* विवाहासाठी मानसशास्त्रीय चाचणी बाबत आवाहन*
वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे ज्योतिषकीय निकषांवर पहाणे म्हणजे गुणमेलन. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली. फलज्योतिष हा श्रद्धेचा भाग आहे त्याला आधुनिक विज्ञानाच्या निकषांचा आधार नाही. पण जवळपास ९० टक्के लोक विवाहाच्या वेळी पत्रिका पहातात असे आढळून आले आहे. एक प्रथितयश ज्योतिषी श्री.श्री. भट हे आपल्या 'ज्योतिषाच्या गाभाऱ्यात` या पुस्तकात म्हणतात, '' विवाह पहाताना ठरविताना पत्रिका पाहणार नाही असा प्रचार केला जातो. तरुणांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. वैवाहिक जोडीदार कोण असणार हे अटळ प्रारब्ध असते त्यात ज्योतिष हे निमित्त असते. `` तर दुसरे मान्यवर ज्योतिषी श्री. व.दा.भट 'भाग्य` दिवाळी ९७ च्या अंकात म्हणतात, '' मी स्वत: ज्योतिषी असलो तरी एक गोष्ट प्रांजलपणे कबूल केली पाहिजे की वधूवरांची कुंडली जुळते अगर जुळत नाही या बद्दल हमखास अनुभवास येतील असे, ज्यावर पूर्ण विसंबून रहावे असे कोणतेही नियम नाहीत. पत्रिका जुळते अगर जुळत नाही या शब्दांना वास्तविक अर्थ नाही.
मग विवाहासारखा आयुष्यातील एक मोठा निर्णय घेताना वधूवरांची व्यक्तिमत्वे परस्परांशी पूरक आहेत की नाहीत हे आधुनिक विज्ञानाच्या आधारे कसे ठरवायचे? विवाहपूर्व वैद्यकीय तपासणी करुन काही शारिरिक बाबी समजू शकतात पण मानसिक पिंड/ प्रकृती समजण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांची मदत होउ शकते. वैवाहिक आयुष्याचा दीर्घ काळ असलेल्या टप्प्यात व्यक्तिमत्वांमधे बदल होणे ही स्वाभाविक असते. ते बदल जर परस्परांना पूरक राहिले नाहीत तर मग सहजीवन अवघड बनत जाते. मग गुणमेलनाला सक्षम पर्याय म्हणुन वधूवरांसाठी / विवाहेच्छुक स्त्री पुरुषांसाठी कोणती मानसशास्त्रीय चाचणी विकसित करावी? अशा प्रश्नांवर मला सामाजिक जाणीवा असलेल्या मानसतज्ञांची वेळोवेळी मदत हवी आहे. मानसतज्ञ म्हणजे मुख्यत्वे कौन्सिलर, सायकॉलॉजिस्ट व सायकियाट्रिस्ट, मानसशास्त्राचे प्राध्यापक. कृपया आपल्यापैकी कुणी वा परिचितांमधे कुणी मानसतज्ञ असल्यास कुठलाही पूर्वग्रह वा संकोच न बाळगता माझ्याशी इन बॉक्स, ईमेल वा थेट संपर्क करण्यास विनंती आहे.
प्रकाश घाटपांडे, डहाणुकर कॉलनी, कोथरुड, पुणे
E-mail:- prakash.ghatpande@gmail.com
6 comments:
ज्योतिष किंवा वास्तुशास्त्र ही शास्त्रे ही जातकाच्या कुंडलीतील किंवा घरातील शक्ती ( Energy किंवा Power) देवतारुपी शक्तींच्या उपासनेने संतुलित करण्याची उत्तम साधने आहेत. वेगवेगळे ग्रह हे वेगवेगळ्या शक्तीच आहेत. त्यामुळे एखादे तत्वाचे (महाभुत) प्रमाण वाढले असता, त्याच्या विरुध्द तत्वाच्या शक्तीची उपासना करून, तसेच कमी असता उपासनेने ते तत्व वाढवून शक्ती संतुलित केली जाते. त्यामुळे मंत्रजप किंवा दान या अंधश्रद्धा नाही आहेत. जपावर विश्वास बसत नसेल, तर दान देऊन बघा. मंत्र सिद्ध व्हायला विशिष्ट जपसंख्या आवश्यक असते. दानाचा परिणाम मात्र लगेच होतो.उदा. सोमवारचे पर्यायाने चंद्राचे दान म्हणजे दुध/पाणी/तांदूळ (चंद्राचा रंग पांढरा आहे म्हणून) संकल्प करून शंकराच्या देवळात वाहून पाहा. मनस्थितीवर खूप अनुकूल परिणाम होतो तसेच, चंद्र ज्या स्थानाचा स्वामी आहे , ते स्थान म्हणजे कर्क राशीचे स्थान, त्या भावाचे अशुभ फळे कमी होतात आणि नंतर शुभ फळे वृद्धिंगत होतात.मात्र जप किंवा दान या कर्म करण्याला पर्याय नाही आहेत. आपली कर्तव्ये करावीच लागतात.
ज्योतिषशास्त्रात भाकिते वर्तवली जातात, ती एखादी घटना घडेलच असे नाही.परंतु एखादी कृती करण्यासाठी काळ अनुकुल आहे किंवा प्रतिकूल आहे, एवढेच ज्योतिष सांगते. (-श्री. श्री. भट - धनुर्धारी दिवाळी अंक - २०१?). त्यानुसार कर्म करणे आवश्यक आहे. ज्योतिष फक्त ६०%, असे एक पाश्चात्य संशोधन सांगते. थोडा वेळ भविष्याचा मुद्दा बाजुला ठेवला, ती लग्नकुंडलीवरून व्यक्तिमत्त्व विश्लेषण आणि चंद्रकुंडलीवरून मनोविश्र्लेषण उत्तम करता येते. जसे आजकाल प्रत्येक गोष्टीचे (उदा.शिक्षण क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्र) व्यापारीकरण किंबहुना बाजारीकरण झाले आहे, तसेच ज्योतिषशास्त्राचेही झाले आहे, म्हणून ते शास्त्र काही खोटे ठरत नाही. इतर संस्थांचे माहीत नाही, परंतु मी जे काही अल्प स्वलप ज्योतिष डोंबिवलीच्या ' ज्योतिष संशोधन मंडळा'कडून शिकलो आहे, तेथे ज्योतिष हे पंचमहाभूते (आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ) यांचा पाया धरून शिकवले जाई. प्रत्येक पंचमहाभूतांचे काही मूलभूत गुणधर्म असतात आणि प्रत्येक महाभूताचे एकमेकांवर काही परिणाम होत असतात.उदा. आकाश हे सामावुन घेते. ते सर्व राशींमध्ये असते. त्यामुळे त्याची वेगळी राशी नाही. परंतु आकाशतत्वाचा ग्रह मात्र आहे- गुरु. आकाश हे विस्तार पावते. त्यामुळे गुरु हा वाढवतो.उदा.धनस्थानातील गुरु हा धन आणि कुटुंब वाढवतो. आकाश भुतावरून पोकळ्या पाहतात.त्यामुळे शरीरातील सर्वात मोकळी पोकळी म्हणजे छातीवरुन दाखवली जाणारी राशी जी कर्क रास तेथे गुरु उच्च होतो. कर्क राशी चा स्वामी जो चंद्र जो मनाचा कारक आहे, त्या कर्केत गुरु उच्च होतो. गुरु या शब्दाचा अर्थ मोठा होतो.(मनाचा मोठेपणा). मकर राशीत गुरु नीच होतो.गुडघ्यावरून दाखवल्या जाणाऱ्या मकरेत शरिरातील सर्वात लहान पोकळी असते. आकाश शब्द गुण युक्त आहे.त्यामुळे ज्ञानेंद्रिय कान आणि कर्मेंद्रिय वाणी.
वायू चा गुण वाहून नेणे, सेवा देणे.नोकरी ही सेवा वायू तत्वाच्या शनी ग्रहावरून पाहिली जाते. तुळ राशीत शनी उच्च होतो, कारण तेथे फक्त शुक्र साठवूनच ठेवायचा नाही, तर योग्य वेळी बाहेरही काढायचा आहे.शनी हा ग्रह नपुंसक मानला जातो. त्यामुळे त्याला स्वतःला त्या शुक्राचा काहीच उपयोग नाही. अग्नी तत्वाचे रवी आणि मंगळ तो शुक्र खाऊन टाकतील.साडेसातीत संकटांमुळे किंवा अपयशामुळे जीवनातील रस कमी होतो, वैराग्य येते. साडेसाती ही चंद्रराशीला असते. वायूचा गुणधर्म आहे, पाणी (जल-रस) सुकवणे. ज्ञानेंद्रिय त्वचा आणि कर्मेंद्रिय तळहात. शनीचा रंग निळा काळा. म्हणून शनीच्या अनुकुलतेसाठी काही व्यक्ती शनिवारी काळी वस्त्रे परिधान करताना दिसतात. शनीचा रंग काळा आणि तो न्यायाचा कारक म्हणून न्यायालयात काळया वस्त्रांचे प्राबल्य असते. तसेच श्रमजीवी मजुरांना blue collared people म्हणत. दान - तेल. काळे उडीद. शनीची प्रतिकुलता कमी होण्यासाठी शनिवारी तेल व काळे उडीद दान करण्याचा प्रघात आहे . हिवाळ्यात तेलाचे अभ्यंग स्नान करण्यास आयुर्वेद सांगते. थंडपणा व शुष्कता हे वायूचे,(शनीचे) गुण आहेत.त्यावर तेलाचे मर्दन/,ग्रहण व दान हे वैज्ञानिक उपायच आहेत. मकर संक्रांतीला तीळगुळ दान आणि ग्रहण करण्याचे कारण तिळाच्या तेलाने शुष्कता जावी गुळामुळे शरीरात उष्णता वाढावी हेच आहे.
अग्नीतत्वाचे ग्रह रवी (सत्व गुणी)व मंगळ (तमो गुणी).अग्नी तत्वाचा गुण शुद्ध करणे, दाखवणे (रूप गुण), वर वर जाणे (उत्कर्ष साधणे)-अधिकार, तोडणे तसेच अग्नीप्रमाणे कुणाला जवळ न येऊ देणे.रवीचे दान गहू. (रवीचा रंग brown किंवा चॉकलेटी म्हणून. ) नारिंगी रंग सुद्धा. मंगळाचे दान - मसूर किंवा गूळ. गणपतीच्या देवळात वाहणे. मंगळाचा रंग लाल आणि रस तिखट म्हणून एखाद्या गरजुला तिखट पदार्थ/मसाले दान दिला/दिले तरी चालेल. ज्ञानेंद्रिय डोळे व कर्मेंद्रिय तळपाय. पूर्वी डोळ्याची आग होत असता, तळपायावर कांस्याच्या वाटीने मालिश करण्याचा प्रघात होता.
जल तत्वाचे दोन ग्रह चंद्र (सत्व गुणी)आणि शुक्र(रजो गुणी). जलाचे गुण आनंद देणे, शुद्ध करणे, जोडणे. त्यामुळे जल तत्वाच्या राशी तुटू देत नाहीत. ज्ञानेंद्रिय. चंद्र बिघडला असता मनोविकार होतात, आणि त्यावर उपाय म्हणजे शिवोपासना.
पृथ्वीतत्वाचा बुध (गंध गुण युक्त)पृथ्वीचा गुण साठवून ठेवणे, धारण करणे,(उदा. मातीचे मडके) झाकून ठेवणे, संघटन, संकोच.त्यामुळे संकुचित किंवा स्वार्थी मनोवृत्ती.त्यामुळे स्वतःच्याच राशीत बुध उच्च होतो, व सर्वांना सामावुन घेणाऱ्या मीन राशीत तो संकुचित वृत्तीचा बुध नीच होतो.ज्ञानेंद्रिय नाक आणि कर्मेंद्रिय गुदद्वार. बुध वैश्य वर्णाचा म्हणुन व्यापारी. वर्ण हा गुण आणि कर्मावरून ठरतो, जन्मावरून नाही. (चातुर्वर्ण्यम् मया सृष्टम् गुण-कर्म-विभागशः ।
तस्य कर्तारम् अपि माम् विद्धि अकर्तारम् अव्ययम् - भगवद्गीता अध्याय ४ - श्लोक १३). वर्ण म्हणजे जात नव्हे.बुध वरून मेंदू आणि बोलणे पाहतात. त्यामुळे बुध बिघडला असता, मेंदुत आणि वाणीत दोष निर्माण होतो. उपाय विष्णू उपासना.दान - हिरवे मूग, हिरव्या भाज्या (बुधाचा रंग हिरवा म्हणून).
एवढे प्रास्ताविक देण्याचे कारण ज्योतिष हे थोतांड आहे, व शोषणाचे साधन आहे, या आरोपाला उत्तर होते.
आता मुळ मुद्दा, पत्रिका जुळवण्यााचा. जी राशी लग्नात असते, त्याच्या विरुध्द तत्त्वांची राशी ही सप्तमात असते. आपल्या कडे जे नाही त्याचे आपल्याला आकर्षण वाटते. अग्नी तत्वाच्या राशींच्या सप्तमात वायुराशी येतात. सप्तम स्थानावरून जोडीदार ही पाहतात, आणि उघड विरोधकही पाहतात. वायू कमी असेल तर अग्नी पेटत नाही. तसेच वायूमुळे अग्नी भडकतोही आणि विझतोही.अग्नी राशींच्या षष्ठात / मृत्यूषडाष्टकात मात्र पृथ्वी राशी येतात. अग्नी खूप भडकल्यावर त्यावर माती टाकतात. बऱ्याच कार्यालयात मातीने भरलेल्या बादल्या असतात. तसेच आगीने भाजल्यावर काही लोक पूर्वी माती चोळायचा सल्ला देत. भाजलेल्या ठिकाणी पाणी टाकावे की नाही, यावर मात्र दुमत आहे.
जल तत्वाच्या राशिंच्या सप्तमात कठीण/संघटित अशा पृथ्वी राशी येतात.पाण्यात टाकलेल्या वस्तू थोड्या वेळाने नरम होतात. उदा. तूरडाळ. तसेच मातीचे मडके पाणी धारण करते. जलराशीच्या षष्ठात/षडाष्टकात मात्र वायुराशी येतात. कर्क-कुम्भ् हे उत्कृष्ठ उदाहरण आहे. संसारात आणि चारचौघात रमणाऱ्या कर्क राशीचे वैराग्य वादी एकलकोंड्या कुंभ राशीशी पटत नाही.
मेष ही एक घाव दोन तुकडे करणारी राशी. सतत विश्लेषण करणाऱ्या कन्ये बरोबर तिचे पटत नाही.
वृषभ् ही गोड बोलून आपला स्वार्थ साधणारी पृथ्वीतत्वाची बंदिस्त आणि रंगरंगोटी करणारी राशी. तिचे आकाशतत्वाच्या मोकळया वृत्तीच्या धनु राशीशी पटत नाही. वृषभ ही नटवी बाहुली तर धनु हा शिष्ट स्कॉलर.
तसेच इतर राशिविषयी सांगता येईल.
एक मात्र सांगायला हवे, लग्न राशी किंवा चंद्र राशी काहीही असल्या तरी जातकाचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव, संपूर्ण ग्रहस्थिती मुळे वेगळे असू शकते.
ज्योतिष हे अनुभवांचे शास्त्र आहे. ते आमच्या अनुभवांचे शास्त्र नाही, तर तुमच्या अनुभवांचे शास्त्र आहे, असे आमचे भट म्हणत असत.
वितंडवाद वाट्टेल तेवढा घालता येईल. पण कोंबडं झाल्याने सूर्य उगवायचा राहत नाही.
इति लेखनसीमा.
Samit Mhatre,Thane.
Mob. 9820525638.
आमच्याकडे माझी आई पत्रिकेबाबत आग्रही होती. ती प्रचंड श्रद्धाळू. माझ्या भावाची आणि होणाऱ्या वहिनीची पत्रिका मी ऑनलाईन दोन ठिकाणी जुळवून पाहिली. पत्रिका जुळत नाही असे लक्षात आले. मग पत्रिकाच पाहू नये असा आग्रह धरला. आईला विनवणी करून पत्रिकेचे फॅड तिच्या डोक्यातून जाणिवपूर्वक काढले.
तेव्हा पासून पुन्हा कोणाचीच पत्रिका पाहायची नाही असे ठरवले.
गेल्या दहा वर्षांपासून कोणतीच अडचण आली नाही.
https://youtu.be/qCF2Q-1JixM?si=i5AUeoeNzpe_A6bQ
Program about kundali and psychology
https://youtu.be/wSKzZscyjSk?si=vXIWdqCZvJ2gg7df
2nd part
Post a Comment