पाश्चात्य जगतात गेल्या ३०-४० वर्षांत फलज्योतिषावर जे प्रचंड संशोधन झाले, त्याची फारच थोडी कल्पना मराठी वाचकांना असेल. ती कल्पना त्यांना यावी आणि या वादग्रस्त विषयाकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोन कसा आहे हेही त्यांना समजावे, या उद्देशाने हा अनुवाद यशोदा भागवत यांनी करून मराठी भाषेच्या शास्त्रीय विभागात फार मोलाची भर घातली आहे. अशा प्रकारची शास्त्रविषयक पुस्तके मराठीत फारच थोडी आहेत.
मूळ ग्रंथाचे लेखक दोघेही मानसशास्त्राचे पदवीधर आहेत. हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा त्यांना कशी झाली ते त्यांनी प्रस्तावनेत सांगितले आहे. फलज्योतिष या विषयावर दोन अगदी परस्परविरोधी तट विसाव्या शतकाच्या आरंभापासून पडलेले आहेत. विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी लोक फलज्योतिष हे शास्त्र नव्हे तर केवळ एक थोतांड आहे, असे मानतात. त्याउलट या शास्त्राचे समर्थक असे म्हणतात की हजारो वर्षांच्या अनुभवांच्या आधारावर हे शास्त्र उभे आहे आणि ते बहुसंख्य लोकांच्या विश्वासास पात्र झालेले आहे. म्हणून ते एक खरे शास्त्र आहे.
लेखकांच्या मते दोन्ही तटाचे लोक आपापल्या बाजूला पुरेसा पुरावा नसतानाच त्यांच्या-त्यांच्या भूमिकांवर ठाम उभे आहेत. प्रत्येक बाजूकडचा पुरावा नीट तपासला पाहिजे, त्या शिवाय मतप्रदर्शन करणे योग्य नाही असे त्यांचे म्हणणे आहे. सन १९७५ मध्ये हा वाद एकदम उफाळून वर आला. १८६ वैज्ञानिकांनी मिळून एक ज्योतिष-विरोधी पत्रक प्रसिद्ध केले. त्याची प्रतिक्रिया फार तीव्र उमटली. डॉ. कार्ल सेगन सारख्या नामवंत खगोलशास्त्रज्ञानेही त्या पत्रकावर टीका केली. 'ग्रह व तारे पृथ्वीपासून फार दूर अंतरावर असल्यामुळे त्यांचे भौतिक प्रभाव पृथ्वीवर अत्यंत नगण्य होतात. ' पत्रकात पुढे असेही म्हटले आहे की, जन्मवेळी माणसावर पडणारे ग्रह-तार्यांचे प्रभाव त्याचे भवितव्य घडवतात ही कल्पना अगदी चुकीची आहे. या विधानांचा लोकांनी असा अर्थ घेतला की ग्रह व तारे अतिदूर अंतरावर असल्यामुळे त्यांचे परिणाम माणसावर होत नाहीत असे वैज्ञानिकांचे मत आहे आणि त्यामुळे झाले काय की प्रचलित फलज्योतिषाच्या अंतरंगाकडे लक्ष द्यायला कुणालाच फुरसद राहिली नाही. सगळ्यांचे लक्ष एकाच मुद्द्यावर केंद्रित झाले: 'अंतरीक्षातून येणार्या विविध उर्जालहरींचे परिणाम इथल्या सजीव सृष्टीवर होतात`, हा तो मुद्दा. जणू काही तेवढा एक मुद्दा सिद्ध झाला की आपोआपच रूढ फलज्योतिष हे एक खरेखुरे शास्त्र आहे असे सिद्ध होणार होते! मात्र, फलज्योतिषावर टीका करणार्यांना निरुत्तर करण्यासाठी ज्योतिषसमर्थकांनी हा मुद्दा भरपूर वापरून घेतला, आणि विरोधकांचा जणू काही 'कात्रजघाट` केला!
याच सुमारास डॉ. मिशेल गॉकेलिन यांच्या संशोधनामुळे शास्त्रज्ञांच्या वर्तुळात फार मोठी खळबळ उडाली होती. शुक्र, चंद्र, मंगळ, गुरू व शनी या पाच ग्रहांचा मनुष्याच्या जन्मदत्त गुणधर्माशी काहीतरी संबंध असावा असे अगदी सूक्ष्म प्रमाणात का होईना, पण दर्शवणारे निष्कर्ष त्या संशोधनातून निघाले होते. वैज्ञानिक लोक मात्र या संशोधनाची दखल घेण्यास तयार होत नव्हते कारण ते निष्कर्ष त्यांच्या रूढ मतांशी विसंगत ठरत होते! अर्थात हा एक प्रकारचा अप्रामाणिकपणाच होता. प्रस्तुत लेखकांना वैज्ञानिकांच्या या दांभिकपणाचा उबग आला. जरी प्रचलित फलज्योतिषाचे दावे पुराव्यानिशी सिद्ध होऊ शकत नाहीत हे त्यांना मान्य होते, तरी या निष्कर्षांचा मात्र खुल्या दिलाने स्वीकार केला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली व ती लोकांच्यापुढे मांडण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले. पुस्तक प्रसिद्ध होऊनही आता पंधरा वर्षे उलटली आहेत. दरम्यानच्या काळात अनेक घटना घडल्या. 'आईबापांच्या आणि अपत्यांच्या कुंडल्यांत साम्य आढळते; म्हणजेच ग्रहनिगडित आनुवंशिकता आढळते` हा आपणच आधी काढलेला निष्कर्ष नंतर केलेल्या संशोधनात सिद्ध होऊ शकला नाही, असे खुद्द गॉकेलिन यानेच नमूद केले आहे. सन १९९१ मध्ये गॉकेलिन मृत्यू पावला. त्यानंतर 'यूरोस्केप्टिक १९९२` या नावाच्या शास्त्रविषयक नियतकालिकात कार्ल इ. कोप्पेनशार नावाच्या शास्त्रज्ञाने 'मार्स इफेक्ट अन् रिडल्ड` अशा मथळ्याचा लेख लिहून असे दाखवून दिले की, गॉकेलिनच्या संशोधनपद्धतीत उणीवा असल्यामुळे त्याचे निष्कर्ष मान्य करता येत नाहीत. 'सिलेक्शन बायस` हा दोष तिच्यात आहे हे त्याने सप्रमाण दाखवून दिले, पण त्याचा प्रतिवाद करायला गॉकेलिन हयात नसल्यामुळे हा वाद तसाच अनिर्णित राहून गेला. शास्त्रज्ञांच्या वर्तुळात आता त्याला काही महत्त्व राहिलेले नाही, आणि ज्योतिषांनाही गॉकेलिनच्या शोधांचा प्रत्यक्ष असा उपयोग करता आलेला नाही.
या पुस्तकाच्या मुख्य २२४ पृष्ठांपैकी १८१ पृष्ठात लेखकांनी आपला पूर्वपक्ष मांडला आहे. वैज्ञानिकांचा आडमुठेपणा, प्रचलित रूढ फलज्योतिषाची अविश्वासार्हता, आणि अलीकडेच नव्याने निघालेल्या कॉस्मॉबायॉलाजी - म्हणजे अंतरीक्षाचा सजीव सृष्टीशी असलेला संबंध दर्शवणारे शास्त्र याची चर्चा या भागात आहे. हा पूर्वपक्ष मांडून झाल्यावर, 'आता आम्ही एका क्रांतिकारक शोधाची माहिती वाचकांना देणार आहोत, ` अशी प्रस्तावना करून त्यांनी गॉकेलिनच्या संशोधनाची सविस्तर माहिती दिली आहे. ती मुळातून वाचणेच जरूर आहे. पुस्तकाच्या अखेरीस लेखकांनी आपले स्वत:चे म्हणून जे मत व्यक्त केले आहे ते मात्र त्यांची संभ्रमावस्थाच दाखवणारे आहे. ते म्हणतात: ' जर आम्हांस कुणी विचारले की काय हो, तुम्ही या शास्त्रावर विश्वास ठेवता का, तर आम्ही म्हणू की या प्रश्नाला साधेसरळ उत्तर नाही, आणि आमचे मत काय आहे याला काही विशेष महत्त्व नाही, वाचकांनीच आपले मत काय ते स्वत: ठरवावे. आम्ही फक्त 'फॅक्ट्स्` काय आहेत त्या वाचकांच्यापुढे मांडण्याचे काम केले आहे. ` म्हणजे, गंमत कशी आहे पाहा: आपल्या पुस्तकाला 'फलज्योतिष, शास्त्र की अंधश्रद्धा? ` असे नाव देऊन लेखकांनी वाचकांचे कुतूहल जागृत केले आणि त्यांच्या अपेक्षा वाढवल्या, पण त्यांनाच जिथे या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नव्हते तिथे वाचकांना तरी या प्रश्नाचे उत्तर काय सापडणार होते? हे सगळे पुस्तक वाचून झाल्यावरसुद्धा वाचकांची स्थिती 'पहिले पाढे पंचावन्न` अशीच नाही का व्हायची? मग एवढा डोंगर पोखरून मिळवले काय? लेखकांच्या शब्दातच ते सांगायला हवे:- गॉकेलिनच्या निष्कर्षावर भाष्य करताना लेखक म्हणतात की, 'आता एक नवीन शास्त्रच जन्माला येण्याच्या तयारीत आहे असे अगदी नि:संदिग्धपणे म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे! हीण धातूच्या ढिगार्यात जणू काही एक सोन्याची चीपच गॉकेलिनच्या शोधाच्या रूपाने आता आपल्याला गवसली आहे! `
या पुस्तकाच्या बाबतीत एक गोष्ट मोठी मौजेची आहे: फलज्योतिषाचे विरोधक आणि समर्थक, या दोघांनाही असे वाटते की हे पुस्तक आपल्याच मताला पुष्टी देणारे आहे! हे या पुस्तकाचे यश म्हणावे की अपयश?
डॉ. वि.म.दांडेकर यांनी या पुस्तकाचे केलेले परीक्षण अनुवादाच्या आधी टाकलेले आहे ते प्रथम वाचून मग अनुवाद वाचणे बरे. दांडेकरांचे मत असे: 'फलज्योतिष हे शास्त्र आहे असे अद्याप सिद्ध झालेले नसले तरी ते शास्त्र नाही असेही अद्याप कोणी सिद्ध केलेले नाही!` -- म्हणजे पुन: तोच गुळमुळीतपणा! गेली दोन-अडीच हजार वर्षे भरभराटीत असलेले हे प्रकरण अद्यापही शास्त्र म्हणून सिद्ध झालेलेच नाही म्हणे! मग आता इथून पुढे ते शास्त्र 'आहे` असे सिद्ध करायला कोणी अवतार घेणार आहे का? असा प्रश्न मनात येतोच. पण ग्यानबाची मेख इथेच तर आहे!
परीक्षणात दांडेकरांनी एक आक्षेप असा घेतला आहे की, पुस्तकात कॉस्माबायॉलॉजीची जी प्रदीर्घ चर्चा आली आहे ती मूळ विषयाशी असंबद्ध आहे. ग्रह व तारे यांचे परिणाम व्यक्तिश: प्रत्येक माणसावर होतात असे गृहीत धरूनच ते परिणाम 'वर्तवणे` ही या शास्त्राची 'सिद्धता` आहे, तिच्यात हे शास्त्र यशस्वी झाले आहे की नाही हा खरा मुद्दा आहे, बाकीची चर्चा व्यर्थ आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचा हा आक्षेप योग्य असला तरी लेखकांच्या बाजूने असे म्हणावे लागेल की १८६ वैज्ञानिकांच्या त्या पत्रकातील चुकीच्या विधानाचा प्रतिवाद करण्यासाठी ही चर्चा करणे लेखकांना आवश्यक वाटले असावे.
गॉकेलिनच्या निष्कर्षांची चर्चा करून झाल्यावर डॉ. दांडेकरांनी एक मोठा मार्मिक प्रश्न विचारला आहे तो असा:- समजा, ग्रहयोगांवरून तुम्हाला असे कळले की अपघात होण्याची शक्यता तुमच्या बाबतीत दोन टक्के अधिक आहे, पण मग तो अपघात टाळण्यासाठी काय करावे किंवा काय करू नये, हे तुम्हाला ठरवता येईल का? हा प्रश्न विचारण्याचे कारण असे की गॉकेलिनने 'मार्स इफेक्ट` या नावाचा जो गाजलेला शोध लावला आहे त्याचे स्वरूप असेच अत्यल्प परिमाणातले आहे, म्हणून त्याचा व्यावहारिक असा काहीही उपयोग नाही हेच दांडेकरांना सुचवायचे आहे. असे असले तरी, गॉकेलिनच्या संशोधनातून जो काय पुरावा पुढे आलेला आहे त्याच्यावरून या शास्त्राच्या मुळाशी काहीतरी तथ्य असावे अशी आपली खात्री झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेवटी उपसंहार श्री. व.दा.भट यांनी केला आहे. त्यात त्यांनी एक महत्त्वच मुद्दा मांडला आहे: फलज्योतिषशास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करणे हे काम 'एम्पीरिकल` म्हणजे फक्त चाचण्यांच्या द्वारे केलेल्या संशोधनातून होणे शक्य नाही असे त्यांना वाटते. हा मुद्दा त्यांनी एक अगदी समर्पक उदाहरण देऊन मांडला आहे. तो सहमत होण्यासारखा आहे. पाश्चात्य देशात गेली पन्नास वर्षे हे संशोधन चालूच आहे पण त्यातून काहीही निर्णायक असे निष्कर्ष निघालेले नाहीत. फलज्योतिषाला प्रतिकूल असलेले असे निष्कर्ष जरी लोकांच्यापुढे ठेवले तरी ते त्या आकडेवारीवर आणि टक्केवारीवर विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत. तिकडे डॉ. दांडेकरांच्या म्हणण्याप्रमाणे एम्पीरिकल संशोधनाखेरीज दुसरा कोणताही मार्ग या शास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी आपल्याला उपलब्ध नाही! म्हणजे इथे मार्गच खुंटला! ही अशी उलट-सुलट विधाने वाचल्यावर, 'आता हा यक्षप्रश्न कायमचाच अनुत्तरित राहणार` असा निष्कर्ष हे पुस्तक वाचल्यावर जर वाचकांनी काढला तर त्यात नवल नाही! म्हणून हे परीक्षण वाचणार्या वाचकांना आम्ही मुद्दाम सांगतो की, या यक्षप्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्याचा एक वेगळा मार्ग उपलब्ध आहे, पण त्या मार्गाने जाणार्याला आपल्या डोक्याला थोडी तोशीस द्यावी लागेल! या तथाकथित शास्त्राच्या मूलभूत सिद्धान्तांचाच खोटेपणा जर तर्कशुद्ध पद्धतीने लोकांच्यापुढे मांडला व तो त्यांना पटला तर हा यक्षप्रश्न कायमचाच निकालात निघेल. आम्ही तेच कार्य हाती घेतले आहे. खेदाची गोष्ट एवढीच आहे की सुशिक्षित लोक या बाबतीत उदासीन आणि अलिप्त आहेत. ते आपला अलिप्तपणा सोडतील तो सुदिन असे म्हणायचे!
'फलज्योतिष, शास्त्र की अंधश्रद्धा ?` अनुवादिका: यशोदा भागवत
अनुवादित पुस्तकाचे मूळ नाव :- ऍस्ट्रॉलॉजी, सायन्स ऑर सुपरस्टिशन ? लेखक एच.जे.आयसेन्क व डी.के.बी. निआस.
प्रथमावृत्ती १९८२.
अनुवादित पुस्तकाचे प्रकाशक-
मॅजेस्टिक प्रकाशन, एकत्रित पृष्ठे - २७९ मूल्य- दोनशे रुपये.
===============================================================================================================================
पुर्वप्रसिद्धी- उपक्रम दिवाळी 2008
8 comments:
मस्त परीक्षण केले आहे. अर्थात हा प्रश्न कधी निकालात निघेल, असे मला वाटत नाही. त्यामुळे आपलं नेहमीचं सांगणं आहे, ज्योतिषांचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे.
मूळाशी घाव घालणारा प्रश्न आहे. ज्योतिषास शास्त्र का म्हणावे? हजारो वर्ष अभ्यास झाला असेल कदाचित, पण जेव्हा काही सिद्धांत मांडून तो सिद्ध करता येतो तेव्हाच त्याला शास्त्र असे म्हणतात. कोणीच ज्योतिषी असेच होइल हे ठामपणे सांगू नाही शकत अथवा तसे लिहूनही नाही देऊ शकत.
Namaskar.
Please see http://dhondopant.blogspot.com/
Dhondopant barobar bhavishya ani todge sangatat as per his blog. You may want to confirm.
Maza Awishwasahi nahi ani wishwasahi nahi. I will like to hear from some knowledgeble person like you.
Best books, if i wants to bye this book copy then what is the procedure?
Anirudha R. Fisfise
9960353198
मॆजेस्टिक बुक मध्ये पुस्तक उपलब्ध आहे.
jyotish he shastr nahich aahe. pratyek shastrala adhar asto..jyotish phakt anubhavavar adharit aahe.. aajvar kamit kami 200 thikani bhavishy pahila aahe..pan ekhi khara jhalela nahi... kasa mannar yala mag shastr...
ganitamadhye mahit asta 1+1 = 2
pan yat asa nahiche...kahi goshti jyotishi lok yogavar sodun detat...
tya veles nahi ghadla ki mhantat pudhcha yog changla aahe...
saglach bina puravyacha
jyotish he shastra aaso kinva naso, yat aamhala kahich interest nahi. jar kunala aamchyakadun jyotish vishayak margadarshan hava aasel tar phone karun bheta--jayant kulkarni(9689165424) vaidnyanik drushtikon vagaire balaganaryanni tyancha aani aamchahi wel phukat ghalau naye.
jyotish he shastra aahe ki nahi hi kadhich kahich nishpanna na honari rikamtekdi charcha.aamcha jyotish shastravar purnapane vishwas aahe. charcha karanare kiti aale aani matit milale pan dev aahe taisa rahi yapramane shastra aahe tithe aahech, thampane ubhe aahe. any way jar kunala aamchyakadun jyotish vishai salla hava asel tar phone karun bheta(9689165424) jyotish manat aasal tar bheta manat nasal tar aapla aani aamcha hi wel vaya ghalau naka.
Post a Comment