* विवाहासाठी मानसशास्त्रीय चाचणी बाबत आवाहन*
वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे ज्योतिषकीय निकषांवर पहाणे म्हणजे गुणमेलन. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली. फलज्योतिष हा श्रद्धेचा भाग आहे त्याला आधुनिक विज्ञानाच्या निकषांचा आधार नाही. पण जवळपास ९० टक्के लोक विवाहाच्या वेळी पत्रिका पहातात असे आढळून आले आहे. एक प्रथितयश ज्योतिषी श्री.श्री. भट हे आपल्या 'ज्योतिषाच्या गाभाऱ्यात` या पुस्तकात म्हणतात, '' विवाह पहाताना ठरविताना पत्रिका पाहणार नाही असा प्रचार केला जातो. तरुणांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. वैवाहिक जोडीदार कोण असणार हे अटळ प्रारब्ध असते त्यात ज्योतिष हे निमित्त असते. `` तर दुसरे मान्यवर ज्योतिषी श्री. व.दा.भट 'भाग्य` दिवाळी ९७ च्या अंकात म्हणतात, '' मी स्वत: ज्योतिषी असलो तरी एक गोष्ट प्रांजलपणे कबूल केली पाहिजे की वधूवरांची कुंडली जुळते अगर जुळत नाही या बद्दल हमखास अनुभवास येतील असे, ज्यावर पूर्ण विसंबून रहावे असे कोणतेही नियम नाहीत. पत्रिका जुळते अगर जुळत नाही या शब्दांना वास्तविक अर्थ नाही.
मग विवाहासारखा आयुष्यातील एक मोठा निर्णय घेताना वधूवरांची व्यक्तिमत्वे परस्परांशी पूरक आहेत की नाहीत हे आधुनिक विज्ञानाच्या आधारे कसे ठरवायचे? विवाहपूर्व वैद्यकीय तपासणी करुन काही शारिरिक बाबी समजू शकतात पण मानसिक पिंड/ प्रकृती समजण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांची मदत होउ शकते. वैवाहिक आयुष्याचा दीर्घ काळ असलेल्या टप्प्यात व्यक्तिमत्वांमधे बदल होणे ही स्वाभाविक असते. ते बदल जर परस्परांना पूरक राहिले नाहीत तर मग सहजीवन अवघड बनत जाते. मग गुणमेलनाला सक्षम पर्याय म्हणुन वधूवरांसाठी / विवाहेच्छुक स्त्री पुरुषांसाठी कोणती मानसशास्त्रीय चाचणी विकसित करावी? अशा प्रश्नांवर मला सामाजिक जाणीवा असलेल्या मानसतज्ञांची वेळोवेळी मदत हवी आहे. मानसतज्ञ म्हणजे मुख्यत्वे कौन्सिलर, सायकॉलॉजिस्ट व सायकियाट्रिस्ट, मानसशास्त्राचे प्राध्यापक. कृपया आपल्यापैकी कुणी वा परिचितांमधे कुणी मानसतज्ञ असल्यास कुठलाही पूर्वग्रह वा संकोच न बाळगता माझ्याशी इन बॉक्स, ईमेल वा थेट संपर्क करण्यास विनंती आहे.
प्रकाश घाटपांडे, डहाणुकर कॉलनी, कोथरुड, पुणे
E-mail:- prakash.ghatpande@gmail.com