Monday, April 01, 2019

नरेंद्र मोदींची खरी जन्मकुंडली कोणती?

मूळात नरेंद्र मोदींची खरी जन्मतारीख कुणालाच माहित नाही. निवडणुक आयोगाकडे असलेल्या कागदपत्रानुसार ती आहे 17 सप्टेंबर 1950. पुढे जन्म ठिकाण वीसनगर, गुजरात सकाळी 11 वाजता ही जन्मकुंडली तयार करण्यासाठी लागणारी अतिरिक्त माहिती. बहुसंख्य ज्योतिषी ही माहिती खरी आहे असे गृहीत धरुन जन्मपत्रिका तयार करतात. त्यानुसार त्यांची राशी व लग्न दोन्ही येते वृश्चिक. आता त्यांची दुसरी जन्मतारीख आहे 29 ऑगस्ट 1949  सकाळी 6 वाजता. ही आहे त्यांच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वरील तारीख. बीबीसी ने दिलेल्या माहिती नुसार निवडणुक आयोगाला जी माहिती दिली आहे त्या नुसार मोदींनी 1967 साली एसएससी परिक्षा उत्तीर्ण केली, त्यानंतर 1978 मधे दिल्ली विश्वविद्यालयातून बीए उत्तीर्ण केले नंतर 1983 मधे गुजराथ युनिवर्सिटीतून एम ए राज्यशास्त्र केले. परंतु अजुन कोणी त्यांचे सर्टिफिकेट पाहू शकला नाही. अर्थात त्याने काही फरक पडत नाही ही गोष्ट वेगळी. त्यांच्या 29 ऑगस्ट च्या जन्मतारखे नुसार त्यांची रास येते तूळ व लग्न येते सिंह. वाय सी शुक्ल या ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार दोन्ही पत्रिकेचा अभ्यास करुन अधिकृत जन्मतारखेनुसार येणार्‍या कुंडली पेक्षा त्यांची दुसरी जन्मतारीख 29 ऑगस्ट नुसार येणारी कुंडली ही अधिक योग्य वाटत आहे. ज्योतिषात याला अनुमानित पत्रिका म्हणतात. म्हणजे ताळा पद्धतीने आताची जातकाची वैशिष्ट्ये, वर्तमान व जन्मपत्रिका यांची सांगड घालून ठरवणे.
 खेडेगावात शेतकरी, बलुतेदार लोक अपत्य झाल्यानंतर नाव ठेवण्यासाठी ग्रामजोशी, भटजी, पुराणीक अशा धर्माचे प्रतिनिधित्व करणा-या मंडळींकडे जातात. जोशी जन्मनांव काढुन देतो.हे जन्मनाव हीच या बालकाची कुंडली बनते. उच्च वर्णियांसारखी जन्मवेळेची घटीपळांमध्ये नोंद ठेवण्याची गरज या समाजात नसते."पुनवेच्या आदुगर दोन दिवस सांच्या वक्ताला, जत्रच्या टायमाला, ऐतवार व्हता तव्हा, 'कासराभर दिवस वर आला आसन तव्हा" सवसांच्या टायमाला अशा माहितीतुन जन्मवेळेची अंदाजाने निश्चितीकेली जाते. त्यावरुन ग्रामजोशी नक्षत्र काढून  जन्मनावाची आद्याक्षरे पंचांगातुन काढतो व जन्मनाव ठरते.ते कधी कधी निरर्थकही असते. कधी कधी जन्मनावाच्या आद्याक्षरांवरुन एखादे देवाचे नांव ठेवण्यात येते. जन्मवेळ तर सोडाच पण जन्मतारखेच्या नोंदी सुद्धा जिथ विश्वासार्ह मिळणे अवघड तिथे ज्योतिषाचा मूलभूत आधार व हत्यार असलेल्या जन्मकुंडलीची विश्वासार्हता काय असणार आहे? मग अशावेळी अशा जन्मकुंडलीच्या आधारे भविष्य सांगणे याला काही अर्थ आहे का? असो! आमचे रिसबूड म्हणायचे बंडूचा हातचा चुकला तरी बंडूच गणित कस काय बरोबर येत?

2 comments:

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ said...

जन्मकुंडलीच्या आधारे भविष्य सांगणे याला काही अर्थ आहे का? असो! आमचे रिसबूड म्हणायचे बंडूचा हातचा चुकला तरी बंडूच गणित कस काय बरोबर येत?
म्हणून नाडीग्रंथ भविष्य पट्टीत कुंडली आणि जन्म दिनांक महत्त्वाचे ठरतात.
मोदींनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केले होते की नाही माहित नाही.
सध्या आपण अनिस तर्फे दर निवडणूकी आधी पंचवार्षिक योजनेत अमुक लाख मिळवा असे ज्योतिषांना धारेवर धरण्यात पुढाकार घेताना दिसत नाही?

sandeepdange said...

माझ्या मतानुसार मोदीची एकूण कारकीर्द पाहता जन्मतारीख १७ सप्टेंबर १९५० हीच असावी.