Thursday, October 24, 2013

ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत

ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत हे पुस्तकच प्रकाशझोतात आल ते श्रीराम लागूंच्या भाषणामुळे. लोकवाङमय गृह व लोकविज्ञान चळवळ यांचे तर्फे आयोजित या पुस्तकाच्या प्रकाशनात डॉ लागू म्हणाले," ज्योतिष हे शास्त्र असेल तर ते फसवणुकीचे, भविष्यविषयक लोकांच्या कुतुहलाचा फायदा घेउन स्वत:ची तुंबडी भरण्याचे. ज्योतिषासारख्या अंधश्रद्धा केवळ समाजाचे शोषण करतात म्हणुन निषेधार्ह नाहीत तर त्या व्यक्तिला,समाजाला बौद्धिक दृष्ट्या खच्ची करतात. त्याची सारासार विचारशक्ती मारतात.त्यामुळे वरकरणी कितीही निरुपद्रवी भासणारी अंधश्रद्धा ही समाजाला घातक ठरते."
पुस्तकाची प्रस्तावना ही 'पुरस्कार' म्हणुन ग.वा.बेहेरे यांनी लिहिली आहे,त्यात त्यांनी स्वत:चे अनुभव मांडलेत.राशीभविष्य लिहायला कोणतीही अक्कल लागत नाही. मी सुद्धा काही काळ ते लिहिले आहे असे ते म्हणतात.
पुस्तकाच्या स्वरुपात विशाल नावाचा एक मुलगा आपल्या काकांना जिज्ञासेने प्रश्न विचारतो व त्याचे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे काका हे त्याच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देतात. विशालच्या प्रश्नांना उत्तर देता देता आपल्या प्रश्नांचीही उत्तरे मिळून जातात.पुस्तकाच अस स्वरुप हे जाणीव प्रुर्वक असाव. कारण किशोरवयीन जिज्ञासा या वेळीच जाणुन त्यांना जर वैज्ञानिक दृष्टीकोनाची दिशा दाखवली तर होणारी युवापिढी ही विज्ञाननिष्ठ होईल.विशालच्या प्रश्नातून खगोलशास्त्राची सुरवात,पंचांगातील खगोलशास्त्र,खगोलशास्त्रात फलज्योतिषाची सरमिसळ, माणसाच्या दुबळेपणाचे फायदा घेणारे ज्योतिष,ग्रहण व अंधश्रद्धा असे विषय मांडले आहेत. याव्यतिरिक्त बुवांचे चमत्कार व त्यामागील विज्ञान व उपसंहारात अंधश्रद्धा व विज्ञान विषयक इतिहासाचा मागोवा घेतला आहे. परिशिष्ट मधे गाडगे बाबा ते प्रबोधकार ठाकरे यातील दैववादाचा फैलावा. म.फुले समग्र वाङमय मधील 'आकाशातील ग्रह', आगरकरांच्या सुधारक मधील 'आमचे ग्रहण अजून सुटले नाही', महादेवशास्त्री जोशी यांच्या 'आत्मपुराण' मधील संदर्भोचित वेचे घेतले आहेत.
लेखक- जगदीश काबरे
प्रकाशक- सुकुमार दामले, लोकवाङमय गृह,८५ सयानी रोड भुपेश गुप्ता भवन प्रभादेवी मुंबई २५
पृष्ठे-७३
मूल्य- पंधरा रुपये.

Monday, October 21, 2013

फलज्योतिष चिकित्सा

फलज्योतिष चिकित्सा : लेखक रा.ज.गोखले.
पुण्यातील रा.ज.गोखले या भुगोल शिक्षकाने हे पुस्तक १९३५ साली प्रकाशित केले आहे.पुस्तक अर्थातच त्यावेळच्या सामाजिक परिस्थिती च्या पार्श्वभूमिवर आहे. लेखकाने फलज्योतिष या विषयावर संशोधन व्हावे व त्यासाठी फलज्योतिषाभिमानी जहागीरदार व संस्थानिक यांनी पुढाकार घ्यावा असे सुचित केले आहे. संशोधनापासून होणारा फायदा अधोरेखित करताना लेखक म्हणतो," या शास्त्रापासून निश्चित ज्ञान बहुतेके बाबीत मिळत नसेल व त्याचा तादृश उपयोग नसेल तर तसे जाहीर झाल्याने गरीब लोकांचा या शास्त्राचा सल्ला घेण्यात होणारा द्रव्याचा व कालाचा अपव्यय वाचेल व जनतेची दिशाभूल होणे टळेल.भविष्य ज्ञेय पण अटळ असेल,तर त्याचा खासगी व्यवहारात काही उपयोग नाही; पण ऐतिहासिक माहिती मिळवण्याच्या कामी उपयोग झाल्यास ऐतिहासिक ज्ञानवृद्धी च्या कामी या शास्त्राचा उपयोग करुन घेता येईल." फलज्योतिषाच्या मूलतत्वास निश्चित आधार मिळतो काय? शास्त्रात मानल्या गेलेल्या कारणांचा अपुरेपणा, भिन्न व परस्परविरोधी असलेले ज्योतिषातील पंथ, ग्रहयोग सूचक आहेत की कारक याबद्दलचा विचार,होय किंवा नाही हे उत्तर ग्रहहोगावरुन निश्चितपणे मिळणे शक्य आहे काय? शास्त्रातील मतभेद व संदिग्धता यामुळे वारंवार होणार्‍या घोटाळ्यांची उदाहरणे अशा अनेक पातळ्यांवर छोटी मोठी प्रकरणे पुस्तकात घेतली आहेत.बर्‍याच वेळा लोकमान्य टिळकांच्या कुंडली वर केलेली भाष्य उदाहरणात घेतली आहेत.फलज्योतिषाची आजची स्थिती ( म्हणजे १९३५ सालातील) मांडताना पुरस्कर्ते व विरोधी यांचे भिन्न पक्ष लेखकाने मांडले आहेत.

Thursday, October 10, 2013

फलज्योतिष एक महाथोतांड

फलज्योतिष एक महाथोतांड
पुस्तकाच्या नावावरुनच  फलज्योतिषावर अतिशय टीका करणारे पुस्तक आहे हे सांगायलाच नको.लेखक सुधाकर भालेराव हे खगोलशास्त्राचा अभ्यासक असून त्यावर त्यांनी विपुल लेखन व व्याखाने दिलेली आहेत. लेखकाच्या आपली सूर्यमाला तसेच कृत्रिम उपग्रह आणि अवकाश विज्ञान या ग्रंथांना राज्य पुरस्कार ही मिळाले आहेत.
पुस्तकाच्या सुरवातीला खगोलशास्त्र व फलज्योतिष यातील फरक सांगितला आहे. आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर होणार परिणाम, जन्मकुंडली हा जन्मक्षणीचा नकाशा मांडता्ना असलेली पृथ्वी हा भगोलाचा मध्य ही संकल्पना या गोष्टी खगोलशास्त्रीय दृष्ट्या कशा चुकीच्या आहेत हे मांडले आहे. अवकहडा चक्र ही ग्रीकांची अब्रॆका बाब्रा ची उसनवारी असून त्यात चातुर्वण घुसवण्याचे उद्योग कुणाचे? असा प्रश्न लेखक विचारतो.भारतीय पंचांग कशी चुकीची आहेत व त्यामुळे पडणार्‍या सायन निरयन कुंडली विषयी विवेचन त्यात आहे. फलित अथवा भविष्यकथन या प्रकारातील अपरिहार्य भाग म्हणजे राशीस्वभाव,ग्रहांच्या उच्च नीच राशी,कुंडलीतील भाव व स्थाने,ग्रहांच्या जाती,मंगळाचे खूळ,शनीची साडेसाती या विषयी थोडक्यात विवेचन मांडले आहे. त्यानंतर कोसळलेली भाकिते-दुटप्पी भाषा, राष्ट्राची कुंडली, फलज्योतिषाचा वैज्ञानिकांनी केलेला अभ्यास या मुद्यांनी पुस्तकाचा शेवट केला आहे.
एकंदरीत पुस्तकात फलज्योतिष हे केवळ थोतांड नसून महाथोतांड आहे हे आव्हानात्मक भाषा वापरुन सांगितले आहे. वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज व डॊ सुरेंद्र बारलिंगे याचा अभिप्राय पुस्तकाच्या स्रुरवातीला आहे.

लेखक-सुधाकर भालेराव.
प्रकाशक
महाराष्ट्र रॆशनॆलिस्ट असोसिएशन
२४७ रमा नारायण निवास, तेलंग रोड माटुंगा मुंबई १९
प्रथम प्रकाशन- ४ मे १९८४
मूल्य- तीन रुपये
पृष्ठे -२२

Monday, October 07, 2013

पत्रिकेवरुन स्त्री की पुरुष?

पत्रिकेवरुन व्यक्ती स्री की पुरुष ओळखा, जिवंत कि मृत ओळखा हे आव्हान डॉ अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने  जगभरात जाहीर दिले होते.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तीच परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे.आज ते आव्हान २१ लाखांचे आहे.अजून कोणत्याही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नाही.काही ज्योतिषांना हे आव्हान स्वीकारता येत नाही याची खंत आहे. ज्येष्ठ ज्योतिषी श्री श्री भट पत्रिकेवरुन स्त्री कि पुरुष या बद्दल आपल्या ज्योतिषाच्या गाभार्‍यात या पुस्तकात याबाबत म्हणतात," खरे तर ज्योतिषाची शास्त्रीयता सिद्ध करुन देण्यासाठी आणखी आकडेवारी जमा करण्याची किंवा आव्हाने स्वीकारण्याची गरजच उरली नाही.१० पत्रिका देउन त्यातले मुलगा की मुलगी सांगा असा प्रश्न विचारला जातो.' भारतीय ज्योतिष' या हिंदी पुस्तकात या विषयी एक नियम आहे.त्यात थोडा बदल करुन एक नियम प्रचलित आहे तो मुलुंडचे श्री नाडगौडा यांनी कळवला आहे तो असा:-