Monday, January 13, 2014

लपे करमाची रेखा

लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली

देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला

बापा नको मारू थापा असो खर्‍या असो खोट्या
नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या

अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले
नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले

राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन
त्यात आले रे नशीब काय सांगे पंचागन

नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू
माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ

कवियत्री – बहिणाबाई चौधरी

Thursday, January 09, 2014

ज्योतिष ही अंधश्रद्धा - डॉ वेंकटरामन


'भारत विकासाच्या वाटेवर जात असताना नशिबावर विश्‍वास ठेवत जातो. सरकार, राजकारणी याच विचारसरणीला पाठबळ देत आहेत, हे दुदैवच म्हणावे लागेल. ज्योतिषशास्त्राचा आधार घेत भविष्य वर्तविण्यात येते. ज्योतिषशास्त्र ही केवळ अंधश्रद्धा आहे. त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्याने ते शास्त्रही नाही,'' असे मत "नोबेल'विजेते भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. वेंकटरामन रामकृष्णन यांनी पुणे येथ व्यक्त केले.

या निमित्ताने मला

Saturday, December 21, 2013

ज्योतिषाचे हमीपत्र?

17 डिसेंबर च्या महाराष्ट्र टाईम्स मधे वाचकांच्या पत्रात प्रा. य. ना. वालावलकर यांचे खालील पत्र छापुन आले आहे.
ज्योतिषाचे हमीपत्र असे हवे
’ज्योतिषी आपल्या आश्रयदात्याकडून (क्लाएंट) - भविष्याच्या परिणामाची कोणतीही जबाबदारी भविष्य सांगणार्यायवर नाही- असे हमीपत्र लिहून घेणार ’ हे वृत्त (मटा ११ डिसेंबर) वाचले. पृच्छकाकडून हमीपत्र घेणे योग्य नाही. ज्योतिषी पैसे घेउन भविष्य सांगतात.उपाय सुचवतात. तेव्हा त्यांनी पुढीलप्रमाणे हमीपत्र द्यावे ’

Thursday, October 24, 2013

ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत

ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत हे पुस्तकच प्रकाशझोतात आल ते श्रीराम लागूंच्या भाषणामुळे. लोकवाङमय गृह व लोकविज्ञान चळवळ यांचे तर्फे आयोजित या पुस्तकाच्या प्रकाशनात डॉ लागू म्हणाले," ज्योतिष हे शास्त्र असेल तर ते फसवणुकीचे, भविष्यविषयक लोकांच्या कुतुहलाचा फायदा घेउन स्वत:ची तुंबडी भरण्याचे. ज्योतिषासारख्या अंधश्रद्धा केवळ समाजाचे शोषण करतात म्हणुन निषेधार्ह नाहीत तर त्या व्यक्तिला,समाजाला बौद्धिक दृष्ट्या खच्ची करतात. त्याची सारासार विचारशक्ती मारतात.त्यामुळे वरकरणी कितीही निरुपद्रवी भासणारी अंधश्रद्धा ही समाजाला घातक ठरते."
पुस्तकाची प्रस्तावना ही 'पुरस्कार' म्हणुन ग.वा.बेहेरे यांनी लिहिली आहे,त्यात त्यांनी स्वत:चे अनुभव मांडलेत.राशीभविष्य लिहायला कोणतीही अक्कल लागत नाही. मी सुद्धा काही काळ ते लिहिले आहे असे ते म्हणतात.
पुस्तकाच्या स्वरुपात विशाल नावाचा एक मुलगा आपल्या काकांना जिज्ञासेने प्रश्न विचारतो व त्याचे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे काका हे त्याच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देतात. विशालच्या प्रश्नांना उत्तर देता देता आपल्या प्रश्नांचीही उत्तरे मिळून जातात.पुस्तकाच अस स्वरुप हे जाणीव प्रुर्वक असाव. कारण किशोरवयीन जिज्ञासा या वेळीच जाणुन त्यांना जर वैज्ञानिक दृष्टीकोनाची दिशा दाखवली तर होणारी युवापिढी ही विज्ञाननिष्ठ होईल.विशालच्या प्रश्नातून खगोलशास्त्राची सुरवात,पंचांगातील खगोलशास्त्र,खगोलशास्त्रात फलज्योतिषाची सरमिसळ, माणसाच्या दुबळेपणाचे फायदा घेणारे ज्योतिष,ग्रहण व अंधश्रद्धा असे विषय मांडले आहेत. याव्यतिरिक्त बुवांचे चमत्कार व त्यामागील विज्ञान व उपसंहारात अंधश्रद्धा व विज्ञान विषयक इतिहासाचा मागोवा घेतला आहे. परिशिष्ट मधे गाडगे बाबा ते प्रबोधकार ठाकरे यातील दैववादाचा फैलावा. म.फुले समग्र वाङमय मधील 'आकाशातील ग्रह', आगरकरांच्या सुधारक मधील 'आमचे ग्रहण अजून सुटले नाही', महादेवशास्त्री जोशी यांच्या 'आत्मपुराण' मधील संदर्भोचित वेचे घेतले आहेत.
लेखक- जगदीश काबरे
प्रकाशक- सुकुमार दामले, लोकवाङमय गृह,८५ सयानी रोड भुपेश गुप्ता भवन प्रभादेवी मुंबई २५
पृष्ठे-७३
मूल्य- पंधरा रुपये.

Monday, October 21, 2013

फलज्योतिष चिकित्सा

फलज्योतिष चिकित्सा : लेखक रा.ज.गोखले.
पुण्यातील रा.ज.गोखले या भुगोल शिक्षकाने हे पुस्तक १९३५ साली प्रकाशित केले आहे.पुस्तक अर्थातच त्यावेळच्या सामाजिक परिस्थिती च्या पार्श्वभूमिवर आहे. लेखकाने फलज्योतिष या विषयावर संशोधन व्हावे व त्यासाठी फलज्योतिषाभिमानी जहागीरदार व संस्थानिक यांनी पुढाकार घ्यावा असे सुचित केले आहे. संशोधनापासून होणारा फायदा अधोरेखित करताना लेखक म्हणतो," या शास्त्रापासून निश्चित ज्ञान बहुतेके बाबीत मिळत नसेल व त्याचा तादृश उपयोग नसेल तर तसे जाहीर झाल्याने गरीब लोकांचा या शास्त्राचा सल्ला घेण्यात होणारा द्रव्याचा व कालाचा अपव्यय वाचेल व जनतेची दिशाभूल होणे टळेल.भविष्य ज्ञेय पण अटळ असेल,तर त्याचा खासगी व्यवहारात काही उपयोग नाही; पण ऐतिहासिक माहिती मिळवण्याच्या कामी उपयोग झाल्यास ऐतिहासिक ज्ञानवृद्धी च्या कामी या शास्त्राचा उपयोग करुन घेता येईल." फलज्योतिषाच्या मूलतत्वास निश्चित आधार मिळतो काय? शास्त्रात मानल्या गेलेल्या कारणांचा अपुरेपणा, भिन्न व परस्परविरोधी असलेले ज्योतिषातील पंथ, ग्रहयोग सूचक आहेत की कारक याबद्दलचा विचार,होय किंवा नाही हे उत्तर ग्रहहोगावरुन निश्चितपणे मिळणे शक्य आहे काय? शास्त्रातील मतभेद व संदिग्धता यामुळे वारंवार होणार्‍या घोटाळ्यांची उदाहरणे अशा अनेक पातळ्यांवर छोटी मोठी प्रकरणे पुस्तकात घेतली आहेत.बर्‍याच वेळा लोकमान्य टिळकांच्या कुंडली वर केलेली भाष्य उदाहरणात घेतली आहेत.फलज्योतिषाची आजची स्थिती ( म्हणजे १९३५ सालातील) मांडताना पुरस्कर्ते व विरोधी यांचे भिन्न पक्ष लेखकाने मांडले आहेत.

Thursday, October 10, 2013

फलज्योतिष एक महाथोतांड

फलज्योतिष एक महाथोतांड
पुस्तकाच्या नावावरुनच  फलज्योतिषावर अतिशय टीका करणारे पुस्तक आहे हे सांगायलाच नको.लेखक सुधाकर भालेराव हे खगोलशास्त्राचा अभ्यासक असून त्यावर त्यांनी विपुल लेखन व व्याखाने दिलेली आहेत. लेखकाच्या आपली सूर्यमाला तसेच कृत्रिम उपग्रह आणि अवकाश विज्ञान या ग्रंथांना राज्य पुरस्कार ही मिळाले आहेत.
पुस्तकाच्या सुरवातीला खगोलशास्त्र व फलज्योतिष यातील फरक सांगितला आहे. आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर होणार परिणाम, जन्मकुंडली हा जन्मक्षणीचा नकाशा मांडता्ना असलेली पृथ्वी हा भगोलाचा मध्य ही संकल्पना या गोष्टी खगोलशास्त्रीय दृष्ट्या कशा चुकीच्या आहेत हे मांडले आहे. अवकहडा चक्र ही ग्रीकांची अब्रॆका बाब्रा ची उसनवारी असून त्यात चातुर्वण घुसवण्याचे उद्योग कुणाचे? असा प्रश्न लेखक विचारतो.भारतीय पंचांग कशी चुकीची आहेत व त्यामुळे पडणार्‍या सायन निरयन कुंडली विषयी विवेचन त्यात आहे. फलित अथवा भविष्यकथन या प्रकारातील अपरिहार्य भाग म्हणजे राशीस्वभाव,ग्रहांच्या उच्च नीच राशी,कुंडलीतील भाव व स्थाने,ग्रहांच्या जाती,मंगळाचे खूळ,शनीची साडेसाती या विषयी थोडक्यात विवेचन मांडले आहे. त्यानंतर कोसळलेली भाकिते-दुटप्पी भाषा, राष्ट्राची कुंडली, फलज्योतिषाचा वैज्ञानिकांनी केलेला अभ्यास या मुद्यांनी पुस्तकाचा शेवट केला आहे.
एकंदरीत पुस्तकात फलज्योतिष हे केवळ थोतांड नसून महाथोतांड आहे हे आव्हानात्मक भाषा वापरुन सांगितले आहे. वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज व डॊ सुरेंद्र बारलिंगे याचा अभिप्राय पुस्तकाच्या स्रुरवातीला आहे.

लेखक-सुधाकर भालेराव.
प्रकाशक
महाराष्ट्र रॆशनॆलिस्ट असोसिएशन
२४७ रमा नारायण निवास, तेलंग रोड माटुंगा मुंबई १९
प्रथम प्रकाशन- ४ मे १९८४
मूल्य- तीन रुपये
पृष्ठे -२२

Monday, October 07, 2013

पत्रिकेवरुन स्त्री की पुरुष?

पत्रिकेवरुन व्यक्ती स्री की पुरुष ओळखा, जिवंत कि मृत ओळखा हे आव्हान डॉ अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने  जगभरात जाहीर दिले होते.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तीच परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे.आज ते आव्हान २१ लाखांचे आहे.अजून कोणत्याही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नाही.काही ज्योतिषांना हे आव्हान स्वीकारता येत नाही याची खंत आहे. ज्येष्ठ ज्योतिषी श्री श्री भट पत्रिकेवरुन स्त्री कि पुरुष या बद्दल आपल्या ज्योतिषाच्या गाभार्‍यात या पुस्तकात याबाबत म्हणतात," खरे तर ज्योतिषाची शास्त्रीयता सिद्ध करुन देण्यासाठी आणखी आकडेवारी जमा करण्याची किंवा आव्हाने स्वीकारण्याची गरजच उरली नाही.१० पत्रिका देउन त्यातले मुलगा की मुलगी सांगा असा प्रश्न विचारला जातो.' भारतीय ज्योतिष' या हिंदी पुस्तकात या विषयी एक नियम आहे.त्यात थोडा बदल करुन एक नियम प्रचलित आहे तो मुलुंडचे श्री नाडगौडा यांनी कळवला आहे तो असा:-

Wednesday, September 25, 2013

कुंडली एका नरेंद्राची


फेब्रुवारी २०१२ मधे मला डॊ दाभोलकरांचा फोन आला.
 "दैववादाची होळी हा अंनिसचा कुंडली जाळण्याचा कार्यक्रम आहे. मला माझी कुंडली कार्यक्रमात जाळायची आहे. मला कुंडली तयार करुन पाठव."
"ठीक आहे द्या तुमची जन्मवेळ जन्मतारीख, जन्मस्थळ."
"ही घे १ नोव्हेंबर १९४५ सातारा सकाळी ७ वाजता."
 " ठीक आहे पाठवतो."
२००८ मधे झालेल्या अंनिसच्या फलज्योतिष चाचणी प्रकल्पात मी समन्वयक होतो.त्यावेळी मतिमंद मुलांच्या व हुषार मुलांच्या सर्व कुंडल्या मी तयार केल्या होत्या. त्यावेळी मी त्यांना म्हटले होते की तुमची कुंडली एकदा ज्योतिषांना अभ्यासाला दिली पाहिजे.सध्या ज्योतिषांच्या कुंडलीत दाभोलकर नावाचा ग्रह वक्री दिसतोय.ते नेहमी प्रमाणे निरागस हसले.
नोव्हेंबर १९९५ साली सातारा येथे आखिल भारतीय ज्योतिषांचे संमेलन झाले होते.त्यावेळी ज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका अंनिस ने घेतली होती. कृष्णराव वाईकर हे संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी काही कडव्या हिंदूत्ववादी संघटनांना हाताशी धरुन हा धर्मावर घाला आहे अशी भूमिका घेतली होती.ज्योतिष हे धर्माचे अंग आहे. ज्योतिषाला आव्हान म्हणजे धर्माला आव्हान अशी मांडणी करुन अंनिसला दमात घेण्याचा प्रयत्न केला होता.अंनिस च्या कार्यकर्त्यांनी आपल्या बायकोचे कूंकु पुसुन यावे अशा आशयाची भाषा वापरली. त्यावेळी महाराष्ट्र टाईम्स ने त्याची दखल घेउन कुंकवाची उठाठेव असा अग्रलेख लिहिला होता.अंनिसने या धमक्यांना भीक न घालता त्याही वेळी कुंडल्या जाळण्याचा कार्यक्रम केला होता. अशा कार्यक्रमात ओम, गणपतीची प्रतिमा अशा हिंदुत्वाच्या प्रतिकांचे दहन होणार नाही याची काळजी घेतली.कारण उगीचच भावना दुखावल्याचे
भांडवल व्हायला नको.कुंडली हा आराखडा आहे. तो जाळून काय होणार आहे? लोकांच्या ज्योतिषावरील विश्वासाला त्यामुळे थोडाच तडा जाणार आहे? अशा आमच्यासारख्या काही लोकांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणत अहो हे शेवटी प्रतिकात्मक असत.
आज दाभोलकर आपल्यात नाहीत.दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी दाभोलकरांचा २० ऒगस्ट २०१३ रोजी सकाळी सात सव्वासात च्या दरम्यान क्रूरपणे खून केला.भाडोत्री खूनी कदाचित सापडतीलही पण त्यामागच्या मास्टर माईंडचे काय? दाभोलकरांवर प्रेम करणारे अनेक ज्योतिष भाविक देखील आहेत.अनेक ज्योतिषी त्यांच्या कुंडलीवरुन आता ग्रहयोग खून दर्शवत होते असे सांगत फिरतील. कुंडलीतील शनि मंगळ युती कशी घातक ठरली हे सांगतील.जन्मवेळ व मृत्युची वेळ ही जवळपास एकच कशी होती हे सांगतील.त्यावेळी मंगळ कर्केत प्रवेश करीत होता हे सांगतील.पण त्यांनी आपल्या सदसद विवेक बुद्धीला स्मरुन सांगाव हे त्यांना अगोदर सांगता आल असत काय?

Wednesday, April 10, 2013

यंदा कर्तव्य आहे?

 Yanda Kartavya Aahe Mukhaprushtha 001
मनोगत
काय! तुम्ही पण अंधश्रद्धाळूच की राव !  लग्नाला एक तप पूर्ण झाल्याचे निमित्त म्हणा औचित्य म्हणा साधून हे पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदय मी व्यक्त केल्यावर आमच्या एका स्नेहयांनी ही प्रतिक्रिया दिली. मला मोठी गंमत वाटली. मुहूर्त या प्रकाराविषयी मानसिकता अशी पण रुजत गेली त्याचा हा आगळा वेगळा पैलू. अनेक विवाह संस्था लग्न जुळवताना सर्व प्रकारची मदत करतात. माहिती पुरवतात. पण पत्रिकेला किती महत्व द्यावे असा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी तो ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे अशी भूमिका घ्यावी लागते. मग विवाहाचे वेळी पत्रिका जुळते का? हे बघणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. प्रश्नकर्त्याला  समोरच्याची काय भूमिका आहे हे समजावून घेण्याचा तो एक मार्ग असतो. विचारणारा माणूस संभ्रमात पडलेला असू शकतो. तो विवाहाच्या वेळी पत्रिका बघून निर्णय देणार असेल तर त्याला हा प्रश्न पडू शकतो. कदाचित आपल्या या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणून हिणवले गेले असण्याची खंत असू शकते. आपल्या या श्रद्धेला कुणाचा तरी पाठिंबा असण्याची शक्यता अजमावी हा हेतू असू शकतो. काही तरी गुळमुळीत सांगू नका राव ! एकतर श्रद्धा तरी म्हणा किंवा अंधश्रद्धा तरी म्हणा! असे म्हणून समोरच्याला कैचीत पकडण्याचा हेतू असू शकतो. त्या निमित्त काही तरी वादसंवाद घडावा अशीही इच्छा असू शकते.
   आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते.
   परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही. म्हणूनच विवाह ठरवताना पत्रिका बघावी की नाही? हे कोणी अमुक प्रसिद्ध व्यक्ति सांगते म्हणून न ठरवता संबंधितांनी स्वत: पत्रिका बघण्याची, जुळविण्याची पद्धत समजून घेउन मगच ठरवावे एवढीच या पुस्तकाच्या निमित्ताने नम्र विनंती.
पुस्तक  खालील दुव्यावरुन डाउनलोड करु शकता.
यंदा कर्तव्य आहे
 लेख माला स्वरुपात वाचण्यासाठी  इथे क्लिक करा. सदर लेखमाला मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर आहे

प्रकाश घाटपांडे

Tuesday, February 28, 2012

दैववादाची होळी



काल सकाळी ११ वाजता पुण्यात महात्मा फुले स्मारका समोर दैववादाची होळी हा कुंडल्या जाळण्याचा प्रतिकात्मक कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला. कार्यक्रमाला डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. बाबा आढाव, विद्या बाळ व १००-१२५ कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रसिद्धी माध्यमातुन अगोदरच झालेली होती त्यामुळे मिडीयावाले, पोलीस उपस्थित होते. २८ फेब्रुवारीला असलेल्या विज्ञानदिनाच्या पार्श्वभुमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला.समितीतील अनेक युवा कार्यकर्त्यांना आपण काहीतरी क्रिएटिव्ह करतो आहोत असा उत्साह होता. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज समाजाला मागे खेचणार्‍या घटना घडत आहेत असे सांगून साता‍र्‍याचे ऒनर किलिंग प्रकरण, पुण्यात झालेल्या आत्महत्या व कुटुंब हत्या ज्या शनि-मंगळ युतीच्या दहशतीतून झाले त्याचा उहापोह तिन्ही वक्त्यांनी केला. समाजातील स्त्रीचे दुय्यम स्थान, पुरुष वर्चस्व, जातीभेद, धर्माचा ब्राह्मणी चेहरा इत्यादी उल्लेख ही भाषणात येणे अपरिहार्य होते. घटनेत असलेले वैज्ञानिक दृष्टीकोनाचे कर्तव्य आम्ही पार पाडीत आहोत असे सांगून दाभोलकर म्हणाले

Monday, January 23, 2012

शनि मंगळ युती चे बळी ?

आजच्या दै. सकाळ च्या या बातमी कडे लक्ष गेले. बातमीत असे लिहिले की - ज्योतिषशास्त्राच्या आहारी गेलेल्या कुटुंबप्रमुखाने प्रापंचिक नैराश्यायतून आपल्या पत्नीसह दोन मुलांना झोपेच्या गोळ्या देऊन जीवे मारून आणि स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
 शनी-मंगळ युतीचे "भय'
ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास ठेवणाऱ्या अरुण पालकर यांनी आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये बायको व मुलांना जीवे मारण्यामागचे कारण स्पष्ट दिले आहे. या चिठ्ठीमध्ये पालकर लिहितात "माझा भविष्यावर विश्वास आहे, मला गोष्टी आधीच कळतात; पण मला कोणी गांभीर्याने घेत नाही. माझे लक्ष संसारात नव्हते. तेरा वर्षांच्या संसारात पैसा, घर, गाडी घेणे मला सोपे होते; पण शनी-मंगळाची युती झाली असल्यामुळे माझी अडचणीकडे वाटचाल सुरू झाली. माझे व पत्नीचे कधीच पटले नाही. माझी मुलं हुशार आहेत; पण त्यांचे हाल नको म्हणून हा मार्ग मी निवडला. पत्नीशी संगनमताने हे पाऊल उचलले आहे.'
याच बातमीला पूरक बातमी म्हणून अरुण पालकरांच्या भावाचे म्हणजे श्री उमेश पालकर यांचे म्हणणे स्वतंत्र दिले आहे ते म्हणतात - "लहानपणापासूनच त्यांना ज्योतिष शास्त्राविषयी आवड होती. ते नववीत शिकत असल्यापासून याविषयातली सर्व पुस्तके वाचत. एखादा माणूस ठराविक कालावधीत कसा वागेल याचे ज्ञान त्यांना होतं. मात्र, ते सगळ्यांनाच याबाबत सांगत नव्हते. मी न सांगता कधी बाहेरगावी गेलो तर त्यांना आपोआप समजायचे आणि ते मला फोन करून विचारायचे."
ज्योतिष समर्थक म्हणतात कि ज्योतिष हे मानवजातीला कल्याणकारक असे शास्त्र आहे.मानवी मनाला दिलासा देणारे शास्त्र आहे. भविष्यात येणार्‍या अडचणींची कल्पना अगोदर आल्यामुळे माणुस संकटाचा सामना करण्यास सिद्ध होतो. वरील बातमीत जातक व ज्योतिषी एकच आहेत. ज्योतिषावर कट्टर श्रद्धा असणारा माणुस देखील असे म्हणेल कि ज्योतिषशास्त्राच्या एवढे आहारी जावयास नको होते. सदर संकट हे ज्योतिष शास्त्रामुळे ओढवलेले नसून अरुण पालकरांच्या नैराश्यामुळे उदभवले आहे.
संकट आले म्हणजे तोडगे परिहार आलेच. तो करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याची बातमी झाली नसती. अगोदरच कर्ज बाजारी त्यातून या तोडग्याचा खर्च. स्वतःसकट कुटुंब संपवण्याचा विचार काही एका रात्रीतुन आला नाही. हे विचार त्यांच्या मनात बराच काळ रेंगाळत असणार. ज्योतिषाच्या आहारी जाण्या ऐवजी त्यांनी जर मानसशास्त्र व समुपदेशन याचा आधार घेतला असता तर चित्र वेगळे दिसले असते. आपल्याला काय वाटते?

Wednesday, January 26, 2011

शाहू मोडकांशी वार्तालाप - एक जुनी आठवण

शाहू मोडकांशी वार्तालाप- एक जुनी आठवण

पुण्यात सुभाषनगर मधून चाललॊ होतो तेवढ्यात एक जुन्या पिढीतले वयस्कर गृहस्थ भेटले. अशीच ज्योतिषाच्या सर्व्हेनिमित्त ओळख.
"तुम्ही परवा शाहू मोडकांच्या व्याख्यानाला आला होतात का?"
मी नाही म्हणालो. मुंबईत होतो मी.
 " फार सुंदर झाले व्याखान.काय गाढा व्यासंग! त्यांनी बोलाव आणि महाभारतातल्या श्रीकृष्णाने ऐकावं. ज्योतिषशास्त्राचं फार चांगलं विवेचन केल. अध्यात्माची जोड हवीच तरच ते ज्योतिषशास्त्र. तुम्ही भेटा की मुंबईत. शिवाजी पार्कला रहातात."
मी नाही म्हणलं तरी भारावून गेलो.
" हं आणि फोनवर अपॊइंटमेंट घ्या. त्यांना वेळ नसतो." मी बरं म्हणालो."
"आणी डायरेक्ट क्रॊस करु नका. त्यांनाच बोलू द्या.नाही तर तुम्ही सुरुवातीलाच तुमचे मुद्दे मांडाल." मी ठीक आहे म्हणालो आणि त्यांचा निरोप घेतला.

Tuesday, May 25, 2010

प्रकाशनातील मनोविकार

दै. सकाळ १७ मे २०१० मुक्तपीठ मधील एका लेखकरावांचा प्रकाशनाविषयी अनुभव वाचला. या निमित्त आम्हाला आमचा ही ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचा अनुभव सांगावासा वाटतो. मी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाची १००० प्रतींची प्रथम आवृत्ती २००१ मधे स्वत:च आत्मविश्वासाने काढली. पुस्तक फलज्योतिष चिकित्सेवरील होते.जेष्ठ फलज्योतिष चिकित्सक श्री माधव रिसबुड यांच्या हस्ते प्रकाशित केले.प्रकाशन समारंभ केला. त्यानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॊ. नरेंद्र दाभोलकर व ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांचा जाहीर वादसंवाद ठेवला

Tuesday, February 16, 2010

फलज्योतिष शास्त्र कि अंधश्रद्धा?

ग्रंथ परिचय - फलज्योतिष शास्त्र कि अंधश्रद्धा?
पाश्चात्य जगतात गेल्या ३०-४० वर्षांत फलज्योतिषावर जे प्रचंड संशोधन झाले, त्याची फारच थोडी कल्पना मराठी वाचकांना असेल. ती कल्पना त्यांना यावी आणि या वादग्रस्त विषयाकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोन कसा आहे हेही त्यांना समजावे, या उद्देशाने हा अनुवाद यशोदा भागवत यांनी करून मराठी भाषेच्या शास्त्रीय विभागात फार मोलाची भर घातली आहे. अशा प्रकारची शास्त्रविषयक पुस्तके मराठीत फारच थोडी आहेत.

मूळ ग्रंथाचे लेखक दोघेही मानसशास्त्राचे पदवीधर आहेत. हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा त्यांना कशी झाली ते त्यांनी प्रस्तावनेत सांगितले आहे. फलज्योतिष या विषयावर दोन अगदी परस्परविरोधी तट विसाव्या शतकाच्या आरंभापासून पडलेले आहेत. विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी लोक फलज्योतिष हे शास्त्र नव्हे तर केवळ एक थोतांड आहे, असे मानतात. त्याउलट या शास्त्राचे समर्थक असे म्हणतात की हजारो वर्षांच्या अनुभवांच्या आधारावर हे शास्त्र उभे आहे आणि ते बहुसंख्य लोकांच्या विश्वासास पात्र झालेले आहे. म्हणून ते एक खरे शास्त्र आहे.

Friday, January 15, 2010

या ज्योतिषाच काय करायच?

सिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षानुसार ते आरोग्यास अपायकारक असल्याचे सिद्ध झालेने ते पाकिटावर वैधानिक इशारा म्हणून छापणे सक्तीचेही केले. तो इशारा वाचणे हे सिगारेट पिणाऱ्याना सक्तीचे नसले तरी त्याची त्यावर नजर जावी एवढया मोठया अक्षरात तो छापला गेला. मोठा आणि ठळक वाटला तरी त्यावर वाचकाची नजर स्थिरावणार नाही असा फॉन्ट जाहिरात कंपन्या वापरतात. बहुसंख्य लोक तो एकदा तरी नजरेखालून घालतात. तो वाचून किती लोकांनी सिगारेट पिण्याचे सोडून दिले आहे? सिगारेट पिणाऱ्यांमध्ये विद्वान , बुद्धीजीवी लोक नाहीत काय? या इशाऱ्याशी सहमत असणारे कित्येक डॉक्टर्स सुद्धा या सिगारेट पिणाऱ्यांमध्ये आहेत.

Wednesday, December 16, 2009

वास्तुज्योतिष चर्चेच्या निमित्ताने

हल्ली वास्तुज्योतिष हा प्रकार फारच बोकाळला आहे. हा वास्तूज्योतिष हा काय प्रकार आहे?
वास्तूशास्त्रात घुसलेले ज्योतिष याला वास्तूज्योतिष असे म्हणणे वावगे ठरु नये. विशिष्ट वेळ ही एखाद्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे हे जसे मुहूर्त प्रकारात पाहिले जाते. तसे विशिष्ट वास्तू ही त्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे का? हे वास्तूशास्त्रात बघितले जाते. हे अनुकूलत्व वा प्रतिकूलत्व हे शुभाशुभत्व कल्पनेशी जोडले आहे. ज्योतिषशास्त्रात वास्तूशांत, मुहूर्त, बाधित वास्तू यांचा विचार केला आहे. दिशांचे कारकत्व हे राशींनाही दिले आहेे. दिशांचे ग्रहाधिपती आहेत. मानवी जीवनावर ग्रहांप्रमाणे गृहाचाही प्रभाव पडत असतो असे वास्तूशास्त्रात मानले गेले आहे. अशा रितीने वास्तूशास्त्र व ज्योतिषशास्त्र यांची सांगड घातली आहे. जन्मकालीन ग्रहयोग बदलणे आपल्या हातात नसते परंतु वास्तू निवडणे आपल्या हातात असते. वास्तू शास्त्रानुसार जर वास्तू 'शास्त्रोक्त` असेल तर त्या वास्तूत राहणाऱ्यांचे आरोग्य, संतती, संपत्ती, यावर त्याचा शुभ परिणाम होतो व तसे नसेल तर अशुभ परिणाम होतो. वास्तू शास्त्रानुसार वास्तु कितीही शास्त्रशुद्ध असेल परंतु त्यात राहणाऱ्या व्यक्तिच्या कुंडलीतच जर वास्तुसौख्याचा योग नसेल तर काय उपयोग? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? त्यामुळे काही वास्तुज्योतिषी अशी जाहिरात करतात, आम्ही वास्तू शास्त्रही जाणतो व फलज्योतिषही जाणतो. त्यामुळे तुम्ही आमच्या कडे या. तुमच्या पत्रिकेत वास्तुसौख्याचा योग असेल तर आम्ही तुम्हाला योग्य ते अनुकूल बदल वास्तूत करुन देतो. विनाकारण खर्चात पाडत नाही. फलज्योतिषात ग्रहांची शांती करुन त्यांना अनुकूल करुन घेता येते तसे वास्तूशास्त्रात वास्तुशास्त्रानुसार अनुरुप बदल करुन, वास्तुशांती करुन वास्तू अनुकूल करुन घेता येते. एकूण काय व्यक्तिच्या आयुष्यातील सुखदु:खाच्या घटनांचा संबंध कधी ग्रहयोगांशी जोडला जातो तर कधी वास्तूशी जोडला जातो.
(ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... वरुन उधृत)
सुप्रसिद्ध ज्योतिषी व. दा भट काय म्हणतात ते पहा.

Sunday, October 11, 2009

फलज्योतिष विद्येवर शोध किरण

फलज्योतिष - विद्येवर शोध किरण 

फलज्योतिष विद्येवर शोध किरण या पुस्तिकेच्या नावावरुन जर कुणाचा असा समज झाला असेल कि हे पुस्तक आपल्याला फलज्योतिष शिकण्यास उपयुक्त आहे तर तो गैरसमज आहे. या पुस्तिकेचा उद्देश हा मनोरंजन किंवा फलज्योतिष शिकवणे असा नसून सामान्य लोकांची तर्कबुद्धी जागृत करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. मनुष्याची बुद्धी मूलत: चिकित्सक असली तरी फलज्योतिषाच्या गूढ वलया भोवती लोप पावते.एवढे लोक विश्वास ठेवतात म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे म्हणुन आपणही विश्वास ठेवलेला बरा अशी जी मनोवृत्ती आहे त्याची लेखकाला खंत वाटते.नाडी या प्रकरणाचे शास्त्रीय स्पष्टीकरण जे लोक देउ शकत नाहीत ते लोक एकनाड आहे तर संतती होणार नाही असे बिनधास्त ठोकून देतात.त्यामुळे चांगली अनुरुप असलेली स्थळे हातची
घालवावी लागतात या गोष्टी ची चीड येउन लेखकाने त्याला पायबंद घालण्याच्या दृष्टीकोनातून ही पुस्तिका लिहिली आहे.

Friday, September 18, 2009

ग्रंथ परिचय - फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड


ग्रंथ परिचय - फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड
फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्यांचे भारुड हे नावच इतके स्वयंस्पष्ट आहे कि लेखकाला नेमक काय म्हणायच आहे हे यातुन स्पष्ट होत. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर फलज्योतिष = लोकभ्रम + लबाडी+योगायोग+ इंट्युशन ग्रहतारे हे फक्त शोभेसाठी!
असे समीकरण मांडुन लेखकास काय सांगायच आहे याचे मुद्दे दिले आहेत. काही मुद्दे थोडक्यात असे आहेत.

Wednesday, July 29, 2009

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर वाचकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. यापुर्वी फलज्योतिषावर आपले मत काय? हा कौल घेतला होता. दैनिक सकाळ मध्ये ही यावर निवेदन दिले होते. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्याचे ही जागा नाही. धनंजयाचे स्टॅटिस्टिकल मॉडेल वर या अगोदर चाचणी झाली आहेच. त्याचे संदर्भ खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत


दुवा क्र १


दुवा क्र २

Wednesday, April 01, 2009

नाडीपरिक्षा- काही चिकित्सक प्रश्न

नाडीग्रंथ हा विषय इतका चघळून झाला आहे तरीही विषय चिकित्सेसाठी खुला ठेवला पाहिजे असे आम्हाला वाटते. सन ९५-९६ ते २००२ या काळात आम्ही या विषयात वाहुन गेलो होतो. पुण्यात हा विषय देखील प्रसारमाध्यमांनी उचलून धरला होता. त्याकाळात आम्हाला नाडीवाल्या लोकांना विचारायचे काही प्रश्न पडले होते आज ही आहेत. बघा तुम्हाला कसे वाटतात.