Sunday, October 11, 2009

फलज्योतिष विद्येवर शोध किरण

फलज्योतिष - विद्येवर शोध किरण 

फलज्योतिष विद्येवर शोध किरण या पुस्तिकेच्या नावावरुन जर कुणाचा असा समज झाला असेल कि हे पुस्तक आपल्याला फलज्योतिष शिकण्यास उपयुक्त आहे तर तो गैरसमज आहे. या पुस्तिकेचा उद्देश हा मनोरंजन किंवा फलज्योतिष शिकवणे असा नसून सामान्य लोकांची तर्कबुद्धी जागृत करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. मनुष्याची बुद्धी मूलत: चिकित्सक असली तरी फलज्योतिषाच्या गूढ वलया भोवती लोप पावते.एवढे लोक विश्वास ठेवतात म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे म्हणुन आपणही विश्वास ठेवलेला बरा अशी जी मनोवृत्ती आहे त्याची लेखकाला खंत वाटते.नाडी या प्रकरणाचे शास्त्रीय स्पष्टीकरण जे लोक देउ शकत नाहीत ते लोक एकनाड आहे तर संतती होणार नाही असे बिनधास्त ठोकून देतात.त्यामुळे चांगली अनुरुप असलेली स्थळे हातची
घालवावी लागतात या गोष्टी ची चीड येउन लेखकाने त्याला पायबंद घालण्याच्या दृष्टीकोनातून ही पुस्तिका लिहिली आहे.

प्रथम फलज्योतिषाची मूलग्राही चिकित्सा केली आहे. यामधे गृहीत तत्वे म्हणुन मानलेले चार मुद्दे यांची चिकित्सा केली आहे. ते मुद्दे म्हणजे
१) नक्षत्र व राशी यांच्या नावाने ओळखले जाणारे अंतरिक्षाचे प्रदेश आणी सूर्याभोवतीचे ग्रह या सर्वांचे पृथ्वीशी अन्योन्य स्वरुपाचे संबंध आहेत.
२) हे संबंध गूढ स्वरुपाचे असून ते फक्त अतिंद्रिय ज्ञानाने आकलन होउ शकतात. सामान्य बुद्धीला ते अगम्य आहेत.
३) हे गूढ संबंध भूतलावर घडणार्‍या विविध घटनांच्या योगे  माणसाच्या प्रत्ययाला येतात.
४) हे संबंध कसे व केव्हा प्रत्ययाला येतील हे जाणुन घेणे फलज्योतिष विद्येच्या सहाय्याने जाणत्या माणसाला शक्य आहे.
इतरही अनेक मुद्दे यात चर्चिले आहेत. यामधे गूढ विद्या कि विज्ञानमान्य शास्त्र? ग्रहणांमुळे भूकंपादि घटना घडतात? गुढ संदेश उलगडणारी गुरुकिल्ली कुडली याचे प्रत्यंतर किंवा प्रचिती फसवी असू शकते का? जन्मवेळेची चिकित्सा ग्रहांचे प्रकार या सर्व गोष्टी सर्वसाधारण उदाहरणे देउन सांगितल्या आहेत.डॊ भा.नी पुरंदरे यांनी जुळ्या मुलांच्या गुणधर्मात त्यांना फरक जाणवला त्याचे कारण म्हणजे जन्मवेळेतल्या अंतरामधे बदललेले नक्षत्र. या विधानाची लेखकाने शास्त्रीय पातळीवर चिकित्सा केली आहे. डॊ पुरंदरे त्यांच्या विषयातील तज्ञ होते असे गृहीत धरुन ही त्यांचे विधान खोडून काढले आहे
परिशिष्ट मधे फलज्योतिषातील ग्रह व राशी यांच्या मालकीसाठी गमतीशीर आकडेवारीतील सुसूत्रता,महादशा प्रकरणातील त्याची क्रमवारी,नाडी प्रकरणातील रचना या गोष्टी मांडल्या आहेत.नवीन अभ्यासकाला ही गोष्ट महत्वाची वाटेल.जागृत झालेल्या तर्कबुद्धीवर विचार करुन फलज्योतिषावर कितपत विश्वास ठेवायचा? याचा निर्णय लेखकाने वाचकांवर सोपवला आहे. फलज्योतिषाने मरणाचे भविष्य एका माणसाला सांगितल्याने त्याची वेड्यासारखी मनस्थिती झाली होती, त्या माणसाला या पुस्तिकेने खूप दिलासा दिला.

लेखक व प्रकाश- कै. माधव रिसबूड २१०१ सदाशिव पेठ पुणे ३०
प्रकाशन काल- १९८६
मूल्य - तीन रुपये
पृष्ठे -२८
 

No comments: