Wednesday, May 09, 2007

पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा...जयंत नारळीकर

सप्टेंबर-ऑक्‍टोबर १९७५ मधली गोष्ट. "द ह्यूमनिस्ट' नावाच्या अमेरिकेतील नियतकालिकात १८६ विख्यात शास्त्रज्ञांच्या सहीचे एक पत्रक प्रसिद्ध झाले. मानव जीवनावर ग्रहताऱ्यांच्या प्रभाव पडतो, ही कल्पना त्या पत्रकात स्पष्ट शब्दांत खोडून काढली होती. त्यातील काही मोजके उतारे पहा- ........"मानवाच्या जन्माच्या वेळी ग्रह-ताऱ्यांची स्थिती त्याच्या भवितव्यास आकार देते, ही कल्पना निव्वळ चुकीची आहे. दूरच्या ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे ठराविक उपक्रमांसाठी अमुक वेळ शुभ वा अशुभ असते किंवा एका राशीच्या लोकांचे विशिष्ट राशींच्या लोकांशी जुळणे वा न जुळणे हे सत्य नाही... आजकालच्या अनिश्‍चित वातावरणात पुष्कळांना महत्त्वाचे निर्णय घेताना मार्गदर्शनाची गरज भासते. म्हणून त्यांना वाटते, की त्यांचे भवितव्य त्यांच्या नियंत्रणापलीकडे तारकांच्या प्रभावाखाली ठरते; पण आपण सर्वांनी जगातल्या वास्तवाला तोंड देणे आवश्‍यक आहे; आपल्याला याची जाणीव बाळगायला पाहिजे, की आपली भविष्ये आपल्या हातात आहेत, तारकांच्या नाही.'
पत्रकावर सही करणारे विविध विषयांतले शास्त्रज्ञ होते. त्यांत नोबेल पारितोषिकविजेतेही होते. ही मंडळी सहसा एका व्यासपीठावर दिसत नाही; पण वरील पत्रकासाठी एकत्र येणे त्यांना आवश्‍यक वाटले, ही गोष्ट महत्त्वाची.
आपण जर एखादे पाश्‍चात्त्य वृत्तपत्र पाहिले, तर त्यात तारका-भविष्याला वाहिलेला कॉलम असतो; परंतु युरोप आणि अमेरिकेत दीर्घ काल वास्तव्य केल्यानंतर मी असे म्हणू शकतो, की अशा प्रकारच्या फलज्योतिषी रकान्यांत रस घेणारे वाचक असले तरी त्यावर विश्‍वास ठेवणारे थोडे-थोडकेच असतील. कुंडल्या जुळवून लग्न ठरवणे, चांगला मुहूर्त पाहून नव्या घरात प्रवेश करणे किंवा प्रस्थान ठेवून प्रवासाला निघणे, आदी वैयक्तिक जीवनातल्या क्रिया जशा भारतात मोठ्या प्रमाणात दिसतात, तशा या देशांत दिसत नाहीत. सार्वजनिक जीवनातदेखील मुहूर्त पाहून नव्या मंत्रिमंडळाला शपथ देणे, नवीन राज्याची सुरवात करणे, पंतप्रधान झाल्यावर शासकीय निवासात गृहप्रवेश करणे, अशा गोष्टींचा सुळसुळाट मी फक्त भारतात पाहिला. मला वाटते, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात फलज्योतिषाच्या नादी लागलेला भारत हा एकमेव मोठा देश असावा.
मला या नादाचा फायदा कसा झाला, ते सांगतो! काही वर्षांपूर्वी माझ्या कॉलेजला जाणाऱ्या कन्येला स्कूटी घ्यायची होती. तिला घेऊन तिची आई स्कूटीच्या दुकानात गेली, तेव्हा कळले, की "वेटिंग लिस्ट' असल्याने दोन-तीन आठवडे थांबावे लागेल; पण तिथे बऱ्याच स्कूटी रांगेत उभ्या केलेल्या दिसल्या. ""इतक्‍या स्कूटी इथे असताना वेटिंग लिस्ट कशी?'' माझ्या पत्नीने विचारले. ""त्या "बुक' झाल्यात; पण कालपासून पितृपक्ष चालू झाल्यामुळे तो संपेपर्यंत त्या उचलल्या जाणार नाहीत.'' दुकानदार म्हणाला. ""मग आम्ही आज यातली एक विकत नेली तर तुम्ही तिच्याऐवजी एक पुढच्या १०-१२ दिवसांत आणून ठेवू शकता!'' माझी कन्या म्हणाली. ""आमची तयारी आहे,'' दुकानदार म्हणाला. ""पण पितृपंधरवड्यात अशी खरेदी करायला तुमची तयारी आहे?'' दुकानदाराने मुलीऐवजी आईला विचारले. तिने अनुमोदन दिले आणि स्कूटीचे पैसे भरून ती विकत आणली. अर्थात या "धाडसी' कारवाईमुळे आम्हाला आकाशातल्या कोणाचा कोप सहन करावा लागला नाही.
"फलज्योतिष हे विज्ञान आहे का?' हा प्रश्‍न मला पुष्कळदा विचारला जातो. त्यापाठोपाठ अशी टीकाही ऐकायला मिळते, की फलज्योतिषाचा अभ्यास व तपासणी न करता शास्त्रज्ञ त्याला "अवैज्ञानिक' ठरवून मोकळे होतात. वस्तुस्थिती वेगळी आहे. विज्ञानाचा किताब मिळवायला त्या विषयाला काही पथ्ये पाळावी लागतात. त्या विषयाची मूळ गृहीतके स्पष्ट मांडावी लागतात. त्यांच्यावर आधारलेला डोलारा कसा उभा केला जातो, ती कार्यपद्धती निःसंदिग्धपणे मांडायला हवी व शेवटी प्रत्यक्ष निरीक्षणातून खरे, खोटे तपासता येईल, असे भाकीत करावे लागते. भाकीत खरे ठरले का खोटे, हे तपासण्याचे संख्याशास्त्राचे नियम आहेत. उदाहरणार्थ, नाणेफेकीत "हेड' वर, का "टेल' वर, हे बरोबर भाकीत करता येते, हा दावा तपासून पाहायला एका नाणेफेकीने ठरवणे योग्य होणार नाही... शंभर वेळा नाणे फेकून आलेल्या निष्कर्षांना संख्याशास्त्राचे निकष लावून ठरवावे. कुंडल्या जुळवून केलेले विवाह कुंडल्या न जुळणाऱ्या असताना केलेल्या विवाहांपेक्षा अधिक यशस्वी, सुखी असतात का, हे तपासायला शेकडो जोडप्यांचे सॅम्पल तपासायला पाहिजे. अमेरिकेत अशा तऱ्हेने केलेल्या चाचणीत कुंडली जुळणे-न जुळणे याचा, विवाह सुखी होईल- न होईल याच्याशी काहीही संबंध नाही, असे आढळून आले.
फलज्योतिषाची कार्यपद्धती, मूळ गृहीतके आणि भाकिते यांबद्दल त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांत एकवाक्‍यता नसल्याचे दिसून येते. एकदा मी काही प्रख्यात फलज्योतिषांनी तत्कालीन राजकारण्यांबद्दल केलेल्या चुकीच्या भाकितांचा गोषवारा एका चर्चेत मांडला असता, येथील फलज्योतिषी म्हणाले, की भाकीत चुकले, कारण ते चांगले फलज्योतिषी नसावेत. अशा वेळी मला भारतीय क्रिकेट टीमच्या पराजयानंतर टीकाकारांच्या सल्ल्यांची आठवण होते. त्यांच्या मते, ज्यांना खेळवले गेले नाही, त्यांना घेतले असते तर निकाल वेगळा झाला असता.
पुष्कळदा फलज्योतिषाचे उदात्तीकरण करायला त्याचा संबंध वेदांशी जोडण्यात येतो; पण जन्मकुंडली मांडणे, जन्मवेळेच्या ग्रहांची स्थिती मानवाचे भवितव्य ठरवते, ही कल्पना हे सर्व वेदातले नसून, ग्रीक-बॅबिलोनियन प्रभावाखाली भारतात आले, असा इतिहास आहे. सूर्यसिद्धान्तातला एक श्‍लोक त्या बाबतीत बोलका आहे. त्यात सूर्यदेव मयासुराला सांगतो ः "तुला या विषयाची (फलज्योतिष) सविस्तर माहिती हवी असेल तर रोमला (म्हणजे ग्रीक-रोमन प्रदेशात) जा. तेथे मी यवनाच्या रूपात ही माहिती देईन.' "यवन' शब्दाचा वापर परदेशी, बहुधा ग्रीक, अशा अर्थी होतो. म्हणजे आपली ही अंधश्रद्धा मूळ भारतीय नसून "इंपोर्टेड' आहे!
खुद्द ग्रीकांमध्ये ही अंधश्रद्धा कशी आली? आकाशातल्या तारकांचे अनेक वर्षे निरीक्षण केल्यावर त्यांना आढळून आले, की आकाशातल्या तारामंडळाच्या पार्श्‍वभूमीवर काही तारका अनियमितपणे मागे-पुढे जात आहेत. त्यांच्या या स्वैरगतीमुळे ग्रीकांनी त्या तारकांना "प्लॅनेट' म्हणजे "भटके' हे नाव दिले. त्यांच्यापैकी वैज्ञानिक वृत्तीच्या लोकांनी या स्वैरगतीमागे काहीतरी नियम असेल, तो शोधायचा प्रयत्न केला; पण बहुसंख्य लोकांनी या स्वैर फिरण्याचा अर्थ "या भटक्‍यांमध्ये काही तरी खास शक्ती आहे ज्यामुळे ते मनमाने फिरतात,' असा लावला. त्यातून पुढे जाऊन असाही समज करून घेतला, की हे ग्रह आपल्या शक्तीचा वापर मानवाचे भवितव्य ठरवण्यात करतात.
पण कालांतराने ग्रह असे का फिरतात, याचे उत्तर विज्ञानाने दिले. ऍरिस्टार्कस, आर्यभट, कोपर्निकस, गॅलिलिओ, केप्लर, न्यूटन अशा मालिकेतून अखेर गुरुत्वाकर्षण हे मूलभूत बळ ग्रहांना सूर्याभोवती फिरवत ठेवते, हे सिद्ध झाले. म्हणजे ग्रह स्वेच्छाचारी नसून, सूर्याभोवती फिरायला बांधले गेलेत. अशा तऱ्हेने विज्ञानाने फलज्योतिषाच्या मुळाशी असलेला भ्रमाचा भोपळाच फोडला. आज अंतराळ युगाला प्रारंभ होऊन अर्धशतक उलटले. मानवाने चंद्रावर पदार्पण केले. मंगळावर याने उतरवली. इतर ग्रहांजवळ अंतराळयाने पाठवून त्यांचे जवळून दर्शन घेतले. दर वेळी गणिताबरहुकूम यान प्रवास करते. नियोजित ग्रहाजवळ नियोजित वेळी जाते. यानातली दूरसंचार यंत्रणा ठरल्याप्रमाणे चालते. यावरून मानवाची कर्तबगारी तर दिसतेच; पण त्याचबरोबर ग्रहांच्या गतीमागे कसलेही रहस्य राहिले नाही, याचीदेखील कल्पना येते. ही कर्तबगारी दाखवणारा मानव पराधीन खचित नाही.
ही विज्ञानाची प्रगती विचारात घेतल्यावर आजही जेव्हा मला एखादा शिकलेला माणूस विचारतो, की ग्रहांचे मानवजीवनावर परिणाम होतात का, तेव्हा मला आश्‍चर्य आणि खेद, दोन्ही अनुभवायला मिळतात. आश्‍चर्य यासाठी, की एकविसाव्या शतकातला मानव हा प्रश्‍न विचारतोय. खेद यासाठी, की विचारणारा भारतीय आहे.
- जयंत नारळीकर (लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

1 comment:

shriganesha said...

dear jayant narlikar sir,
you have written the half truth
you will have to learn the concepts
in astrology thoroughly & then comment.what you are talking about
science is also not complete .The
concepts which you discover through
scientific research are ever changing .The facts discovered 50 years back you find them absurd today.astrology is 4000 years old
there the facts & figures should
be studied,research should be done