मनोगत
काय! तुम्ही पण अंधश्रद्धाळूच की राव ! लग्नाला एक तप पूर्ण झाल्याचे निमित्त म्हणा औचित्य म्हणा साधून हे पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदय मी व्यक्त केल्यावर आमच्या एका स्नेहयांनी ही प्रतिक्रिया दिली. मला मोठी गंमत वाटली. मुहूर्त या प्रकाराविषयी मानसिकता अशी पण रुजत गेली त्याचा हा आगळा वेगळा पैलू. अनेक विवाह संस्था लग्न जुळवताना सर्व प्रकारची मदत करतात. माहिती पुरवतात. पण पत्रिकेला किती महत्व द्यावे असा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी तो ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे अशी भूमिका घ्यावी लागते. मग विवाहाचे वेळी पत्रिका जुळते का? हे बघणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. प्रश्नकर्त्याला समोरच्याची काय भूमिका आहे हे समजावून घेण्याचा तो एक मार्ग असतो. विचारणारा माणूस संभ्रमात पडलेला असू शकतो. तो विवाहाच्या वेळी पत्रिका बघून निर्णय देणार असेल तर त्याला हा प्रश्न पडू शकतो. कदाचित आपल्या या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणून हिणवले गेले असण्याची खंत असू शकते. आपल्या या श्रद्धेला कुणाचा तरी पाठिंबा असण्याची शक्यता अजमावी हा हेतू असू शकतो. काही तरी गुळमुळीत सांगू नका राव ! एकतर श्रद्धा तरी म्हणा किंवा अंधश्रद्धा तरी म्हणा! असे म्हणून समोरच्याला कैचीत पकडण्याचा हेतू असू शकतो. त्या निमित्त काही तरी वादसंवाद घडावा अशीही इच्छा असू शकते.
आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते.
परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही. म्हणूनच विवाह ठरवताना पत्रिका बघावी की नाही? हे कोणी अमुक प्रसिद्ध व्यक्ति सांगते म्हणून न ठरवता संबंधितांनी स्वत: पत्रिका बघण्याची, जुळविण्याची पद्धत समजून घेउन मगच ठरवावे एवढीच या पुस्तकाच्या निमित्ताने नम्र विनंती.
पुस्तक खालील दुव्यावरुन डाउनलोड करु शकता.
यंदा कर्तव्य आहे
लेख माला स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा. सदर लेखमाला मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर आहे
प्रकाश घाटपांडे