डॉ ह. वि सरदेसाईं गेले. त्यांच्या स्मृती जागृत झाल्या. त्यांचे लेख, व्याखाने मी ऐकायचो. त्यांच्या एका लेखात जवळपास 70 टक्के आजार हे सायकोसोमॅटिक असतात असे एक विवेचेन होते. मला जरा विचित्र वाटल. जरा फारच होतय नाही? असे वाटून गेले. नंतर यांचे फलज्योतिष विषयासंबंधी काय विचार आहेत हे जरा समजून घ्यावेत म्हणुन मी त्यांच्याकडे साधारण 2016 च्या दरम्यान गेलो होतो. त्यांच्या कमला नेहरु पार्कजवळील क्लिनिक वर गेलो. काउंटरवर सांगितले कि मी रुग्ण म्हणून आलेलो नाही. मला सामाजिक विषयासंदर्भात त्यांची भेट घ्यायची आहे. मला काउंटर वर सांगितले की सध्या ते वृद्धापकाळ व प्रकृतीअस्वास्थ्यामुळे या विषयापासून दूर आहेत. कार्यक्रमांना जात नाहीत. मी म्हणालो त्यांच्याशी चर्चा करायची आहे. त्यांनी नाही म्हणून सांगितले. मग म्हणल ठिक आहे. ही पुस्तके त्यांना वाचायला द्या असे म्हणून माझे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद व यंदा कर्तव्य आहे अशी दोन पुस्तके व डॊ जयंत नारळीकरांनी लिहिलेले ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... चे लोकसत्तातील तेव्हाचे परिक्षण असे दिले. माझे कार्डही दिले. नंतर मी माझ्या रुटीनला लागलो. चार पाच दिवसांनी मला त्यांच्या स्वागतकाचा फोन आला. डॉ. तुम्हाला भेटू इच्छितात. सकाळी दहा वाजता या. मला आनंद वाटला. मी लगेच गेलो. त्यांनी स्वागत केल. तुमची दोन्ही पुस्तके व्यवस्थित वाचलीत असे सांगितले. पुस्तके आवडल्याचे सांगितले तसेच तुमच्या विवेचनाशी सहमत असल्याचेही सांगितले. मग अनौपचारिक व ऐसपैस गप्पा झाल्या. मी ज्योतिशातले काही वैद्यकशास्त्रा संबंधी किस्से सांगितले. मग मी तो सायकोसोमॅटिकवाला विषय हळूच काढला. मला स्वत:ला IBS ( irritable bowel syndrome) चा त्रास डिटेक्ट झाला असल्याचे सांगितले. या IBS वर त्यांचा फॅमिली डॉक्टर पुरवणीत त्यांचा लेख आला होता. त्या त्रासात सायकोसोमॆटिक भाग आहे. हे त्या लेखातही होते. मी त्याविषयी विचारले. तुमच्या विवेचनात 70 टक्के भाग सायकोसोमॅटिक चा उल्लेख असतो. ते म्हणाले कि माझ्याकडे इतक्या वर्षात जे पेशंट आले त्यावरुन मी हे सांगतो. प्रत्यक्षात हे प्रमाण त्याही पेक्षा जास्त आहे. मनाचा व शरीराचा फार जवळचा व गुंतागुंतीचा संबंध आहे.आपल्याला त्याचे सगळेच आकलन झाले आहे असे अजिबात नाही. आम्ही पेशंटला फक्त बर व्हायला मदत करतो. त्याचा तोच बरा होत असतो. अनेक मनोकायिक आजारात प्लासिबो परिणाम होत असताना दिसतो. काही आजार निश्चित असे आहेत की जिथे औषधांचाच परिणाम होतो. आणि कारणही मनोकायिक नसतात. पण असे त्यामानाने फार कमी. मी म्हणालो औषधं जान्हवी तोयं। धन्वंतरी म्हणुन रोग्याचा असलेला विश्वास महत्वाचा आहेच. हल्ली डॉक्टर पेशंट नात बदलतयं. मग गाडी परत ज्योतिषावर आणली. त्यांना तो मतिमंद मुलांच्या व हुषार मुलांच्या कुंडल्यांविषयी आम्ही केलेला प्रयोग सविस्तर सांगितला. त्यांना प्रयोगाचे कौतुक वाटले त्यांनी पेपर मधे साधारणपणे तो वाचला होता.मी त्यांना म्हटल कि अंनिसचे ज्योतिषांना आव्हान हे नेहमीच आहे. पण हा प्रयोग आम्ही आवाहन या पातळीवर केला. आव्हानात दंभ उन्मादाचा वास येवू शकतो. आवाहनात ’आपण’ असा एक मृदू भाग असतो. मग मी त्यांना माझा फलज्योतिषविषयक प्रवास सांगितला. फलजोतिषाविषयी असलेला एक मृदूकोपरा त्यांना भावला. कदाचित याच कारणामुळे त्यांची माझी ही अनौपचारिक ऐसपैस भेट झाली असावी. नंतर आम्ही परस्परांचा निरोप घेतला त्यांची माझी ती पहिली व शेवटची भेट.