एखाद्याची पत्रिका वा हात पाहून ज्योतिषाने भावी आयुष्यातील एखाद्या घटनेची दाट शक्यता सांगितली म्हणजेच केवळ ’भविष्य’ नव्हे. तर वर्तमान काळातील एखादी अज्ञात असलेली गोष्ट जरी सूचित केली तरी ते ’भविष्य’म्हणूनच गणले जाते. एवढच कशाला भूतकाळातील एखादी घटना जरी त्याने शक्यता या प्रांतात सूचित केली तरीही ते ’भविष्य’.म्हणजे भविष्य हा शब्द केवळ कालवाचक नाही तर तो अज्ञाताचा घेतलेला कुठल्याही मार्गाने घेतलेला कालातीत शोध असा आहे. त्याला चिकटलेली आश्चर्य, अदभूत, गूढ अशी गुणवाचक वैशिष्ट्ये भविष्य या विषयाचे आकर्षण वाढवतात. आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलय याच एकीकडे भय ही असते तर दुसरी कडे आकर्षण ही असते. भविष्यकाळाविषयी सुखद स्वप्ने रंगवणे हा एक मानवी मनाचा खेळ असतो. त्यामुळे जगात बरेचसे व्यवसाय ’भय’ आणि ’स्वप्न’ यावरच चालतात. वैद्यकीय क्षेत्रात आजारी पडण्याचे भय व बरे होण्याचे स्वप्न दाखवून आरोग्य पुरवण्या ’प्रबोधनाचे’ तथा ’जागरुकतेचे’ काम करतात. बिल्डर घराचे स्वप्न दाखवतो. पोलिस,वकील कायद्याचे भय दाखवतात. बॉलिवूड तर अनेकांना हिरो हिरॉईन बनण्याचे स्वप्न दाखवते. लठ्ठ स्त्रियांना झिरो फिगर करण्याचे स्वप्न व सडपातळ स्त्रियांना लठ्ठ होण्याचे भय दाखवून देखील ब्युटी, डाएट, जिम इंडस्ट्रीज चालतात. ज्योतिषात ही तशा प्रकारचे लोक आहेत. कालसर्प योगाचे भय दाखवून नारायण नागबली विधी करायला लावणारे भरपूर पैसे उकळणारे लोक आहेतच. त्याचबरोबर काळजी करु नका कुलदेवतेच स्मरण करा व आपली सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवा असे सांगून धीर देणारे ज्योतिषी देखील आहेत. ग्रहपीडेचे भय आणि परिहार वा तोडगा काढून त्याचे निवारण केल्याने चांगले दिवस येतील हे स्वप्न दाखवून जातकाला दिलासा दिला तर त्यालाही लुबाडल्यासारखे वाटत नाही हे धूर्त व चाणाक्ष ज्योतिषांना माहित असते.