Tuesday, May 25, 2010

प्रकाशनातील मनोविकार

दै. सकाळ १७ मे २०१० मुक्तपीठ मधील एका लेखकरावांचा प्रकाशनाविषयी अनुभव वाचला. या निमित्त आम्हाला आमचा ही ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचा अनुभव सांगावासा वाटतो. मी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाची १००० प्रतींची प्रथम आवृत्ती २००१ मधे स्वत:च आत्मविश्वासाने काढली. पुस्तक फलज्योतिष चिकित्सेवरील होते.जेष्ठ फलज्योतिष चिकित्सक श्री माधव रिसबुड यांच्या हस्ते प्रकाशित केले.प्रकाशन समारंभ केला. त्यानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॊ. नरेंद्र दाभोलकर व ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांचा जाहीर वादसंवाद ठेवला
.या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची दै.सकाळ ने दि २४/५/२००१ रोजी दखल घेतली. आता प्रश्न पुस्तक विक्रीचा आला. रसिक साहित्य मधे ४० टक्के कमिशननी विक्रिस ठेवले. तसेच बहुतेक प्रती अंनिस च्या शिबिरातच ठोक खपल्या. कारण पुस्तक चिकित्सेचे असल्याने व अंनिसत कार्यकर्ता असल्याने ते सहज शक्य झाले. आवृत्ती संपली.पुस्तक निर्मितीचे पैसे केव्हाच वसुल झाले होते. पुस्तक अनेक दिग्गजांना सदिच्छा भेट दिले होते. डॊ जयंत नारळीकरांनाही दिले होते. त्यांनी पुस्तकाची दखल घेतली. पुढे काही भर व सुधारणा करुन द्वितीय आवृत्ती सन २००३ मधे काढली. १३ एप्रिल २००३ मधे लोकसत्ता मधे डॊ जयंत नारळीकरांनी लक्षणीय पुस्तक सदरात त्याचे परिक्षण लिहिले. दिग्गजांनी लिहिलेल्या पुस्तकपरिक्षणाचा खपावर होणारा परिणाम हा चमत्कारासारखा असतो याची अनुभुती या निमित्तानी मिळाली.बाहेरगावातील पुस्तक विक्रेत्यांचे फोन आले. माझ्याकडे वितरण व्यवस्था नसल्याने मी नकार दिला. पण त्यांनी घरी येउन पुस्तक गोळा केले व रोख पैसे दिले.निम्मी आवृत्ती तर इथेच खपली. याही वेळी ४० टक्के कमिशननी रसिक साहित्य व साधना मिडिया सेंटर मधे पुस्तक विक्रिला ठेवले होतेच. एखाद दुसरा अपवाद वगळता पैसे वेळच्या वेळी सहज मिळत होते. पुस्तकाला रोखीने ६०% कमिशननी बाजारात मागणी होती. व्यावहारिक हिशोबाने मला ते किफायतशीर होते. मी ठोक विक्री करुन मोकळा झालो. या वेळी पुस्तक निर्मितीत काही प्रतीत बाइंडिंग चा दोष निर्माण झाला होता. परफेक्ट बाइंडिंग मधे चिकट द्रव्याचा गुणवत्ता चांगली नव्हती. बडोद्याहुन पुस्तक आवडल्याचा परंतु बाईंडिंग खराब प्रत मिळाल्याचे एका वाचकाचे पत्र मिळाले. ताबडतोब दिलगिरी व्यक्त करुन दुसरी प्रत स्वखर्चाने पाठवली. वाचकाला आवडल्याचा आनंद हा खर्चापेक्षा कितीतरी अधिक होता.

पुस्तकाची किंमत ही निर्मीती खर्चाच्या किमान ४ ते ५ पट ठेवावी लागते हा हिशोब मला माहित होता. अनेक जेष्ठांकडुन मला तो शिकायला मिळाला होता.मी प्रकाशक शोधत बसण्याऐवजी स्वत:च ते प्रकाशित करायचे ठरविले ते या मुळेच. प्रकाशक म्हणुन बायकोनेच ते स्वत:च्या ’संज्ञा सर्विसेस” या प्रोप्रायटरी फर्म द्वारा प्रकाशित केले. मुद्रक व प्रकाशकाने शासनाला पाठवण्याच्या प्रती मुंबई दिल्ली कलकत्ता व मद्रास अशा शासकीय ग्रंथालयाच्या ठिकाणी प्रत्येक आवृत्तीची स्व खर्चाने पाठवायच्या असतात. ते बंधनकारक आहे. प्रकाशन विश्व या डायरीचा या कामी उपयोग झाला. प्रकाशन वर्तुळात नारळीकरांना कस काय ’म्यानेज’ केल अशी विचारणा झाली. एकतर विषय फलज्योतिष त्यावर परिक्षण नारळीकरांचे अशा प्राथमिक माहितीवर काहींच्या भुवया उंचावायच्या. हरिभाउ लिमयेंच्या वास्तुशास्त्र पुस्तकाला एक प्रास्ताविक पर चार शब्द नारळीकरांनी लिहिले होते. त्यानिमित्त झालेल्या वादंगात महाराष्ट्र टाईम्स मधे नारळीकरांनी दिलगीरी व्यक्त केली होती. तेव्हापासुन ते ’अशा’ विषयावर जाहीर लिहित नसत. फक्त आपली भुमिका मांडत. अशा पार्श्वभुमीवर पुस्तकाचे सकारात्मक परिक्षण लिहिणे ही बाब मोठीच होती.

त्यानंतर २००५ मधे माझ्या जाहीर कार्यक्रमात प्रा मिलिंद जोशी यांनी एका व्यासपीठावर मुलाखत घेतली. त्यावेळी कार्यक्रमाला मनोविकास प्रकाशनचे श्री अरविंद पाटकर आले होते. त्यावेळी परिचय झाला.प्रतिथयश पुरोगामी प्रकाशक अशी त्यांची समाजात प्रतिमा आहे. मी तिसरी आवृत्ती काढण्याच्या तयारीत होतो. "आम्ही काढली तर चालेल का?" अशी विचारणा त्यांनी केली.व्यावसायिक प्रकाशकाने तिसरी आवृत्ती काढल्यावर आपल्याला त्यात अजिबात लक्ष घालण्याची गरज नाही असा विचार करुन मी 'हो' म्हणुन टाकले.त्यांनी करार, १० टक्के मानधन वगैरे गोष्टी तोंडी सांगितल्या.परंतु पुढे करारही झाला नाही व मानधनही अद्यापपर्यंत मिळाले नाही. त्यांनी आवृत्ती काढली. मला प्रतीही दिल्या. पण त्यावर 'प्रथम आवृत्ती' लिहिले होते. या बद्दल विचारले तर, "हो हो ती मनोविकासची पहिली अशा अर्थाने आहे". सार्वजनिक कार्यक्रमात ते अधुन मधुन भेटत असत. 'या कि एकदा' मी सुद्धा 'एकदा तुमच्याकडे यायचय' अस म्हणत पाच वर्षे गेली.मधल्या काळात मी पोलिस बिनतारी विभागातुन स्वेच्छानिवृत्ती घेतली. मला पहायच होत कि प्रकाशक स्वत:हुन मानधन देतायत का? माझी थांबायची तयारी होत म्हणुन मी पाच वर्षे थांबलो. मानधन हे प्रकाशकाने लेखकाला मानाचे प्रतिक म्हणून स्वत:हुन देण्याचे धन आहे. करार हा कायदेशीर तांत्रिक बाब आहे. मानधन या शब्दात धना पेक्षा मान ही बाब अधिक महत्वाची.लेखकाने आपल्या मानधनाविषयी प्रकाशकाकडे तगादा लावावा लागणे ही बाब अपमानास्पद आहे. पाटकरांनी स्वत:हुन मानधनाचा विषय कधी काढला नाही. लेखकच तो विषय काढत नाही म्हटल्यावर आपण स्वत:हुन कशाला काढा. शेवटी मी इमेल द्वारे प्रकाशकांना आवृत्तीचा पारदर्शी पणा, मानधन, वस्तुस्थिती या बद्दल विचारणा केली. त्याचे उत्तर नाही. एका सार्वजनिक कार्यक्रमात मेल मिळाली एवढाच उल्लेख केला. मी त्यांना फेब्रुवारी २०१० मधे भेटायला गेलो. सध्या प्रकाशन व्यवसाय माझा मुलगा आशिष सांभाळतो मी फक्त मार्गदर्शन करतो. तुमची १००० ची आवृत्ती संपली आहे. पुस्तक अपेक्षेसारख चालल नाही अशी पुस्ती जोडली. देउ तुमच १० टक्के मानधन. कधी त्या बद्दल भाष्य नाही. आता ही बाब मला अपमानास्पद वाटायला लागली. मी त्यांना तसे स्पष्टपणे पत्राद्वारे कळवले. त्यावर त्यांचा भावना दुखावल्याचा फोन आला. मी त्यांना भावना दुखावल्या बद्दल क्षमस्व पण माझ्या विचारांवर मी ठाम आहे असे सांगितले.नंतर आशिष पाटकर यांचा फोन आला कि २००७ मधे आवृत्ती संपली असुन मार्च अखेर आमचे हिशोब झाले कि एप्रिल मे मध्ये वगैरे पैसे देउ. थोडक्यात या तीन महिन्याचा कालावधीत तुमचे मानधन आम्ही देणार नाही असा त्याचा अर्थ.मानधनाची हक्काची मागणी करणार्‍या लोकांना हाडतुड केल जात असे ऐकून होतोच.

पुस्तक म्हणजे 'माल'. तो खपणारा 'माल' आहे का हा विचार करुन प्रकाशक त्या मालाची निर्मिती करतो. वाचक म्हणजे 'गिर्‍हाईक' लेखक म्हणजे कच्चा माल पुरवणारा 'पुरवठादार' या तत्वावर ही 'साहित्य सेवा' चालते. १०० रुपयांच पुस्तकात २० रुपये तांत्रिक निर्मिती मुल्य असते. उरलेल्या ८० रुपयात वितरण कमिशन, मानधन, जाहिरात, कार्यालयीन खर्च, नफा वगैरे बाबी समाविष्ट असतात. जेव्हा संस्थात्मक गिर्‍हाईक म्हणजे ग्रंथालय असतात त्यावेळी व्यवहार ’ठोक’ होतो. शासकीय ग्रंथ खरेदी हा तर पुन्हा वेगळाच प्रांत इथे सगळे एमआर पी च्या खरेदीवर २० टक्क्यांपर्यंत सुट घेउन अगदी नियमात बसवुन खरेदी.सुमार पुस्तकांच्या किंमती सुद्धा अवाढव्य का असतात याचे रहस्य वाचकांना माहित हवे.

ज्या लेखकांशी प्रकाशकाने करार केलेले असतात ते सुद्धा पाळले जातात कि नाही यात साशंकताच. किती आवृत्त्या काढल्या, एका आवृत्तीत किती प्रती प्रत्यक्ष छापल्या हे प्रकाशकालाच ठावे! मराठी पुस्तके खपत नाही ही ओरड हिशोबाला कामी येते. अक्षरधारा हे ग्रंथप्रदर्शन चालवणारे रमेश राठिवडेकर म्हणतात कि मराठी पुस्तक खपत नाही हे खरे नाही. आपण वाचकांपर्यंत पोचण्यास कमी पडतो.त्यांच्या ग्रंथप्रदर्शनात मराठी पुस्तकांचा खप भरपुर होतो.

प्रकाशन व्यवसायात अनेक अपप्रवृत्ती शिरल्यात. कुठल्याही व्यवसायात त्या शिरतात. गंमत म्हणजे प्रथितयश व्यावसायिकांकडे सत व असत प्रवृत्तींच व्यावहारिक मिश्रण असत.काळ वेळ पाहुन ती अस्त्रे ते बाहेर काढीत असतात. मराठी वाचकाला भावनिक आवाहने करुन आपली प्रतिमा उंचावत ठेवायची व साहित्य सेवा करीत असल्याचा आव आणायचा. वाचक व लेखक दोघांनाही लुटुन अशा प्रकाशन संस्था मोठ्या होतात. भाबड्या लेखक, वाचकांना हाताशी धरुन नवे नवे पुस्तकमाफिया प्रकाशन व वितरण व्यवसायात तयार होत आहेत. पुस्तकातील आशय संपन्नेतेपेक्षा पुस्तकाचे मार्केटिंग पुस्तकाला यशस्वी करते. बौद्धीक संपदा कायदा अजुन भारतात बाल्या वस्थेत आहे. पायरसी,कॊपीराईट या बाबतीत लेखक वाचकात जागरुकता नाही. कोर्टात बौद्धिक संपदा कायद्याच्या केसेस प्रलंबित असतात.कोर्टाच्या वाट्याला जाणे म्हणजे वेळ पैसा व श्रम यांचा अपव्यय हे गणित पक्के रुजलेले आहे.ते खोटेही नाही.

जोपर्यंत जातक आणि ज्योतिषी आहेत तो पर्यंत ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद चालूच रहाणार आहे. पुस्तक रुपाने त्याचे भवितव्य काय हे भाकित मात्र जागरुक व सुजाण वाचकच ठरवणार आहेत.


(सदर लेख अन्य संकेतस्थळावर तसेच ईसकाळ वर प्रकाशित आहे)

2 comments:

साधक said...

छान माहितीपूर्ण लेख. प्रकाशकांबद्दल ब-च्या ठिकाणी लिहून आलयं. पण पर्याय काय? प्रत्येकजण प्रकाशक तर नाही बनु शकत नाही.
मौज राजहंस यांचा अनुभव आहे का कुणाला?

Prakash Ghatpande said...

साधकजी
राजहंसचा अनुभव आमचे जेष्ठ मित्र शशीधर भावे यांना अतिशय चांगला आहे.दर सहा महिन्याला स्टेटमेंट पाठवतात. प्रत्येक प्रतीचा हिशोब देतात.त्यांचे मनोभावे देशदर्शन अरुणाचाल प्रदेश आता आसाम नंतर सिक्कीम वर येत आहे त्यांनी ही प्रथमच पुस्तक लिहिले आहे.