Thursday, January 01, 2015

आत्मानंद यांची ज्योतिषविषयक काही मते

आत्मानंद हे अध्यात्मिक क्षेत्रात गति असणारे गृहस्थ. त्यांचे खरे नांव गणपत हिरालाल भावसार ( B.A, LLB )  जन्म:१९०० मृत्यू: १९७९ त्यांची अमृततुषार, अज्ञाताचा शोध व बोध, वैतरणेच्या ऐलतीरी ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. अमृततुषार मधे त्यांचे फलज्योतिष हे शास्त्र आहे काय? व नाडीग्रंथावरील अभिप्राय ही दोन प्रकरणे फलज्योतिष व नाडीग्रंथावर टीका व आत्मपरिक्षण करावयास लावणारी आहेत. ती मूळातूनच वाचण्यासारखी आहेत. इतर गूढ विषयावरील त्यांची काही मते विज्ञानवादी लोकांना मान्य होणार नाहीत. त्यांच्या अज्ञाताचा  शोध व बोध या पुस्तकात  भविष्यकालीन घटना व त्याचे ज्ञान. नावाचे एक प्रकरण आहे. त्यात ते म्हणतात.
"..यापैकी ज्योतिषासंबंधी सांगायचे म्हटले तर ते शास्त्र खोटे आहे असे म्हणण्यापेक्षा
ते शास्त्रच नाही असे म्हणणेच जास्त संयुक्तिक होईल. ज्योतिषाची अंगोपांगे व शाखा-उपशाखा सायन-निरयन वाद इत्यादि एकमेकांशी इतके विसंगत आहेत की त्यांचे निर्णय पुष्कळ वेळा परस्परविरोधी असतात.तरी त्या प्रत्येकाचा दावा असतो की त्यांनी जे काही प्रतिपादन केले आहे तेच फक्त खरे असू शकेल व असते. खरे पाहू गेले तर कोणाचाही पुर्णच काय परंतु पन्नास टक्के सुद्धा पडताळा येत नाही."
 "..असे म्हणणे भाग आहे की या तथाकथित शास्त्रास मूळात कसलाच पाया नाही. नउ ग्रह, राशी व कुंडलीतील बारा स्थाने यावर हे आधारित आहे..मुख्यत: नवग्रह म्हटले तर फारसे चुकणार नाही. याचा मूळ पायाच चुकीच्या व परस्परविरोधी गोष्टींवर आधारलेला आहे. कारण आपली समजूत अशी आहे कि आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्यास जन्म मिळतो व त्याच्या परिपाक स्वरुपी फळे आपणास या जन्मी मिळत असतात.असे आहे तर कोणत्याही ग्रहास काही करावयाचे उरलेच कुठे? फार तर असे म्हणा की त्याच्यामुळे कोणते फळ कसे व केव्हा मिळणार ते कळते. त्यांना कर्तृत्वशक्ती अशी काही नाही. परंतु या शास्त्राचा दावा तसा नाही. त्यांचे म्हणणे असे आहे की हे ग्रह निरनिराळ्या राशीतून व कुंडलीतील घरातून फिरत असतात.तसतशी त्यांची फळे बदलत जातात व प्रत्येक व्यक्तीचे त्या त्या राशीतील व ग्रहातील वास्तव्याप्रमाणे बरे वाईट करत असतात. त्यात पुन्हा दशा विदशा पुष्कळ भानगडी आहेत. त्या तूर्त सोडून देउ या. पहिला प्रश्न असा आहे कि चंद्र रवी मंगळ हे सर्व आपल्या पृथ्वीप्रमाणेच जड व सारखे फिरत राहणारे प्रचंड गोल आहेत. त्यांना स्वत:ची अशी कर्तुत्वशक्ती काहीच नाही. असे असता त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे एखाद्या ठिकाणाहून बरे करावे व तेथुन थोडे पुढे किंवा मागे सरकले की लागलीच फलादेशात फरक व तो फक्त मानवाच्याच बाबतीत!"


No comments: