सिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षानुसार ते आरोग्यास अपायकारक असल्याचे सिद्ध झालेने ते पाकिटावर वैधानिक इशारा म्हणून छापणे सक्तीचेही केले. तो इशारा वाचणे हे सिगारेट पिणाऱ्याना सक्तीचे नसले तरी त्याची त्यावर नजर जावी एवढया मोठया अक्षरात तो छापला गेला. मोठा आणि ठळक वाटला तरी त्यावर वाचकाची नजर स्थिरावणार नाही असा फॉन्ट जाहिरात कंपन्या वापरतात. बहुसंख्य लोक तो एकदा तरी नजरेखालून घालतात. तो वाचून किती लोकांनी सिगारेट पिण्याचे सोडून दिले आहे? सिगारेट पिणाऱ्यांमध्ये विद्वान , बुद्धीजीवी लोक नाहीत काय? या इशाऱ्याशी सहमत असणारे कित्येक डॉक्टर्स सुद्धा या सिगारेट पिणाऱ्यांमध्ये आहेत.