावर विवक्षित पट्टी ही त्याच व्यक्तिची आहे हे निश्चित करण्यासाठी आपण अनेक प्रश्न विचारता.

९) आंगठयाचा ठसा तर एकाचा दुसऱ्या सारखा कधीच नसतो मग एवढे प्रश्न विचारण्याची आवश्यकता काय?

१०) आजमितीस भारताची लोकसंख्या १०० कोटींचे वर आहे. प्रत्येक व्यक्तीची पट्टी महर्षींनी लिहिली आहे काय?

११) वर्षभरात सुमारे एक हजार माणसांच्या पट्टया आपल्याकडे पाहून झाल्या असतील का?

१२) तसे असेल तर एक व्यक्ती बरोबर सोळा पट्टया या हिशोबान या वर्षात १६ हजार पट्टया आपल्या संग्रही आहेत का?

१३) माणसांची संख्या पहाता पट्टयांची संख्या आम्हाला अपूरी वाटते मग या पट्टया एवढया माणसांना कशा पुरतात?

१४) ज्या व्यक्तींच्या पट्टया वाचून झाल्या आहेत त्या पट्टयांचा नंतर तुम्हाला काय उपयोग होतो?

१५) आपल्याला जर त्याचा उपयोग होत नसेल तर त्या व्यक्तिने ती पट्टी मागितली तर त्याला आपण द्याल का?

१६) हयात नसलेल्या माणसांच्या पट्टया तुमच्या संग्रहात असणारच त्यातील काही पट्टया आम्हाला अभ्यासासाठी द्याल का?

१७) पट्टयात व्यक्तींची नांवे असतात असे आपण म्हणता, आम्हाला ती वाचता येत नाहीत. ती नांवे तिथे आहेत याची खात्री आम्हाला करता यावी यासाठी तुम्ही देवनागरी असलेली ही अक्षरे कूट लिपीत कशी असतात हे तुम्ही लिहून द्याल का?

१८) मनुष्य ज्या दिवशी तुमच्या कडे येतो त्या दिवसाच्या आधीच्या घटना पट्टीत लिहिलेल्या असतात की नसतात?
-------------------------------------------------------------------------------------------------
हाच लेख आपल्याला उपक्रमावर पहाता येईल

No comments: