Wednesday, November 26, 2014

स्मृती इराणी व ज्योतिष

मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी परवा आपल्या कुटुंबासोबत राजस्थानच्या भीलवडा परिसरातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित नथ्थूलाल व्यास  यांच्या कडे ज्योतिष पहायला गेल्या व वाहिन्यांना सनसनाटी न्यूज मिळाली. तीन मराठी चॅनेलवर एकाच वेळी परिसंवाद चालू झाले.जणु काही त्या ज्योतिषाकडे गेल्यामुळे फलज्योतिषाला विज्ञानजगात मान्यताच मिळणार होती. पण आपल्याकडे नेते, लोकप्रतिनिधी यांनी व्यक्तिगत जीवनात व सार्वजनिक जीवनात आदर्श,तत्वनिष्ठ,तर्कनिष्ठ,वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे,त्याचा प्रचार व प्रसार करणारे, विवेकवादी,आधुनिक,विद्वान,कर्तव्यनिष्ठ इ. सगळं हे सतत व एकाच वेळी असल पाहिजे ही जनतेच किंवा मिडियाची अपेक्षा असते.काहींच असही मत दिसल की सार्वजनिक जीवनात एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तिला खाजगी जीवन असत नाही व असुही नये. लोक त्यांच्याकडे आदर्श म्हणुन पहात असल्याने त्यांचे अनुकरण केले जाते. हे खरे आहे कि सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या दिग्गज,अधिकारी व्यक्तिच्या आयुष्यात सार्वजनिक व खासगी जीवन याची सीमारेषा अतिशय पुसट असते.पण एखाद्याच्या जीवनात अनपेक्षितपणे यश अथवा अपयश आले तो गांगरुन जातो. स्मृती इराणींचे तसेच झाले. प्रथम त्या माणुस आहेत व मंत्री त्यानंतर. त्यामुळे मानवी मेंदुच्या असणार्‍या भावभावना या त्यांनाही आहेत. आमदार गिरिष बापट म्हणाले की माणसाला भविष्याविषयी असणारी उत्कंठा उत्सुकता ही स्वाभाविक बाब आहे. कुटुंबासोबत त्या खाजगी आयुष्यात ज्योतिषाकडे गेल्या तर कुठे बिघडल? मला मंगळयान मोहिमेची आठवण आली भारताच्या मंगळमोहिमेला आशीर्वाद मिळविण्यासाठी इस्रोचे प्रमुख शास्त्रज्ञ के. राधाकृष्णन यांनी पत्नीसोबत तिरुपती बालाजीची पूजा केली.  इस्रोच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी यानाची प्रतीकृती घेऊन राधकृष्णन हे तिरुपती मंदिरात पूजेसाठी येत असतात. इथेही तोच प्रश्न उपस्थित झाला कि एवढ्या मोठ्या पदावरील वैज्ञानिकाला खाजगी जीवन आहे की नाही? त्या ज्योतिषी नथ्थूलाल ने म्हणे स्मृतीबाईंना पाच वर्षांनी राष्ट्रपती व्हाल असे सांगितले आहे.ते ही हस्तरेषांवरुन.  असो! जो पर्यंत अनिश्चितता आहे तो पर्यंत ज्योतिषाला मरण नाही हे आमचे भाकीत वारंवर प्रत्ययाला येते.

Wednesday, October 08, 2014

लोकसभा निवडणुकातील ज्योतिषांच्या भाकीताचे काय झालं?

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी ४ एप्रिल २०१४ रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील 'मतसंग्रामा'ची बित्तंबातमीचे भाकीत  वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.नंदकिशोर जकातदार यांनी  देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणार्‍या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून वर्तविलेले भाकित व प्रत्यक्षनिवडणुकीचे निकाल व त्यावरून काढलेले निष्कर्ष ऐसी अक्षरे वरील लेखक श्री प्रभाकर नानावटी यांनी तयार करुन खाली दिलेले आहेत.

अंदाज/भाकितं निकाल  निष्कर्ष  
नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाही
  चूक
कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाहीभाजप 282  चूक  
काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नाहीयुती 334+  चूक
भाजपला १५५ ते १६५ जागा282  चूक 
काँग्रेसला ११५ ते १२६ जागा44  चूक 
राष्ट्रवादीला ८ ते १० जागा6  चूक 
शिवसेनेला १० ते १२ जागा18  चूक 
समाजवादी पक्षाला १८ ते २२ जागा5  चूक 
बसपाला १६ ते १८ जागा0  चूक 
महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीसारखीच परिस्थिती
  चूक 
आम आदमी पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही
बरोबर   
वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी मोदींना यश मिळेल
  बरोबर   
वाराणसीत त्यांना 'आप'च्या अरविंद केजरीवाल यांची कडवी लढत मिळेलफरक 371784चूक 
एकही सेलिब्रेटी निवडून येणार नाही
बरोबर  
पुण्यात विश्वजित कदम आणि अनिल शिरोळे यांच्यात अटीतटीची लढतफरक 315769  चूक 
विश्वजित कदम यांची सरशी होणार
  चूक
मुंबईत सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील.सर्व जागा युतीला  चूक 
मावळला लक्ष्मण जगताप निवडून येणारबारणे विजयी  चूक
शिरूरला शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येणार आहेत
  बरोबर
नितीन गडकरींना  केवळ पाच ते दहा हजार मतानी विजय मिळेलफरक 284828  चूक
येणारे सरकार दोन ते तीन वर्ष टिकणार
  वाट पाहू या 
त्या निवडणुकीतून येणारे सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल
  वाट पाहू या 

भाकित 21 व 22 साठी वाट पहावी लागेल. परंतु उरलेल्या 20 भाकितांपैकी केवळ 4 भाकितं  बरोबर ठरल्या.

Saturday, March 01, 2014

दाते पंचांगातील सन २०१४ चे राजकीय भविष्य

ज्योतिषी विजय केळकर पुणे यांचे लोकसभेच्या निवडणुकांबाबत दाते पंचांगात पान नं ७९ वर खालील राजकीय भविष्य आलेले आहे.भविष्याची भाषा व व्याप्ती पहा.कुठलीही राजकीय घटना या व्याप्तीत सहज बसवता येईल.
========================================================================
पंचांगाचे २०१४-१५ साल भारताच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. कारण ह्याच वर्षात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या कालावधीमध्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण आणि रवी शनी प्रतियोग होणार आहेत. हे सर्व ग्रहयोग भारताच्या मकर लग्नाच्या पत्रिकेत दशम स्थान व चतुर्थ स्थानात होत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या दृष्टीने राजकारण हा एक गूढ विषय झाला तर आश्चर्य नाही.
सत्तेवरील कॉंग्रेस पक्षाची पत्रिका मीन लग्नाची आहे. नोव्हेंबर २०१४ पर्यंत शनीचे भ्रमण ह्या पत्रिकेत अष्टमस्थानातून होईल. फेब्रुवारी १४ मधे मंगळ याच स्थानात हजेरी लावेल आणि तेथुन तो वक्री मार्गी स्थितीमधे जवळ जवळ जुलै मध्यापर्यंत राहील. अर्थातच सत्ताधारी पक्षाला ही निवडणुक जिंकणे अतिशय जड जाईल. कॉंग्रेस पक्षाला आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी पुर्वी कधी नव्हती इतकी तडजोड करावी लागेल. श्रीमती सोनिया गांधी यांची पत्रिका कर्क लग्नाची आहे. त्यांचे पत्रिकेनुसार एप्रिल ते जुन १४ या कालावधीमधे गुरुचे व्ययस्थानात तर शनीचे भ्रमण चतुर्थस्थानात असल्यामुळे पक्षातील सदस्यांनी केलेल्या चुका त्यांना महागात पडतील.अर्थातच इतर पक्षांशी हातमिळवणी करावी लागेल. पण कॉंग्रेस पक्षाची पत्रिका जुन नंतर बलवत्तर होत जाईल. कारण गुरु पक्षातील पत्रिकेत पंचम स्थानात आणि सोनिया गांधींच्या पत्रिकेत लग्नस्थानात प्रवेश करेल. त्यानंतर कदाचित हीच कॉंग्रेस पार्टी नेतृत्व देउ शकेल.मात्र त्यापुर्वी पक्षाला अग्निपरिक्षेतून जावे लागणार हे निश्चित. हे सर्व ग्रहमान पाहता असे वाटते की सार्वत्रिक निवडणुकांमधे हा पक्ष सरळमार्गाने सत्तेवर येउ शकणार नाही. पण ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर या पक्षाचे पारडे जड होईल. दरम्यान च्या काळा मधे मध्यावधी निवडणुका पुन्हा घ्याव्या लागण्याची परिस्थिती निर्माण होईल.
भाजप ची पत्रिका धनु लग्नाची आहे. जून १४ पर्यंत गुरु आणि शनी या दोन्ही ग्रहांची साथ या पक्षाला मिळेल. मात्र एप्रिल महिन्यात अचानक ज्या घडामोडी घडतील त्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पक्षाची पुर्वी ठरलेली ध्येय धोरणे बदलून जातील. त्याचा परिणाम चांगला होणार नाही. एप्रिल महिन्यातच होणार्‍या  रवि- हर्षल युती व शुक्र गुरु त्रिकोणामुळे पक्षांतर्गत नेतृत्वासंबंधी ज्या लाथाळ्या चालू होतील त्यातून पक्षाचे नुकसान होईल जुन मधे गुरु पक्षाच्या पत्रिकेत अष्टमस्थानात प्रवेश करेल.जरी हा पक्ष सत्तेवर आला तरी तो टिकू शकणार नाही. कारण सक्षम नेतृत्व व राष्ट्रिय स्तरावरील ध्येय धोरणे  याबाबतीत भाजप मधे विरोध राहील. तिसर्‍या आघाडीत असणारे पक्ष पुर्वी पेक्षा जास्त मते मिळवतील.ह्या आघाडीशी युती करायला कॉंग्रेस व भाजप उत्सुक असतील.परंतु कॉंग्रेस पक्ष अखेर बाजी मारेल. एप्रिल मे हा ग्रहणयुक्त कालावधी असल्याने जी पार्टी सत्तेवर येईल त्याला काम करण्यात प्रचंड त्रास होईल. विरोधकांकडून महत्वाचे मुद्दे उपस्थित केले जातील याच बरोबर नैसर्गिक आपत्त्या जीवितहानी आणि परराष्ट्र धोरण यामुळेही सतत अशांतता असेल. दशम स्थानातील मंगळ निवडणुकीच्या वेळी वक्रि स्थितीमधे भारताच्या पत्रिकेमधे भाग्यस्थानात येईल. तो अशा अवस्थेत २० मे पर्यंत राहील आणि त्यानंतर त्याची वाटचाल पुन्हा दशम स्थानाच्या दिशेने चालू होईल.२०१४ जुलै ला पुन्हा दशमात येईल.. वक्री-मार्गी स्थितीत राहणारा मंगळ भारतामधे थैमान घालेल. त्याचे परिणाम खालीलप्रमाणे असतील
१) कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळणार नाही. इतर पक्षाशी हातमिळवणी करणे अपरिहार्य होईल.संमिश्र सरकार येण्याची शक्यता आहे
.२)निवडणुकीच्या वेळेला भाजपची पत्रिका कॉंग्रेसपेक्षा जास्त प्रभावी असेल.पण नेहमी प्रमाणे या पक्षाची तत्वनिष्ठ भुमिका आडवी आल्याने त्यांना सत्तेवर येण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागेल.
३) सर्व राजकीय पक्षांमधील तरुण प्रतिनिधींना जास्त वाव मिळेल. सुरवातीला ही गोष्ट चांगली वाटेल पण नंतर त्यांच्या एकतर्फी निर्णय घेण्याच्या पद्धतीमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होउ शकतील
.४) ऑगस्ट महिन्यात होणारी शनी-मंगळ युती भारताच्या दशमस्थानात होणार आहे. सत्तेवरील पक्षाविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणण्याचा विरोधक प्रयत्न करतील. त्यातून सत्तेवरील पक्ष कसाबसा बाहेर पडेल.ऑक्टोबर मधे होणारी ग्रहणे पुन्हा विचित्र परिस्थीती निर्माण करुन ठेवतील. त्यामुळे लोकसभा विसर्जित करावी लागते की काय अशी शंका येईल. थोडक्यात या सर्व राजकीय अस्थिरतेमुळे सत्तेवरील पक्षाला काम करता येणार नाही.प्रत्येक निरणयाला विरोध होईल पुन्हा मार्च-एप्रिल २०१५ मधे जी ग्रहणे होणार आहेत. त्यामुळे सरकार बरखास्त करुन पुन्हा निवडणुका घ्याव्यात असे ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतर जे सरकार सत्तेवर येईल ते भारतामधे राजकीय स्थिरता आणायला सुरवात करेल.

Thursday, February 27, 2014

आल्या आल्या लोकसभेच्या निवडणुका!

आता २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.ज्योतिषांच्या भाकितांचे आता प्रमाण वाढू लागेल.उमेदवार आता ज्योतिषांचे सल्ले घ्यायला लागतील. मेदिनीय ज्योतिषाच्या आधारे ही राजकीय/निवडणुकीची भाकिते वर्तवली जातात.मेदिनीय ज्योतिष म्हणजे देश, प्रांत यांचे भवितव्य सांगणारी ज्योतिष शाखा. यात हवामान, राजकीय बदल, सामाजिक स्थित्यंतरे, सृष्टी-चमत्कार, क्रांती, भूकंप, युद्धे, दंगली इ. गोष्टींचा मागोवा घेतात. यात देश, प्रांत, शहर, राजकीय पक्ष यांना सुद्धा राशी बहाल केल्या आहेत. उदा. आधुनिक भारताची रास मकर आहे. आता ही सुद्धा कशी? १ नोव्हे.१८५८ रोजी इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीचे भारतावरील वर्चस्व संपून राणीच्या राजसत्तेचे वर्चस्व चालू झाले. या अर्थाने आधुनिक भारताचा जन्म झाला. मग अगोदर भारत नव्हता का? हा प्रश्न इथे निरर्थक आहे. भारताचे भाकीत वर्तवताना आधुनिक भारताची पत्रिका, १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला म्हणून स्वतंत्र भारताची पत्रिका, २६ जाने १९५० ला भारत प्रजासत्ताक झाला म्हणून ती पत्रिका, सत्तेवर असलेल्या पक्षाची पत्रिका, पंतप्रधानांची पत्रिका वगैरे अनेक पत्रिका विचारात घेवून भाकीत वर्तवले जाते. कॉंग्रेसची पत्रिका कुठली तर २८ डिसेंबर १८८५ म्हणजे पक्षस्थापनेची. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला कॉंग्रेसमध्ये विभाजन होत गेले तरी पत्रिका तीच. पोर्तुगीजांनी ब्रिटीशांना मुंबई बेट आंदण म्हणून दिले ती मुंबईची पत्रिका. असे प्रातांचे जन्म धरून त्यांच्या पत्रिका तयार केल्या आहेत. इंदिरा गांधी १९७७ ची निवडणूक हरल्या कारण त्यांनी अमावस्येला फॉर्म भरला होता असं अजंता जैन या राजकीय भाकीत वर्तवणाऱ्या ज्योतिषाने सांगितले होते. १९९१ च्या निवडणूका व राजीव गांधींची हत्या ही कोणालाही सांगता आली नाही. बहुसंख्य ज्योतिषांनी राजीव गांधींच पंतप्रधान होणार असे सांगितले होते. ( पहा साप्ताहिक सकाळ २७ एप्रिल १९९१. व इलस्ट्रेटेड विकली २५-३१ मे १९९१)
पत्रिके वरून कुठल्या पक्षाला किती सीट मिळतील हे सुद्धा ज्योतिषी सांगतात. पक्षाची पत्रिका, उमेदवाराची पत्रिका, निवडणुकीच्या दिवसाची ग्रहस्थिती.देशाची पत्रिका असे अनेक घटक ते वापरतात. कृष्णमूर्ती नावाच्या पद्धतीत उमेदवाराने विचारलेल्या प्रश्नाची कुंडली मांडून तो निवडून येईल का? हे सांगण्याची सोय आहे.उमेदवाराने ज्योतिषाला विचारलेल्या प्रश्न वेळ ही त्या प्रश्नाचा जन्म मानून त्यावेळची कुडली तयार केली की झाली प्रश्न कुंडली. आता समजा एकाच ज्योतिषाकडे दोन परस्पर विरोधी उभे असलेले उमेदवार जरी एकाच वेळी आले असे गृहीत धरले  तरी या पद्धतीत १ ते २४९ पर्यंतचा अंक उमेदवाराला मनात धरायला सांगतात. दोनही उमेदवार हे एकच अंक मनात धरतील अशी शक्यता फार कमी. त्यामुळे त्या अंकाशी (केपी नंबर) संबंधीत असलेली कुंडली ही वेगळी असते.त्यावरुन उत्तर दिले जाते.तसेही एक्जीट पोल, ओपिनियन पोल वगैरे अंदाज घेण्याचे प्रकार असतात. पण त्याचा आधार हा जनमताची चाचपणी हा  असतो.अशी चाचपणी घेणार्‍या कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गोबेल्स राजनीतीत लोकांमधे आपल्याला अनुकुल अशी हवा निर्माण करायला ज्योतिषांचाही वापर होतो. शेवटी राजकारण भावनेच्या लाटेवर चालत. 
 मग, तुम्ही पण सांगू शकता की भाकीत. अं हं! तुम्ही आम्ही सांगतो तो अंदाज व ज्योतिषी सांगतो ते मात्र भाकीत.

Monday, February 03, 2014

भविष्य कुठल्या कारणामुळे चुकते??

वर्तमानपत्रातील ज्योतिषांच्या जाहीराती मोठ्या गमतीशीर असतात. दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर 
मोठ्ठी जाहिरात असते.'पुणेकरांचे श्रद्धास्थान' असलेल्या आदिनाथ साळवी सरांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्यच. जाहिरातीत भाकित खरे ठरल्याचा एखाद्या व्यक्तिचा अनुभव असतो. जर विवाह होणार असेल तर कुठे? कधी?कोणाशी? जोडीदाराचा स्वभाव कसा असेल? तो नोकरी का व्यवसाय करत असेल? त्याचे रंग रुप व्यक्तिमत्व आर्थिक परिस्थिती कशी असेल? विवाह नात्यात होईल का? प्रेमविवाह, पळून जाउन कि ठरवून? तो जातीचा असेल की परजातीचा? विवाहास जास्त खर्च तर येणार नाही ना? तो बिजवर व्यसनी नंपुसक, लफंगा तर नसेल ना? तो दीर्घायु आरोग्यसंपन्न आहे का? घरातील माणसांशी पटेल ना? ग्रहदोष दूर होउन वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी अत्यावश्यक धार्मिक उपाय, उपासना व प्रार्थना कोणती करावी? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात असतात. ते जाहीरातीत लिहिले असतात. जाहिरातीत हल्ली पुढे असेही लिहिले असते कि खालील कारणाने सांगितलेले भविष्य चुकीचे ठरु शकते
१) आपण दिलेली जन्मतारीख,वेळ,ठिकाण चुकीचे असेल तर
२) सांगितलेले उपाय,उपासना व प्रार्थना आमच्याकडून केलेली नसेल तर
३) बाहेरुन केलेले उपाय, उपासना, व प्रार्थना यांच्या परिणामांची जबाबदारी आमची नाही
४) भविष्य पहाताना साडेसाती,चौथा,सातवा,आठवा शनी असेल तर
५) विश्वास व श्रद्धा नसेल तर
आता समजा एखाद्या जातकाने अशा ज्योतिषाकडून भविष्य लेखी जरी घेतले व ते खरे ठरले नाही तरी वरील पाच पैकी कुठल्या तरी मुद्याच्या कचाट्यात तो सहज सापडलेला असतो. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी ज्योतिषावर येत नाही.ज्योतिषाची जाहिरात करणे अद्याप कायद्याने गुन्हा नाही. जादूटोणा विरोधी कायदाही याला काही करु शकत नाही. कारण त्यात ज्योतिषाचा समावेश नाही. राहिला प्रश्न दाव्याचा. त्यातून तर वर डिस्क्लेमर टाकून सुटका केली आहेच. शिवाय अनेक वस्तु व सेवा अव्वाच्या सवा दावे जाहिरातीत करत असतात. आपण ते गांभीर्याने घेत नाही.त्याला मार्केटिंग स्किल म्हणतो. ज्योतिष हे पण एक प्रॉडक्ट आहे.अमेरिकेत काही स्टेट मधे ज्योतिषाचा व्यवसाय करण्यास बंदी आहे.काही आपल्याकडील काही चलाख लोक जिथे बंदी नाही तिथे वैदिक ज्योतिष व्हिजिटिंग प्रोफेशनल म्हणुन व्यवसाय करतात.आमचे एक ज्योतिष स्नेही म्हणायचे की अहो जरी भारतात समजा कायद्याने ज्योतिषावर बंदी आलीच तरी लोकच मागल्या दाराने ज्योतिषाकडे येतील. त्यांच म्हणण अगदी खर आहे.सर्वसामान्य लोकांना ज्योतिषाची गरज लागणारच नाही अशी सामाजिक परिस्थिती आपल्याकडे निर्माण होउ शकते का?

Monday, January 13, 2014

लपे करमाची रेखा

लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली

देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला

बापा नको मारू थापा असो खर्‍या असो खोट्या
नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या

अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले
नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले

राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन
त्यात आले रे नशीब काय सांगे पंचागन

नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू
माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ

कवियत्री – बहिणाबाई चौधरी

Thursday, January 09, 2014

ज्योतिष ही अंधश्रद्धा - डॉ वेंकटरामन


'भारत विकासाच्या वाटेवर जात असताना नशिबावर विश्‍वास ठेवत जातो. सरकार, राजकारणी याच विचारसरणीला पाठबळ देत आहेत, हे दुदैवच म्हणावे लागेल. ज्योतिषशास्त्राचा आधार घेत भविष्य वर्तविण्यात येते. ज्योतिषशास्त्र ही केवळ अंधश्रद्धा आहे. त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्याने ते शास्त्रही नाही,'' असे मत "नोबेल'विजेते भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. वेंकटरामन रामकृष्णन यांनी पुणे येथ व्यक्त केले.

या निमित्ताने मला 'दी हयूमॅनिस्ट` या अमेरिकन मासिकाच्या सप्टेंबर १९७५ च्या अंकात 'ऑब्जेक्शन्स टू दी अस्ट्रॉलॉजी` अशा शीर्षकाचे एक निवेदन प्रसिद्ध झाले होते त्याची आठवण झाली.. त्या निवेदनावर युरोप अमेरिकेतल्या नामवंत १८६ शास्त्रज्ञांच्या सहया होत्या. ( सुरुवातीला ते १९२ होते नंतर त्यातील ६ गळाले ) यात काही नोबेल पारितोषिक विजेते सुध्दा होते. हे निवेदन डॉ. बार्ट जे बोक यांनी तयार केले होते. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, ग्रहतारे हे पृथ्वीपासून प्रचंड अंतरावर असल्याने त्यांचे गुरुत्वाकर्षणादि परिणाम ते पृथ्वीवर पोहोचे पर्यंत अगदी क्षीण होतात. अशा क्षीण प्रभावाने माणसाचे नशीब घडवले जाते असे मानणे बरोबर नाही. या निवेदनावर विख्यात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी सही देण्यास नकार दिला.
निवेदनात फलज्योतिषातील तत्वे व संकल्पना ही निरर्थक कशी आहेत? केवळ भौतिक परिणामाचा भाग न घेता त्यांचा योग्य तो समाचार त्यात घेवून त्यावर का विश्वास ठेवू नये अशी मांडणी त्यात नव्हती. केवळ वैज्ञानिक सांगतात म्हणून ते खरे असा काहीसा सूर त्या निवेदनात होता. केवळ याच कारणासाठी कार्ल सेगनचा नकार होता. हे त्याने स्पष्टही केले होते. पण समर्थकांनी आपल्याला हवा तसा अर्थ त्यातून काढला.

आता मुद्दा असा आहे कि फलज्योतिष हे विज्ञान नाही असे जागतिक वटहुकूम काढून जाहीर केले तरी पुढे काय? "या ज्योतिषाच काय करायच?" मधे हे आम्ही पुर्वीच लिहिले आहे.