पूर्वी २००१ मध्ये ‘यूजीसी’ने ज्योतिष हा विषय विद्यापीठस्तरावर विज्ञानशाखेत घेण्याचा घाट घातला होता. त्यावेळी सर्व वैज्ञानिकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. प्रा.यशपाल, खगोलभौतिकतज्ज्ञ व माजी चेअरमन यूजीसी, यांनी असे मत व्यक्त केले होते की ज्या काळात फलज्योतिषाचा उगम व विकास झाला त्या काळातील समाजशास्त्र व मानव्यविद्या यांचा अभ्यास करण्यास काहीच हरकत नाही. पण त्याला विज्ञानशाखेत टाकणे ही घोडचूक ठरेल. म्हणजे ज्योतिष विषयावर आक्षेप हा विज्ञान या शाखेअंतर्गत घेण्याला होता. यूजीसीने त्यावेळी पलटी मारली व तो कलाशाखेत घेत असल्याचे सांगितले. जी गोष्ट विज्ञान नाही तिला विज्ञानशाखेत घेणे ही घोडचूकच. जीवाजी विद्यापीठ (ग्वाल्हेर), लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (दिल्ली), कवि कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक), संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय (वाराणसी) अशा ठिकाणी तो मानव्यविद्या, प्राच्यविद्या, संस्कृत अशा विषयांतर्गत या ना त्या स्वरूपात अगोदरपासूनच आहे.
आता ‘इग्नू’ने मानव्यविद्याशाखेत एक MAJY (Master of Arts – Jyotish) स्नातकोत्तर अभ्यासक्रम चालू केला आहे. भारतीय प्राच्यविद्येच्या अंतर्गत हा विषय येतो. बनारस हिंदू युनिवर्सिटीत हा अभ्यासक्रम पूर्वीपासून आहे. आजही विद्यापीठात मानव्यविद्या शाखेअंतर्गत वेदांग, उपनिषद, ज्योतिष या विषयांवर पीएचडी करता येते. वैज्ञानिकांनीही “तुम्ही ज्योतिषाला इतिहास, संस्कृती, प्राच्यविद्या या असल्या शाखेत तुमचे उद्योग चालू द्या, पण आमच्या विज्ञानशाखेत घ्याल तर खबरदार!” अशीच भूमिका घेतली.
प्राचीन काळापासून आपल्याकडे ‘शास्त्र’ हा शब्द फार सैलपणे वापरला गेला आहे. कोणत्याही विषयावरच्या ग्रंथगत माहितीला ‘शास्त्र’ म्हटले जात असे. आपापल्या मताला शास्त्राचा आधार आहे हे दाखवण्याची धडपड चालत असे. शास्त्र म्हणजे काय तर आधीच्या लोकांनी लिहून ठेवलेला एखादा बहुजन-मान्य ग्रंथ. विधवांच्या पुनर्विवाहाला शास्त्राधार आहे की नाही, किंवा संन्यास घेतल्यावर पुन्हा संसार करण्यास शास्त्राधार आहे की नाही? याची चर्चा करणाऱ्या पंडितांनी आधार म्हणून कोणती शास्त्रे घेतली असावीत? आणि मुळात त्या शास्त्रांना आधार कशाचा होता? हा विचार केला म्हणजे आमचा मुद्दा लक्षात येईल. ‘सायन्स’या शब्दाचा ऑक्सफर्ड शब्दकोषामध्ये दिलेला अर्थ ‘निरीक्षण आणि पडताळा यातून प्राप्त होणारे ज्ञान, विज्ञान, शास्त्र’, असा आहे. शास्त्र आणि विज्ञान या शब्दांच्या सुस्पष्ट अर्थांबाबत मतभिन्नता आहे. तरीपण विज्ञान म्हणजे ‘फिजिकल सायन्स’ या अर्थाने फलज्योतिष हे विज्ञान आहे का नाही? असा प्रश्न जर विचारला तर त्यास ‘नाही’ हेच उत्तर द्यावे लागेल.
विज्ञान या संज्ञेस पात्र ठरण्यासाठी काही पद्धती अवलंबाव्या लागतात. त्यात १) निरीक्षण २) संरचना ३) प्रश्न ४) संयोजन ५) सामान्यीकरण ६) गृहीत प्रमेय ७) पुनर्मूल्यांकन ८) निष्कर्ष या गोष्टी अपरिहार्य आहेत. म्हणजे सामान्यपणे निरीक्षण, अनुमान, प्रयोग व निष्कर्ष हे ते प्रमुख टप्पे होत. कारणे व परिणाम शोधण्यासाठी विज्ञानाच्या अनेक शाखा अनुभवाधिष्ठित अवस्थेतून गेलेल्या आहेत. जेव्हा त्या शाखांचे मूळ नियम हे प्राथमिक स्वरूपातसुद्धा निश्चित केले नव्हते त्यावेळी प्रयोगातून व निरीक्षणातून दिसून येणाऱ्या अनुभवातून हे शोधण्याचे काम सुरू होते. हे प्रयोग पुन:पुन्हा व वेगवेगळया व्यक्तींद्वारा केले जात. त्यातून काही आकृतिबंध तयार होई व त्यावरून त्याच्या मुळाशी असलेले नियम शोधले जात. फलज्योतिषात तपासता येतील असे नि:संदिग्ध नियम नाहीत. सर्वांचा साकल्याने विचार म्हणता म्हणता त्या नियमांना अर्थ राहत नाही.
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ कै.वि.म.दांडेकर हे फलज्योतिषात रस असणारे परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरणारे. कै.डॉ.वि.म.दांडेकर यांनी ३०० घटस्फोटित युगुलांच्या कुंडल्या संगणकाच्या व ज्योतिष्यांच्या मदतीने अभ्यासल्या. या अभ्यासात त्यांना फलज्योतिषीय नियमांचे लक्षणीय सातत्य कोठेच आढळले नाही. (पहा:-आजचा सुधारक, मार्च १९९९, पत्रलेखिका – कुमुदिनी दांडेकर) पत्रलेखिकेने असे म्हटले आहे की, ज्या समंजस वाटणाऱ्या ज्योतिष्याच्या मदतीने त्यांनी हा अभ्यास केला त्यालाही ही गोष्ट कबूल करावी लागली. यावरून हे लक्षात येईल की फलज्योतिष म्हणजे अंदाजपंचे दाहोदरसे अशा तऱ्हेच्या नियमांचा व ठोकताळ्यांचा एक संग्रह आहे. त्यांचा अनुभव येणे, न येणे ही योगायोगाची बाब आहे. साप्ताहिक सकाळ ता. ८ जुलै १९८९ च्या भविष्य विशेषांकात ते म्हणतात, ”शंभर मतिमंद मुलांच्या कुंडल्या व शंभर सर्वसामान्य मुलांच्या कुंडल्या घेतल्या तर त्यात फलज्योतिषाच्या काही योगांबाबत तरी फरक दिसावयास हवा. तसेच शंभर घटस्फोटितांच्या पत्रिकांमध्ये काही योग प्रामुख्याने दिसावयास हवे. पण माझ्याजवळ ज्या कुंडल्या गोळा झाल्या त्यावरून तरी हा फरक दिसून येत नाही.” भारत इतिहास संशोधन मंडळातील ज्योतिष्यांच्या कार्यक्रमातील भाषणात त्यांनी म्हटले, ”जर शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम असतील तर तो नियम कसला?”
फलज्योतिषातील शास्त्रत्व तपासण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर संशोधन करून या वादाचा निर्णय लावता येईल अशी आशा पुष्कळ बुद्धिवादी लोकांना वाटते. परंतु हे शास्त्र अशा संशोधनासाठी निरुपयोगी आहे असे आम्हास वाटते. याची कारणे:-
१) या शास्त्रातल्या फलित दर्शवणाऱ्या मापदंडांची संख्या अगणित बनत जाते. शिवाय पूर्वसंचितासारखे अज्ञेय मापदंड त्यात आहेत.
२)
ग्रहस्थितीची तंतोतंत पुनरावृत्ती कधीच होत नसते. त्यामुळे पुन:प्रत्यय
घेणे शक्य नसते. म्हणजे हे संशोधन प्रत्यक्षात आणणे शक्य नाही.
३) सौख्य
व स्वभावविश्लेषण या गुळमुळीत अथवा सापेक्ष बाबींमध्ये प्रायोगिक
तत्त्वावर संशोधन कसे आणणार? त्यासाठी नि:संदिग्ध बाबी घेतल्या
पाहिजेत. उदाहरणार्थ, मृत्यू, मोठे आजारपण, मोठा अपघात, शारीरिक
व्यंग, इत्यादी.
४) पुरेशी विदा मिळणं व्यक्तिगत पातळीवर शक्य होत नाही.
वि.म.दांडेकरांनी संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढण्याइतपत विदा मिळाली नाही
असे सांगितले होते. परदेशात पुन:पुन्हा प्रायोगिक तत्त्वावर संशोधने केली
गेली. पण त्यातून फारसे काही हाती आले नाही. फलज्योतिषाचे समर्थन
करणाऱ्यांविरुद्ध ते निष्कर्ष गेले की ते संशोधनात त्रुटी काढतात. प्रचलित
फलज्योतिष, शास्त्र म्हणून सिद्ध होण्यास गोकॅलीनच्या संशोधनाचा काहीही
उपयोग झाला नाही.
त्यानंतरही अनेक फलज्योतिषी व संशोधक यांच्यात बऱ्याच चर्चा झाल्या. प्रयोगही झाले. हे प्रयोग कुठल्याही भाकितांशी संबंधित नव्हते. कारण संशोधनासाठी घेतलेले पाश्चात्य फलज्योतिष हे भाकितांशी संबंधित नसतेच. ते स्वभावविश्लेषण, प्रवृत्ती, नैसर्गिक कल वा पिंड यांचा पत्रिकेशी परस्परसंबंध या अनुषंगाने असते. अगदी अलिकडे गॅरी फिलिप्सन या ब्रिटीश पत्रकाराने लिहिलेल्या ‘अॅस्ट्रॉलॉजी इन द इयर झीरो` या सप्टेम्बर २००० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. डेनिस एल्वेल या ब्रिटिश ज्योतिष्याने भले थोरले लेख लिहून प्रतिवाद केले. त्याचे खंडन ज्योतिष चिकित्सक जॉफ्रे डीन, प्रो. इव्हान केलि, आर्थर माथर व रुडॉल्फ स्मिट यांनी केले. अखेर हा वाद जानेवारी २००२ मध्ये संपला. तपासता येईल असे कुठलेही परीक्षण सुचवण्यास डेनिस असमर्थ ठरला. त्याच्या मते जातकाचे समाधान हे महत्त्वाचेच; तसेच ग्रहयोगाचाहीसाकल्याने विचार झाला पाहिजे. अशी सर्वसमावेशक संख्याशास्त्रीय चाचणी घेणे संशोधकांना अशक्य आहे. म्हणजे पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती.
लोकांना अनुभव येतो म्हणूनच हे शास्त्र टिकले ना? नाहीतर ते एक निरुपयोगी शास्त्र म्हणून फेकले गेले नसते का? हा युक्तिवाद नेहमी केला जातो.
संभाव्यताशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ प्रॉबेबिलिटी. याचा मोठा उपयोग भाकिते वर्तवणाऱ्यांना होतो. याचे नित्य परिचयातले उदाहरण म्हणजे मुलगा होईल की मुलगी होईल याचे भाकीत. ते भाकीत पन्नास टक्के बरोबर येणारच असते, पण सामान्य लोक मात्र भाकीत बरोबर ठरल्याचे श्रेय ज्योतिष्याला देतात. असे संभवनीयतेचे कितीतरी अनुभव तुमच्या दैनंदिन जीवनात येत असतात. उदा. तुम्ही एखाद्याची आठवण काढायला आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटायला किंवा फोन यायला, तुम्ही एखादे गाणे गुणगुणायला आणि नेमके तेच गाणे रेडिओवर लागायला. एखाद्या घटनेची भीती व्यक्त करायला व ती घटना घडायला एकच वेळ येते. पण हीच संभवनीयता जर ज्योतिष्याकडून व्यक्त झाली आणि त्याप्रमाणे घटना घडली तर मात्र ते प्रत्यंतर वा प्रचिती. या संभवनीयतेविषयी दीड हजार वर्षांपूर्वी भट्ट नारायण लिखित ‘वेणीसंहार` नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ते म्हणजे-
ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम् ।
फलन्ति काकतालीयं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।।
अर्थ :- ग्रहांच्या गती, स्वप्न, शकुन, नवस हे काकतालीय न्यायाने फळतात. शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत.
भविष्यात काय वाढून ठेवलेले आहे ते जाणून घेण्याची उत्कंठा प्रत्येकालाच असते. ती उत्कंठा भागवणारा कुणीही माणूस दिसला की लोक त्याच्यामागे लागतात. समजा, तुम्हाला हस्तरेषांतले काहीही कळत नाही, तरी पण तसा आव आणून व थोडी हुषारी वापरून तुम्ही जरा थापा मारायला सुरुवात करा. लगेच तुमच्या परिचयातले लोक, मुलं, मुलीसुद्धा हात पुढे करतील, याचा अनुभव घेऊन पहा! तुम्हाला ज्योतिषातले थोडेफार कळते एवढा सुगावा लागायचाच अवकाश की तुमच्या आप्त परिवारातले लोक तुम्हाला आपले भविष्य सांगायचा आग्रह धरतात की नाही ते पहा. एवढे लांब कशाला, पेपरात येणाऱ्या राशिभविष्याचा तुमचा स्वत:चा काय अनुभव आहे त्याचा विचार करा.
त्या भविष्यात काही अर्थ नसतो हे ठाऊक असूनही तुम्ही अधूनमधून का होईना पण तुमच्या राशीचे भविष्य वाचताच ना! “राशीचक्र”चा प्रयोग पाहून आलेल्या प्रेक्षकांना त्यांचे मत विचारा, “करमणूक भरपूर झाली”, “राशींची वर्णने काही पटली, काही नाहीत” असेही म्हणतील, तरीपण प्रयोगाची लोकप्रियता काही कमी व्हायची नाही!
हे शास्त्र जर भ्रामक असेल तर त्याचे अनुभव लोकांना कसे येतात? या शंकेचे उत्तर असे आहे की, नरबळी देणे, चेटूक, जारणमारण, भूत काढणे, शुभ-अशुभ, शकुन-अपशकुन, जट येणे, गणपती दूध प्याला, भानामती अशा कितीतरी वेडगळ अंधश्रद्धांचे अनुभव लोकांना येत असतात म्हणून तर त्या आजवर टिकून राहिलेल्या आहेत. फलज्योतिषाचेही असेच अनुभव लोकांना येत असतात, पण त्या अनुभवांच्यामुळे हे खरे शास्त्र आहे असे सिद्ध होत नाही. वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन शक्यतेच्या आधारे वर्तवलेली ‘भाकिते` वेगळी व फलज्योतिषाच्या आधाराने वर्तवलेली ‘भाकिते’ वेगळी, पण दोन्हींची गल्लत लोक करतात. भाकिते खरी ठरली तरी त्यामागचा कार्यकारणभाव न तपासताच खरी ठरलेली भाकिते जणू काही ज्योतिषाचा वस्तुनिष्ठ पुरावा म्हणून गणले जाते. आता हे भाकीत पहा:- “तुमच्या मुलाला लवकरच नोकरी लागेल व ती यंत्राशी संबंधित असेल.” आता कुठेही नोकरी लागली तरी या यंत्रयुगात यंत्राशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येतोच. खऱ्या ठरलेल्या भाकितांची यादी जशी देता येते तशी खोट्या ठरलेल्या भाकितांची यादी पण देता येते. चुकलेली भाकिते लोक विसरून जातात पण खरी झालेली भाकिते मात्र पक्की लक्षात ठेवतात. अशा अनेक कारणांमुळे फलज्योतिषाला एक फसवी प्रतिष्ठा लाभते.
जे का रंजले गांजले …!
सतत प्रतिकूल
परिस्थितीशी झगडता झगडता मेटाकुटीस आलेल्या माणसाला कुणीतरी धीर देणारा
माणूस हवा असतो. ज्योतिषी ती गरज भागवतो. अमुक अनिष्ट ग्रहाची दशा दोन
महिन्यांनी संपून तमुक शुभ ग्रहाची दशा सुरू होईल, असे काहीतरी
ज्योतिष्याच्या तोंडून ऐकले म्हणजे त्या बिचाऱ्याला हुरूप येतो. ज्योतिषी
त्याला काहीतरी दैवी उपाय करायला सुचवतो, त्याचा तरी निदान उपयोग होईल अशी
आशा त्याला वाटते.
माणसाच्या स्वभावाची एक गंमत आहे. देव नवसाला पावला तर ती देवाची कृपा, नाही पावला तर आपलेच नशीब वाईट, असे स्वत:चे समाधान माणूस सहज करून घेतो. ज्योतिषाचे तसेच असते. एखादे चांगले भाकीत बरोबर ठरले की ती ज्योतिषशास्त्राची किमया, खोटे ठरले तर तुमचे नशीबच फुटके! चुकलेली दहावीस भाकिते कुणाला आठवायची नाहीत, पण एक बरोबर ठरलेले भाकीत मात्र लोकांच्या लक्षात पक्के राहते, आणि त्याची तोंडोतोंडी प्रसिद्धी होत जाते. चुकला तर, ज्योतिषी चुकला कारण तो माणूस आहे. त्याच्या ज्ञानाला मर्यादा आहेत. पण बरोबर आलं तर, फलज्योतिष बरोबर आलं. ही मानसिकता ज्योतिष्यांनीच रुजविली आहे.
फलाण्या थोर माणसाने आपल्या मृत्यूचा दिवस कुंडलीवरून आधीच वर्तवून ठेवला होता, आणि बरोबर त्याच दिवशी त्याला मृत्यू आला, असे किस्से अनेकदा ऐकायला मिळतात. ज्याला आपल्या मरणाचा दिवस किंवा वेळ आधीच अचूक कळली तो माणूस थोर, अशी समजूत प्रचलित आहे. ते किस्से खरे असतील तर त्याचा अर्थ असा होतो की कुंडलीवरून मृत्यूची तारीख बरोबर सांगता येते. तसे असेल तर मेलेल्या माणसांच्या पाच-दहा कुंडल्या ज्योतिष्याला दिल्या तर निदान एका तरी कुंडलीवरून त्या माणसाच्या मृत्यूची तारीख बरोबर सांगता यायला पाहिजे, पण तसे होत नाही. हा तिढा टाकल्यावर ज्योतिषी कबूल करतात की कुंडलीवरून मृत्यू अचूकपणे वर्तवता येत नाही, पण मृत्यूची शक्यता मात्र वर्तवता येते! ‘शक्यता` या शब्दाच्या प्रांतात एकदा शिरल्यावर मूळ प्रश्नाला अनेक फाटे फुटतात, आणि त्यात उत्तर हरवून जाते. सांगायचा मुद्दा हा की, मृत्यूची अचूक भाकिते कुंडलीवरून वर्तवल्याच्या कथा कर्णोपकर्णी पसरत जातात, पण त्यांची शहानिशा करणे दुरापास्त असते. लोकांना मात्र वाटत राहते की ज्योतिष किती महान शास्त्र आहे! थोडक्यात संभवनीयतेनुसार खरी ठरलेली भाकिते आणि जातकाला मिळालेले मानसिक समाधान वा आधार यालाच तो ‘अनुभव` म्हणतो.
4 comments:
तुम्ही फक्त गोचरीचा गुरु अष्टमात आलेला अरताना, काय शारिरिक, मानसिक आणि बौद्धिक पीडा होतात, याचा फक्त अनुभव घ्या आणि मग लेख लिहा.
दुसरं म्हणजे, भुत, भानामती आणि जारणमारण (चेटुक) यांचे उल्लेख संतचरित्रात आहेत. उदा. गजानन विजय.
गोचरीचा गुरु अष्टमात येणे हे राशीनुसार बारा प्रकारात विभागता येते. गोचरीचा गुरु धनु वा मीन राशीचा असेल तर अशा बौद्धिक वा मानसिक पीडा होत नाहीत असे मानणाराही ज्योतिष वर्ग आहेच.
म्हणजे जातकाला पीडा होतात, हे तुम्ही मान्य करता! एखाद्याच्या अष्टमात मकरेचा गुरु आला किंवा मेषेचा शनि आला तर त्या माणसाचे काय होत असेल, याचा विचार करा आणि त्याने काय करायचं हे ही सांगा मग !!!
https://some-questions-some-answers.blogspot.com/2024/02/the-synthesis-of-indian-philosophy-in.html?m=1
Post a Comment